sagittarius : धनु वार्षिक राशिभविष्य 2022- कामे मार्गी लागतील | पुढारी

sagittarius : धनु वार्षिक राशिभविष्य 2022- कामे मार्गी लागतील

धनु : वार्षिक राशिभविष्य 2022- कामे मार्गी लागतील

धनु (sagittarius) ही रास गुरूच्या अमलाखालील रास आहे. मनाचा निर्मळपणा, निष्कपटपणा याबद्दल धनु राशीच्या व्यक्‍ती प्रसिद्ध असतात. तत्त्वाला व ध्येयाला चिकटून राहण्याचा आपला स्वभाव असतो. सर्व जातीधर्मांवर प्रेम करणारी आपली रास आहे. आपल्याकडे निर्भयपणा असतो. स्पष्टवक्‍तेपणा असतो. धनु राशीच्या अनेक व्यक्‍ती समाजाला मार्गदर्शन करणार्‍या असतात. अनेक  साधूसंत, ऋषी, मुनी, सत्पुरुष, आचार्य, महान योगी या पुरुषांची ही रास आहे. चारित्र्यसंपन्नता, निरलसपणे, नि:स्वार्थीपणे कोणत्याही कार्याला वाहून घेणे हे धनु राशीचे वैशिष्ट्य आहे. त्याचबरोबर प्रामाणिकपणा, सुसंस्कृतपणा, सभ्यता, परोपकारिता या राशीचे वैशिष्ट्य आहे. अनेक मोठमोठ्या धार्मिक, आध्यात्मिक संस्थेमध्ये निर्मळपणाने काम करणार्‍या व्यक्‍ती या धनु राशीच्या असतात.

आरोग्य sagittarius

आरोग्याच्या दृष्टीने धनु (sagittarius ) राशीच्या व्यक्‍तींना हे वर्ष चांगले जाणार आहे. साडेसातीचा अजून एक वर्षापेक्षा अधिक कालखंड शिल्‍लक आहे. त्यामुळे या साडेसातीचा असर थोडाबहुत राहणार आहे. परंतु; त्रासाचा, अडचणीचा बराचसा कालखंड संपलेला आहे. त्यामुळे साडेसातीची फार धास्ती घेण्याचे कारण नाही. आरोग्याच्या फारशा अडचणी येणार नाहीत. साडेसाती असल्यामुळे काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. ताणतणावाचा प्रभाव मानसिकतेवर होणार नाही याची काळजी घ्यावी. साडेसाती सुरू असल्यामुळे आरोग्यासंदर्भातील लहानसहान तक्रारी जरी जाणवल्या तरी डॉक्टरांचा सल्‍ला घ्यावा. दि. 12/04/2022 नंतर गुरू सुख स्थानात असणार आहे. त्यामुळे धनु राशीच्या व्यक्‍तींचे आरोग्य चांगले राहणार आहे. साडेसातीचा ताणही कमी राहणार आहे. दि. 01/04/2022 ते दि. 12/07/2022 हा कालखंड वगळता दि. 12/01/2023 ला आपली साडेसाती संपणार आहे. तेव्हा साडेसातीची काळजी कमी होत जाणार आहे.

खालील कालखंड आरोग्याच्या दृष्टीने अनुकूल आहेत.

दि. 27/04/2022 ते दि. 23/05/2022

दि. 17/11/2022 ते दि. 17/12/2022

सध्या कोरोनाचा संसर्ग सुरू आहे. खालील कालखंडात आपण विशेष काळजी घ्यावी.

10/08/2022 ते दि. 15/10/2022

sagittarius horoscope www.pudhari.news
धनू वार्षिक राशिभविष्य 2022
व्यवसाय व आर्थिक स्थिती sagittarius

व्यापार, व्यवसाय व आर्थिक लाभ या दृष्टीने हे वर्ष धनु राशीच्या व्यक्‍तींना अनुकूल ठरणार आहे. शनी व गुरू हे दोन मह्त्त्वाचे ग्रह अनुकूल ठरणार आहेत. दि. 12/04/2022 पर्यंतच्या कालखंडात तुम्ही नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. व्यापार, व्यवसायाच्या दृष्टीने काही नवीन संधी लाभणार आहेत. अनेक लोकांची मदत मिळवू शकाल. व्यवसायाची फार मोठी उलाढाल करू शकाल. व्यवसायात बर्‍यापैकी स्वास्थ्य लाभेल.  यावर्षी व्यवसायातील रखडलेली अनेक कामे मार्गी लागतील. मागील काही काळामध्ये व्यवसायात जो काही त्रास झाला तो आता कमी होणार आहे. व्यवसायामध्ये वाढ होईल. व्यवसायामध्ये नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल. नवीन पद्धतीने काम करू शकाल. परंतु; सध्या आपली साडेसाती सुरू आहे हे विसरून चालणार नाही. त्यामुळे प्रत्येकाच्या वैयक्‍तिक कुंडलीप्रमाणे कमी-अधिक प्रमाणात याचा प्रभाव होईल. दि. 12/04/2022 नंतरचा कालखंड व्यवसाय वाढण्याच्या दृष्टीने विशेष चांगला आहे. व्यवसायाची उलाढाल वाढवू शकाल. आर्थिक लाभालाही हे वर्ष चांगले आहे.

खालील कालखंड व्यवसायाच्या व आर्थिक लाभाच्या दृष्टीने उत्तम आहेत.

दि. 01/04/2022 ते दि. 23/05/2022

दि. 27/06/2022 ते दि. 10/08/2022

दि. 17/08/2022 ते दि. 17/10/2022

दि. 17/11/2022 ते दि. 17/12/2022

नोकरी

हे वर्ष नोकरीतील व्यक्‍तींना समाधानकारक राहणार आहे. धनु राशीच्या व्यक्‍तींना साडेसाती चालू असल्यामुळे वैयक्‍तिक कुंडलीप्रमाणे कमी-अधिक प्रमाणात त्रास होईल. परंतु; यावर्षी आपण विरोधकावर मात करू शकाल. हितशत्रूंच्या कारवायांवर मात कराल. ज्या व्यक्‍ती नोकरीच्या शोधात आहेत, त्यांनासुद्धा हा कालखंड चांगला आहे.

नोकरीतील व्यक्‍तींना हे वर्ष खूपच समाधानाचे आहे. जे बदलीची प्रतीक्षा करत आहेत किंवा ज्यांना बदली हवी आहे, त्यांना दि. 12/04/2022 नंतरच्या कालखंडात निश्‍चित बदली मिळेल व बदली चांगल्या ठिकाणी मिळेल. नोकरीतील व्यक्‍तींना हे वर्ष चांगले आहे. यावर्षी निश्‍चित बढती मिळण्याचे योग आहेत. अनेकांच्या बदल्या व बढत्या आतापर्यंत साडेसातीमुळे रखडल्या असण्याची शक्यता आहे. आता मात्र आपणाला बढती निश्‍चित मिळणार आहे व बढती आपल्या अपेक्षेप्रमाणे मिळणार आहे. पगारवाढीची शक्यता आहे. वरिष्ठांचे चांगले सहकार्य लाभेल. धनु राशीच्या व्यक्‍तींना दि. 12/04/2022 नंतरचा कालखंड हा बढतीसाठी चांगला आहे. बदलीसाठीही चांगला आहे. ज्यांना बदली हवी आहे, त्यांनी दि. 14/04/2022 नंतर प्रयत्न करावेत. हे वर्ष नोकरीच्या दृष्टीने चांगले आहे.

खालील कालखंड नोकरीतील व्यक्‍तींना अनुकूल आहेत.

दि. 13/02/2022 ते दि. 01/04/2022

दि. 27/04/2022 ते दि. 22/05/2022

दि. 03/07/2022 ते दि. 16/07/2022

दि. 17/08/2022 ते दि. 17/10/2022

दि. 17/11/2022 ते दि. 17/12/2022

प्रॉपर्टी sagittarius 

प्रॉपर्टी, गुंतवणुकीसाठी धनु राशीच्या व्यक्‍तींना हे वर्ष चांगले आहे. तुमचे जागा, जमिनी, प्रॉपर्टी, बंगला, फ्लॅट, वाहन खरेदी यासाठी हे वर्ष चांगले आहे. मात्र, प्रॉपर्टीचे व्यवहार प्रत्यक्ष पार पाडताना थोडा विलंब लागण्याची शक्यता आहे. प्रॉपर्टीसाठी दि. 12/04/2022 नंतरचा कालखंड विशेष अनुकूल आहे. विशेषत: खालील कालखंड अधिक अनुकूल ठरतील.

खालील कालखंड प्रॉपर्टीसाठी चांगले आहेत.

दि. 27/04/2022 ते दि. 23/05/2022

दि. 27/08/2022 ते दि. 26/10/2022

संततिसौख्य

संततिसौख्याच्या दृष्टीने धनु राशीच्या व्यक्‍तींना हे वर्ष सर्वसामान्य आहे. काहीसे प्रतिकूलच आहे. विद्यार्थ्यांना यशासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. काही पालकांना आपल्या मुलांनी अनपेक्षित निर्माण केलेल्या प्रश्‍नांना किंवा समस्यांना तोंड द्यावे लागेल. बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्‍तींची प्रगती अपेक्षित असणार नाही. मुला-मुलींसंदर्भातील महत्त्वाचे प्रश्‍न सुटतील. मुला-मुलींबरोबर सुसंवाद साधू शकाल. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. विद्यार्थ्यांचे शाळा, कॉलेजचे प्रश्‍न सुटतील. यावर्षी मुला-मुलींच्या प्रगतीच्या दृष्टीने फार अपेक्षा ठेवाव्यात असे हे वर्ष नाही. बरेचसे मुला-मुलींच्या व्यक्‍तिगत ग्रहयोगांवर अवलंबून राहील.

खालील कालखंड संततिसौख्याच्या दृष्टीने अनुकूल आहेत.

दि. 15/04/2022 ते  दि. 17/05/2022

दि. 30/06/2022 ते दि. 10/08/2022

दि. 18/10/2022 ते दि. 13/11/2022

दि. 02/12/2022 ते दि. 27/12/2022

वैवाहिक सौख्य

धनु राशीच्या व्यक्‍तींना हे वर्ष वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने समाधानकारक राहणार आहे. विवाहेच्छू मुला-मुलींचे विवाह ठरतील. आपणाला अपेक्षित साथीदार लाभेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधू शकाल. आता साडेसातीचा थोडाच कालखंड बाकी आहे. परंतु; वैयक्‍तिक कुंडलीप्रमाणे काहींना वैवाहिक जीवनात कमी-अधिक प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागेल. परंतु; कोणतीही गोष्ट फार टोकाला जाणार नाही, मतभेद झालेच तर समोरच्याची बाजूदेखील ऐकून घेण्याचा प्रयत्न करावा.

वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने धनु राशीच्या व्यक्‍तींना दि. 11/04/2022 पूर्वीचा कालखंड सौख्यकारक आहे. धनु राशीच्या मुला-मुलींचे विवाह जमणे व होणे या दृष्टीने तसेच कोणत्याही शुभ कार्यासाठी दि. 11/04/2022 पूर्वीचा कालखंड अनुकूल आहे. दि. 12/04/2022 नंतर धनु राशीच्या व्यक्‍तींना गुरूची अनुकूलता राहणार नाही. त्यामुळे दि. 12/04/2022 नंतरचा कालखंड हा शुभ कार्यासाठी अनुकूल नाही. विवाहेच्छूंचे विवाह ज्यांना करायचे आहेत, त्यांनी कटाक्षाने दि. 12/04/2022 पूर्वीचा कालखंड लक्षात ठेवावा.

खालील कालखंड वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने अनुकूल आहेत.

दि. 01/04/2022 ते दि. 12/04/2022

दि. 27/04/2022 ते दि. 17/06/2022

दि. 03/07/2022 ते दि. 16/07/2022

दि. 01/08/2022 ते दि. 15/10/2022

प्रवास sagittarius 

प्रवासाच्या दृष्टीने तसेच तीर्थयात्रा, सहली, परदेश प्रवास या दृष्टीने हे वर्ष समाधानकारक आहे. तीर्थयात्रा, परदेश प्रवासाच्या संधी लाभतील. प्रवास सुखकर होतील.

खालील कालखंड प्रवासाच्या दृष्टीने चांगले आहेत.

दि. 07/04/2022 ते दि. 09/08/2022

दि. 15/08/2022 ते दि. 15/11/2022

दि. 05/12/2022 ते दि. 27/12/2022

प्रतिष्ठा, अधिकारपद, मानमान्यता

सार्वजनिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यामध्ये यश तसेच प्रतिष्ठा, अधिकार, मानसन्मान या सर्व दृष्टीने धनु राशीच्या व्यक्‍तींना हे वर्ष चांगले आहे. विशेषत: दि. 12/04/2022 नंतरचा कालखंड हा सार्वजनिक कार्यात प्रतिष्ठा मिळण्याच्या दृष्टीने अत्यंत चांगला आहे. यावर्षी काहींना आध्यात्मिक क्षेत्रात यश मिळेल. धार्मिक, सांस्कृतिक कार्यात आपणाला काम करण्यास संधी मिळेल. एखादे संस्मरणीय काम करू शकाल. यावर्षी आपणाला आपल्या सार्वजनिक कार्यात मनासारखी संधी लाभणार आहे. मनासारखी अनुकूलता लाभणार आहे. गेली काही वर्षे धनु राशीच्या व्यक्‍तींना साडेसातीमुळे कामामध्ये अडचणी येत होत्या, प्रगती होत नव्हती. अनेक अडचणींना, विरोधकांबरोबर संघर्ष करावा लागत होता. परंतु; आता साडेसातीची तीव्रता कमी झालेली आहे. त्यामुळे धनु राशीच्या व्यक्‍तींना अधिकार, मान, प्रतिष्ठा या गोष्टी प्राप्‍त होतील. तुम्ही आपले प्रभुत्व सिद्ध करू शकाल. सार्वजनिक कामात, राजकारणात, सांस्कृतिक क्षेत्रात एखाद्या संस्थेचे अधिकारपद लाभेल. प्रगतीचा मार्ग आता मोकळा झालेला आहे.

खालील कालखंड हे चांगले व अनुकूल आहेत.

दि. 12/02/2022 ते दि. 01/04/2022

दि. 01/07/2022 ते दि. 16/07/2022

दि. 17/08/2022 ते दि. 25/08/2022

दि. 17/09/2022 ते दि. 17/10/2022

दि. 02/12/2022 ते दि. 27/12/2022

सुसंधी sagittarius 

सुसंधी, प्रसिद्धी, अंगिकृत कार्यात यश या दृष्टीने हे वर्ष धनु राशीच्या व्यक्‍तींना चांगले आहे. विशेषत: दि. 12/04/2022 पूर्वीचा कालखंड हा अधिक अनुकूल आहे. यावर्षी तुम्हाला धार्मिक कार्यामध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल. तुम्हाला तुमच्या गुणांना अधिक वाव मिळेल, संधी मिळेल. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. हे वर्ष अनेक दृष्टीने स्वास्थ्याचे आहे. साडेसातीचा त्रास कमी होणार आहे. त्यामुळे तुमची अडलेली कामे मार्गी लागतील व अनेकांचे सहकार्य लाभेल.

खालील कालखंड सुसंधी, प्रसिद्धीच्या दृष्टीने अनुकूल जातील.

दि. 06/04/2022 ते दि. 17/06/2022

दि. 02/07/2022 ते दि. 06/08/2022

दि. 16/08/2022 ते दि. 15/11/2022

एवढा कालखंड साडेसाती असणार नाही. अन्यथा यावर्षाच्या सुरुवातीपासून ते वरील कालखंड वगळून दि. 17/01/2023 पर्यंत धनु राशीच्या व्यक्तींना साडेसाती आहे. वरील कालखंड वगळून दि. 17/01/2023 ला आपली साडेसाती संपूर्णपणे संपणार आहे. यावर्षी आपणाला आपल्या कार्यक्षेत्रामध्ये सुसंधी व प्रसिद्धी मिळेल. कला, संगीत, नाट्य, लेखन व प्रकाशन यासाठी दि. 12/04/2022 पूर्वीचा कालखंड चांगला आहे, तर दि. 12/04/2022 नंतर सार्वजनिक कामात प्रतिष्ठा मिळण्याच्या दृष्टीने कालखंड चांगले आहेत. धनु राशीच्या व्यक्‍तींना गेली अनेक वर्षे साडेसातीबरोबर संघर्ष करावा लागला आहे. मानसिक ताणतणाव होते, अडचणी येत होत्या, कामे मार्गी लागत नव्हती. कर्तृत्व असून संधी लाभत नव्हती. परंतु; आता साडेसातीची तीव्रता कमी झालेली आहे व नोकरी, व्यवसायात गुरूची अनुकूलता आहे. त्यामुळे हे वर्ष धनु राशीच्या व्यक्‍तींना अनेक बाबतीत यशाचे व लाभाचे ठरणार आहे.

– प्राचार्य रमणलाल शहा

Back to top button