नगर : आमदार साहेब… वर्गखोल्या तरी द्या…! नान्नज प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी दिली आर्त हाक | पुढारी

नगर : आमदार साहेब... वर्गखोल्या तरी द्या...! नान्नज प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी दिली आर्त हाक

नान्नज : पुढारी वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील नान्नज येथील प्राथमिक शाळा (मुले, मुली,उर्दू) ही एकाच परिसरात असून या तीनही शाळा एकमेकांशी संलग्न आहेत. विद्यार्थ्यांसाठी पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग आहेत. मात्र,प्राथमिक शाळा (मुले) करिता एकही वर्ग खोली नसल्याने विद्यार्थ्यांना मुलींच्या वर्ग खोल्यांमध्ये बसून शिक्षणाचे धडे गिरवावे लागत आहेत. उर्दू शाळेकरता एकच वर्गखोली असल्याने येथेही मोठी अडचण आहे. आमदार रोहित पवार व आमदार राम शिंदे यांनी आपापले वाढदिवस येथे साजरा करून विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले.

यावेळी आमदार साहेब…आम्हाला वर्ग खोल्या द्या, अशी मागणी या दोन्ही आमदारांकडे येथील शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकार्‍यांसह विद्यार्थी, पालकांनी केली. नान्नज प्राथमिक शाळा मुले, मुली उर्दू या तीनही शाळा एकाच ठिकाणी आहेत. मुलांचा पट 123 असून येथे 5 शिक्षक कार्यरत आहेत. मात्र, या मुलांकरिता सध्या एकही वर्ग खोली नसल्याने येथील विद्यार्थ्यांना मुलींच्या वर्ग खोल्यांमध्ये बसावे लागते. तीन वर्षांपूर्वी जि.प.च्या आदेशानुसार नान्नज मुले 7 वर्गखोल्या, नान्नज मुली 2 वर्ग खोल्या व नान्नज उर्दू 1 वर्गखोली अशा एकूण दहा वर्ग खोल्या निर्लेखन करून पाडण्यात आल्या.

त्यामुळे तीन वर्षांपासून नान्नज मुले हे नान्नज मुलींच्या वर्ग खोल्यांमध्ये शिक्षण घेत आहेत. आधीच मुलींना वर्ग खोल्यांची कमतरता, त्यातच मुलांमुळे मुलींंची शाळा आता हाउसफुल झाली आहे. नान्नज उर्दूमध्ये 1 ते 4 वर्ग असून, ते ही एकाच वर्गात बसत आहेत. या ठिकाणी आणखी एक वर्ग खोलीची आवश्यकता आहे. सध्या तीनही शाळांच्या पटाच्या प्रमाणात मुलांना बसण्याची मोठी अडचण निर्माण झाली आहे. नान्नज मुले शाळेकरिता एका वर्गखोलीचे बांधकाम चालू आहे. जिल्हा परिषद (मुले) करिता अजून 4 वर्ग खोल्यांची आवश्यकता आहे.

गुणवत्ता असूनही दुर्लक्ष
शाळेची गुणवत्ता चांगली असून, विविध शालेय व सह शालेय उपक्रम येथे राबविले जातात. मात्र, केवळ विद्यार्थ्यांना बसण्यासाठी वर्ग खोल्याची कमतरता असल्याने विद्यार्थी,पालकांसह ग्रामस्थांमध्ये मोठी नाराजी आहे .

Back to top button