थोरातांना धक्का, विखेंनाही शह; देवेंद्र फडणवीसांची मास्टरमाईंड खेळी

थोरातांना धक्का, विखेंनाही शह; देवेंद्र फडणवीसांची मास्टरमाईंड खेळी
Published on
Updated on

पडद्याआड : संदीप रोडे, नगर

विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघावर 12 वर्षांपासून बस्तान बसविलेल्या काँग्रेसचा पत्ता कट करण्यासोबतच कुुटुंबातच बंडखोरी घडवून आणत काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते, माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरातांना भाजपने जोरदार धक्का दिला. त्याचसोबत दिल्लीश्वरांशी जवळीकता असलेल्या विखे पिता-पुत्राचा शब्द डावलत त्यांनाही भाजप प्रदेश नेत्यांनी शह दिला. या खेळीमागे दुसरे तिसरे कोणी नसून भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच असल्याचेही आता समोर येत आहे. नााशिक पदवीधर निवडणुकीच्या रिंगणात कोणीही विजयी झाला, तरी तो अपक्ष असेल. त्याचा फायदा भविष्यात भाजपला विधान परिषदेत नक्कीच होईल. विधान परिषद सभापतिपदाच्या द़ृष्टीने फडणवीस यांनीही मुत्सद्दी खेळी खेळल्याचे दिसत आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक सत्यजित तांबे यांच्या बंडखोरीने चर्चेत आली. काँग्रेसने विद्यमान आ. डॉ. सुधीर तांबे यांची उमेदवारी पक्षातर्फे घोषित करत त्यांना एबी फॉर्मही दिला; मात्र डॉ. तांबे यांनी ऐनवेळी पक्षादेश डावलत पुत्रप्रेमाला प्राधान्य दिले. त्यामुळेच सत्यजित तांबे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. सत्यजित हे माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांचे भाचे आहेत. आ. थोरात हे मुंबईत रुग्णालयात उपचार घेत असताना काँग्रेसला नाशिकमध्ये दगाफटका झाला. तांबे पिता-पुत्रांनी आ. थोरात यांनाही अंधारात ठेवल्याचे समोर आले. सत्यजित तांबे यांच्या 'सिटीझनविल' या मराठी अनुवादीत पुस्तक प्रकाशनावेळीच फडणवीस यांनी 'सत्यजित सारखे नेते किती दिवस बाहेर ठेवणार, चांगली माणसं जमवायचीच असतात', असे सांगत सत्यजित यांना ऑफर दिली होती. तेव्हापासून सत्यजित व फडणवीस यांची राजकीय जवळीकता आणखी वाढली होती. पक्षाने डॉ. तांबे यांना उमेदवारी दिली, तरीही त्यांनी पक्षादेशाला तिलांजली देत काँग्रेसशी दगाफटका करत पुत्रप्रेमाला प्राधान्य दिले. राजकीय चढ-उताराच्या काळात आ. थोरात हे काँग्रेसशी एकनिष्ठ राहिले. आता त्याच थोरातांच्या कुटुंबातच बंडखोरी होऊन काँग्रेस तोंडघशी पडली. काँग्रेसचा अधिकृत उमेदवार निवडणूक रिंगणात नसेल, याची पुरेपूर काळजी भाजप नेतृत्वाने सत्यजित यांच्यावर जाळे टाकत घेतली.

भाजपकडून हिसकावून घेतलेल्या या मतदारसंघावर वर्चस्व निर्माण करणार्‍या काँग्रेसचे नामोनिशान मिटविण्यासोबतच आ. थोरातांनाही फडणवीस यांनी धक्का दिला. सत्यजित तांबे किंवा दुसरा कोणताही उमेदवार विजयी झाला, तरी तो अपक्षच असणार आहे. त्याचा फायदा भाजपला विधान परिषदेत होईल, हे नक्कीच! विखे समर्थक धनंजय जाधव यांना उमेदवारी न देण्याच्या खेळीने महसूलमंत्री विखे-पाटील व त्यांचे पुत्र खा. डॉ. सुजय विखे-पाटील यांनाही शह देण्यात फडणवीस यशस्वी ठरल्याची चर्चा भाजपअंर्तगत गोटात सुरू आहे. दिल्लीश्वरांशी जवळीकता झालेल्या विखेंचा शब्द डावलण्यासोबतच त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी आ. बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे यांना जवळ घेत काँग्रेसचा सफाया आणि थोरातांच्या कुटुंबात कलह निर्माण करण्यासोबतच नगर जिल्ह्याचे राजकीय समीकरण बदलविण्याचा मास्टरमाईंड गेम फडणवीस यांनी यशस्वीपणे खेळला, हे तितकेच खरे!

सत्यजित भाजपवासी?

तांबे पित-पुत्रांनी काँगे्रसशी दगाफटका केला. सत्यजित तांबे यांना पाठिंबा देणार नाही, अशी भूमिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेतली आहे. सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरणे आणि निवडणूक बिनविरोधासाठी भाजपचा पाठिंबा मागणे, हे सर्व पूर्वनियोजित असल्याचे पटोले यांचे म्हणणे आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या घडामोडीचा अहवाल पटोले यांनी हायकमांडला पाठविला असून त्यांच्या निर्देशानुसार कारवाई करण्याचे घोषित केले आहे. आता अपक्ष उमेदवार असलेले सत्यजित तांबे हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, हायकमांडला भेटून पाठिंबा मागतील; पण तो मिळणार नाही. त्यामुळे ते पाठिंब्यासाठी भाजपकडे जातील. भाजप त्यांना पाठिंबा देत पुरस्कृत करतील आणि तांबे हे भाजपवासी होतील, हेच दोन-चार दिवसांत समोर येईल, असेच चित्र सध्या तरी आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news