कोल्हापूर जिल्हा बँक निवडणुकीतील कुस्ती नुरा नव्हती : मुश्रीफ | पुढारी

कोल्हापूर जिल्हा बँक निवडणुकीतील कुस्ती नुरा नव्हती : मुश्रीफ

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतील कुस्ती नुरा नव्हती. लोकांनीच विरोधकांच्या तीन जागा निवडून दिल्या आहेत, असे स्पष्ट करत ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी आपल्याच आघाडीतील नेत्यांच्या मनातील शंकांना पत्रकारांशी बोलताना उत्तर दिले. (कोल्हापूर जिल्हा बँक)

मंत्रिपदामुळे बँकेच्या कारभाराकडे लक्ष देण्यास पुरेसा वेळ नसल्याने, आपल्याला अध्यक्षपदावरून मोकळे करण्याची विनंती आपण यापूर्वीच केल्याचे सांगून मुश्रीफ म्हणाले की, त्याच भूमिकेवर आपण ठाम आहोत. त्यावर पत्रकारांनी सर्वांनी आग्रह केल्यास अध्यक्षपद स्वीकारणार का? असे विचारता आग्रह होईल तेव्हा बघू, त्याची चर्चा आता कशाला, असे म्हणत मुश्रीफ यांनी अध्यक्षपदावरील आपला दावा कायम राखला असल्याचे दिसून येते.

कोल्हापूर जिल्हा बँक : ‘तो’ निकाल धक्कादायकच

प्रक्रिया व पतसंस्था गटातील निवडणुकीचा निकाल धक्कादायक आहे. आमचे तीन उमेदवार पराभूत झाले आहेत. नक्की काय झाल आहे ते पाहिले पाहिजे. प्रक्रिया गटात पूर्वीच्या सत्तारूढ आघाडीतील उमेदवार होते.

त्या दोघांनी मतदारांचे पालनपोषण केले आहे. त्यांचा मतदारांशी अधिकचा संपर्क होता. गेल्यावेळीदेखील पतसंस्थेमधून सत्तारूढ गटाची जागा आली नव्हती, असेही मुश्रीफ म्हणाले.

कोरे, आवाडेंबाबत सावध पवित्रा

आ. विनय कोरे व आ. प्रकाश आवाडे यांच्या तीव— प्रतिक्रियेवर बोलताना मुश्रीफ म्हणाले, केंद्रनिहाय मतमोजणी झाली आहे. त्यामुळे त्याची माहिती उपलब्ध होऊ शकते. यामुळे कोठे काय घडले याचे, विश्लेषण केले जाईल.

यासाठी येत्या दोन-तीन दिवसांत सत्तारूढ आघाडीच्या सर्व 21 उमेदवारांची बैठक घेण्यात येईल. त्यानंतर आ. कोरे व आ. आवाडे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली जाईल.

बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्षपदाचा निर्णय घेण्यात येईल. बँकेच्या हितासाठी जे करावे लागेल ते करू. अध्यक्षपदासाठी अन्य संचालकांनी आग्रह धरल्यास त्यावेळी अध्यक्षपदाबाबत विचार करू, असेही मुश्रीफ म्हणाले.

Back to top button