वृद्धापकाळात का लागत नाही भूक?

वृद्धापकाळात का लागत नाही भूक
वृद्धापकाळात का लागत नाही भूक
Published on
Updated on

वाढत्या वयाबरोबरच भूक न लागणे आणि खाण्याची इच्छा न होणे, अशा तक्रारी सुरू होतात. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. परंतु, तरीही ज्येष्ठांच्या खाण्यापिण्याकडे आणि पोषणाकडे आपण नियमित लक्ष द्यायला हवे. ज्येष्ठ मंडळींना भूक न लागणे ही काही समस्या नव्हे. परंतु, भूक न लागण्यामागे एखाद्या गंभीर आजाराचे संकेत असू शकतात, ते मात्र ओळखायला हवेत.

का मंदावते भूक?

वाढत्या वयाबरोबरच भूक मंदावत जाणे ही एक सार्वत्रिक तक्रार आहे; परंतु यामागे अनेक कारणे असू शकतात. या कारणांमुळे ज्येष्ठ व्यक्तींची भूक कमी होते किंवा अन्नावरील वासना कमी होत जाते. त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयीही बदलत जातात. अन्नाची चव न लागणे, सतत आजारी असणे, औषधांचा साईड इफेŠट अशी अनेक कारणे यामागे असू शकतात.

बदलांवर हवे लक्ष

वार्धक्य सुरू होताच अनेक प्रकारचे शारीरिक आणि मानसिक बदल होऊ लागतात आणि त्यांचा थेट परिणाम खाण्या-पिण्यावर आणि भुकेवर होतो. चयापचयाची क्रिया मंदावल्यामुळे आणि शारीरिक हालचाली कमी झाल्याने ज्येष्ठांना कमी कॅलरिजची गरज भासते. दात पडणे, दातांचे अन्य आजार होणे, पोट किंवा आतड्याचा आजार जडणे, आदी कारणांमुळेही खाण्यापिण्याच्या सवयी बदलतात आणि भूक कमी होते. अन्नाला चव न लागणे, श्रवणशक्ती किंवा वास घेण्याची शक्ती कमी होणे, यामुळेही वृद्धांना खावेसे वाटत नाही. मात्र भूक न लागणे ही पार्किन्सन्स, अल्जायमर अशा गंभीर आजारांची नांदीही असू शकते.

जेवण नव्हे, पोषणमूल्य वाढवा

कमी जेवणे किंवा अजिबात न जेवण्याने जर तब्येतीवर प्रतिकूल परिणाम होत असेल; तर ज्येष्ठ व्यक्तींच्या पोटात थोडे, परंतु पोषक पदार्थ जातील, याची काळजी घ्यायला हवी. कारण ज्येष्ठांना जास्त अन्नाची नव्हे, तर जास्त पोषणमूल्यांची गरज असते. त्यामुळे त्यांच्या जेवणाच्या ताटात जीवनसत्त्वे आणि खनिज देणारे पदार्थ अधिक असतील, याची काळजी घ्या.

वेळेवर खाण्याची सवय हवी

आपले शरीर आपल्याला नियमित कालांतराने भूक आणि तहान लागल्याचे संकेत देत असते. एखाद्या वेळी भूक लागत नसेल, अशा वेळीही जर स्वादिष्ट आणि पोषक असा अल्पोपाहार ज्येष्ठांना नियमित दिला, तर त्या विशिष्ट वेळी भूक लागायला सुरुवात होते. यामुळे अर्थातच नियमित आणि वेळच्या वेळी खाण्याची सवय लागते.

समूहात जेवण्यास प्रवृत्त करा

एकटेपणाच्या जाणिवेनेही मानसिकदृष्ट्या ज्येष्ठ मंडळी कमकुवत होतात आणि त्यांची भूक मंदावते. सोसायटीत किंवा मोहल्ल्यात होणार्‍या पार्टीमध्ये किंवा सामूहिक भोजनाच्या कार्यक्रमाला जाण्यास प्रोत्साहित केले, तर त्यांना आपोआप भूक लागते. अशा ठिकाणी जेवताना त्यांना आपले एकटेपण सरल्याचा आनंद मिळतो आणि जास्त जेवण जाते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news