संभाजी महाराजांची जयंती शासकीय इतमामात व्हावी; विजय शिवतारे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र | पुढारी

संभाजी महाराजांची जयंती शासकीय इतमामात व्हावी; विजय शिवतारे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

सासवड; पुढारी वृत्तसेवा : धर्मवीर संभाजी महाराजांची जयंती शासकीय इतमामात साजरी करावी, अशी मागणी माजी राज्यमंत्री आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे उपनेते विजय शिवतारे यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत त्यांनी पत्रव्यवहार केला असून पुरंदर किल्ल्यावर हा सोहळा दरवर्षी करण्यात यावा असेही शिवतारे यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांना याबाबत लिहिलेल्या पत्रात शिवतारे यांनी शिवनेरी गडावर दरवर्षी होणार्‍या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा देखील संदर्भ दिला आहे.

ते म्हणाले, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती सोहळा दरवर्षी महाराष्ट्र शासनाच्या वतीने शिवनेरी किल्ल्यावर आयोजित केला जातो. या वेळी परंपरेनुसार सकाळी शिवाईदेवीची शासकीय महापूजा विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्या हस्ते केली जाते. त्यानंतर सकाळी 10 वाजता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा इतर मंत्री यांच्यासमवेत शिवजन्माचा पाळणा, पोलिस दलाकडून मानवंदना आणि पुतळ्याला अभिवादन असे कार्यक्रम होतात. त्याच धर्तीवर छत्रपती संभाजी महाराजांचा जयंती सोहळा दरवर्षी 14 मे रोजी व्हावा, अशी तमाम शंभूभक्तांची मागणी आहे.

ते पुढे म्हणाले, मी स्वतः पुरंदरच्या मातीतील मावळा आणि शंभूभक्त आहे. माझ्या मातृभूमीत पुरंदर किल्ल्यावर संभाजी महाराजांचा जन्म झाला, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. धर्मवीर संभाजी महाराजांचे कर्तृत्व, त्यांचे शौर्य, त्यांचा स्वधर्माभिमान आणि महत्त्वाचे म्हणजे स्वराज्याप्रती असलेली निष्ठा या सर्व बाबींनी महाराज इतिहासात अजरामर झाले आहेत. त्यामुळे अशा महान व्यक्तिमत्वाची जयंती त्यांच्या जन्मस्थळी म्हणजेच पुरंदर किल्ल्यावर शिवजयंतीप्रमाणेच शासकीय इतमामात साजरी केली जावी, अशी मागणी आम्ही सर्व पुरंदरवासी करीत आहोत. मुख्यमंत्री याबाबत सकारात्मक निर्णय घेतील असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

Back to top button