Vasant Panchami 2023 | या महिन्यात आहे वसंत पंचमी, जाणून घ्या महत्त्व, शुभ वेळ अन् मुहूर्त

Vasant Panchami 2023 | या महिन्यात आहे वसंत पंचमी, जाणून घ्या महत्त्व, शुभ वेळ अन् मुहूर्त

पुढारी ऑनलाईन डेस्क : माघ महिन्यातील पंचमीला देवी सरस्वती पृथ्वीतलावर अवतरते अशी धारणा असल्यामुळे या महिन्यात सरस्वतीची विशेष पूजा केली जाते. या पंचमीला वसंत पंचमी असेही म्हटले जाते. वसंत पंचमी साजरी करण्याला हिंदू धर्मात अनन्य साधारण महत्व आहे. २०२३ मध्ये वसंत पंचमी २६ जानेवारीला साजरी करण्यात येणार आहे. (Vasant Panchami 2023) या खास दिवशी सर्वजण पिवळ्या रंगाची कपडे परिधान करतात. यामुळे वसंत पंचमीचे महत्त्व, शुभ वेळ, शुभ मुहूर्त जाणून घेवूयात…

येणाऱ्या प्रत्येक वर्षातील माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या तिथीला वसंत पंचमी साजरी करण्यात येते. या दिवशी खास करून माता सरस्वतीची विशेष पूजा केली जाते. सरस्वतीचे वर्णन ज्ञान देवता म्हणून केले जात असल्याने या उत्सवाचे मोठे-मोठे कार्यक्रम शाळा आणि शैक्षणिक संस्थांमध्ये आयोजित केले जातात. माता सरस्वतीचा आशीर्वाद घेण्यासाठी हा दिवस विद्यार्थ्यांसाठी शुभ मानला जातो. या दिवशी माता सरस्वतीची पिवळ्या रंगाची फुले अर्पण करून आशिर्वाद घेतला जातो.

वसंत पंचमीचा शुभ मुहूर्त

यावर्षी गुरूवारी दिनांक २६ जानेवारीला वसंत पंचमी साजरी करण्यात येणार आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, माघ शुक्ल पंचमी तिथी २५ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजून ३३ मिनिटांनंतर सुरू होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजे, २६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजून ३७ मिनिटांपर्यंत राहणार आहे. यामुळे तिथीनुसार, गुरूवारी दिनांक २६ जानेवारी २०२३ रोजी वसंत पंचमीचा सण साजरा करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे, वसंत पंचमीच्या पूजेचा शुभ मुहूर्त गुरूवारी सकाळी ७ वाजून ६ मिनिटांनी ते दुपारी १२ वाजता ३४ मिनिटांनी असणार आहे.

वसंत पंचमीच्या दिवशी माता सरस्वतीची पूजा करून तिला पिवळी फुले अर्पण केली जातात. तसेच या दिवशी पिवळ्या रंगाची वस्त्रे पाटावर पुजेसाठी वापरली जातात. या दिवशी पिवळ्या रंगाची कपडे परिधान करणे अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते.

वसंत पंचमीला पिवळ्या रंगाची कपडे का परिधान करावीत?

पिवळा रंग सकारात्मकता, नवी जिद्द आणि नवीन उर्जेचे प्रतीक आहे. यासोबतच पिवळा रंग हा माता सरस्वतीचा आवडता रंग आहे, त्यामुळे वसंत पंचमीला पिवळ्या रंगाची कपडे परिधान करणे खूपच शुभ मानले जाते. नियमानुसार योग्य पुजेसोबत पिवळ्या रंगाची वस्त्रे वापरल्यास माता सरस्वती लवकर प्रसन्न होते अशी अख्यायिका आहे. तर दुसरीकडे माता सरस्वतीला पांढरा रंगदेखील आवडत असल्याने ती पांढऱ्या रंगाच्या साडीत दिसते. वसंत पंचमीच्या दिवशी देवी सरस्वतीची पूजा करताना तिच्या आसनावर पिवळ्या रंगाचे वस्त्र घालून त्यावर पिवळ्या रंगाची फुले अर्पण करावीत. यासोबतच नैवेद्य म्हणून बुंदीचे लाडू आणि बेसन लाडू अर्पण करावेत असेही सांगितले जाते.

देवी सरस्वती

पौराणिक काळात ब्रम्हदेवांनी सृष्टी निर्माण करताना जीव आणि मनुष्यांची रचना केली होती. मात्र, निर्माण केलेली सृष्टी निस्तेज असल्याचे त्यांना त्यावेळी जाणवले. त्यावेळी अतिशय शांत, निर्जल, आवाज किंवा वाणी नसलेली सृष्टी निर्माण झाली होती. यामुळे ब्रम्हदेव उदास होवून चिंतेत होते. यानंतर विष्णू देवाच्या आज्ञेवरून ब्रम्हदेवांनी त्याच्या कमंडलातील पाणी पृथ्वीवर शिंपडले. पाण्यामुळे पृथ्वी कंप पावली आणि एक अद्भुत शक्तीच्या रूपात चतुर्भुजी सुंदर स्त्री प्रकट झाली. या देवीच्या एका हातात वीणा, दुसर्‍या हातात मुद्रा आणि इतर दोन हातात पुस्तके आणि माळ होती. या देवीला ब्रम्हदेवाने वीणा वाजवण्याचा आग्रह घरला आणि पृथ्वीवरील सर्व जीवांना, मनुष्याला वाणी प्राप्त झाली. यानंतर या देवीला सरस्वती असे म्हटले गेले. अशी आख्यायिका आहे.

यानंतर सरस्वतीने वाणीसह विद्या आणि बुद्धी सर्व जीवांना दिली. ही घटना माघ महिन्यातील पंचमीला घडल्याने हा दिवस सरस्वतीचा जन्मोत्सव म्हणून वसंत पंचमी साजरी करण्यात येते. सरस्वती देवीला वीणावादनी, भगवती, शारदा, बागीश्वरी, संगीताची देवी अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. (Vasant Panchami 2023)

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news