Valentine Week : ‘रोज डे’ ते ‘व्हॅलेंटाईन डे’… प्रेम व्यक्त करण्याचा नवा ट्रेंड | पुढारी

Valentine Week : 'रोज डे' ते 'व्हॅलेंटाईन डे'... प्रेम व्यक्त करण्याचा नवा ट्रेंड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Valentine Week : प्रेम हा शब्‍द जगायला शिकवतो. म्‍हणून तर प्रेम व्यक्त करण्यासाठी कोणत्या दिवसाची वाट पाहावी लागत नाही. कारण प्रेम व्यक्त करण्यासाठी चेहऱ्यावरचे हसूदेखील पुरेशी असते. नजरेचा एक कटाक्ष प्रेमाची कबूली देण्यासाठी पुरेसा असतो; पण काळाने रुपडे पालटले आहे. त्याप्रमाणे प्रेम व्यक्त करण्याच्या कल्पना देखील बदलल्या आहेत. हॅशटॅगच्या जगात भावना व्यक्त करायला नानाविविध ‘डे’ ची संस्कृती आली आहे. धावपळीच्या दुनियेत व्यक्त होण्यासाठी हे ‘डे’ मदत करतात.

नेहमीप्रमाणे फेब्रुवारी महिना आला की, तरुणाईला वेध लागतात ते अशाच एका प्रेमाच्या दिवसाचे म्हणजे ‘व्हॅलेंटाईन डे’ चे.  (Valentine Week ). पण याआधी असेच काही डे येतात. ते साजरा करण्याचा उत्साह ‘व्हॅलेंटाईन डे’ इतकाच असतो. ‘व्हॅलेंटाईन’ वीकमध्ये शुभेच्छा संदेश, चॉकलेट, फुले, अशा विविध आकर्षक, आवडत्या वस्तू जवळच्या व्यक्तीला देऊन प्रेम व्यक्त करण्याचा नवा ट्रेंड रुजला आहे.

तरुणाईला आकर्षित करण्यासाठी कॉफी मग, हार्टशेप पिलो, फोटो फ्रेम, म्यूझिकल हार्ट, लव्ह कोटेशन फ्रेम, मुलींसाठी मेकअपचे साहित्य, फ्लॉवर बास्केट, विविध फ्लेवरच्या चॉकलेट, भेट कार्ड, ज्वेलरी अशा विविध वस्तूंनी बाजारपेठा तर गजबजलेल्या आहेतच; पण त्याचसोबत ऑनलाईन शॉपिंग साईटही या प्रेमाच्या रंगता नटलेल्या दिसत आहेत. अगदी १०० रुपयांपासून ते लाखो रुपयांपर्यंतच्या वस्तू बाजारात उपलब्ध आहेत. फेब्रुवारीतील ७ तारखेपासूनच विविध डेजना सुरुवात होते. गल्लीपासून कॉलेज कॅम्पसपर्यंत सगळीकडे डेजची लगबग पाहायला मिळते. तुम्हाला माहिती नसेल तर कधी कोणता डे आहे. तर जाणून घ्या ‘रोझ डे’ ते ‘व्हॅलेंटाईन डे’ चा प्रवास…

संबंधित बातम्या

‘रोझ डे’(Rose Day)

‘व्हेलेंटाईन डे’ हे एका दिवसाचं सेलिब्रेशन नसतं तर आठवडाभर प्रत्येक दिवशी एक खास दिवस सेलिब्रेट केला जातो. या सेलिब्रेशनमध्ये पहिल्याच दिवशी रोझ डे असतो. ७ फेब्रुवारी हा दिवस रोझ डे (Rose Day) म्हणून साजरा केला जातो. प्रेमाचं आणि मैत्रीचं नातं जोडण्यासाठी पहिल्या दिवशी गुलाब देऊन आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या जातात. (Valentine Week )

‘प्रपोज डे’ (Propose Day) 

कुणाला प्रपोज करायचे असेल आणि ‘व्हॅलेंटाइन डे’ ची वाट बघताय?. वाट न पाहता ‘प्रपोज डे’ ला आपल्या आवडत्या व्यक्तीस प्रपोज करा. प्रपोज करताना समोरच्या व्यक्तीच्या मतांचा आदर करा. हा दिवस ८ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. या दिवसाचे तरुणाईमध्ये विशेष महत्त्‍व आहे.

‘चॉकलेट डे’ (Chocolate Day) 

प्रेमाच्या गोड प्रवासात ‘चॉकलेट डे’ ला वेगळेच महत्त्व आहे. सर्व वयाचे लोक खास मित्रांसोबत चॉकलेट दिवस साजरा करतात. चॉकलेट डे सर्वांचा आवडता दिवस असतो कारण प्रत्येक व्यक्ती आपल्या प्रियजनांना, मित्र, व्हॅलेंटाइन इत्यादींसोबत चॉकलेट देणे आणि घेणे पसंत करतात. म्हणून ‘व्हेलेंटाईन डे’ दिवसात ९ फेब्रुवारी रोजी ‘चॉकलेट डे’ ला महत्व प्राप्त झाले आहे.

‘टेडी डे’ (Teddy Day)

या दिवशी लोक आपल्या जवळच्या व्यक्तीला टेडी (Teddy) गिफ्ट करून आपल्या प्रेमाची जाणीव करून देतात. आपल्या प्रेमाची जाणीव करून देणारा टेडी पत्नी, पती, मित्र, मैत्रीण, बहिण, भाऊ आणि इतर आवडीच्या लोकांना देऊ शकतो. मुलींना टेडी फार पसंत असतात त्यामुळे ‘तिला’ खूश करण्यासाठी टेडी भेट देण्याचा चांगला पर्याय आहे. हा दिवस १० फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो.

‘प्रॉमिस डे’ (Promiss Day) 

वचन आणि प्रेम यांचे जुने नाते आहे. कारण वचनांशिवाय प्रेम पूर्णच होत नाही, असे म्हणतात. व्हॅलेंटाईन वीक मधला वचनाची आठवण करुन देणारा आणि वचनाचे महत्त्व सांगणारा ‘प्रॉमिस डे’ला वचन दिले जाते किंवा घेतले जाते. प्रेमाचे शिखर शपथांच्या आणि वचनांच्या पायावर रचले जाते. प्रेमाचे हे शिखर सर करण्यासाठी दिलेले वचन पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो. १० फेब्रुवारी रोजी हा दिवस साजरा केला जातो.

‘हग डे’ (Hug Day) 

आपल्या आवडत्या व्यक्तीच्या मिठीत सामावून जाण्यासारखे सुख नाही. एक जादूची झप्पी सारे दु:ख विसरण्यास मदत करते. यासाठीच १२ फेब्रुवारीला ‘हग डे’ साजरा केला जातो. आपल्या आवडत्या व्यक्तीच्या मिठीत सर्व जगाचे आपुलकी, विश्वास, अतूट बंधन आणि सुरक्षेची भावना येते.

‘किस डे’ (Kiss Day) 

‘किस डे’. आपल्या आवडत्या व्यक्तीप्रती मनात असलेल्या भावनांची कोमल अभिव्यक्त करण्यासाठी किस हा सशक्त पर्याय आहे. निरागस बाळाचा पापा घेतल्यावरही ते किती सुखावते आणि त्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलते याचा अनुभव सगळ्यांनाच असतो. हाच आपुलकीचा आविष्कार प्रेमाच्या व्यक्तीबरोबर केल्यास ती सुखावणार नाही का? हा दिवस १३ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो.

‘व्हॅलेंटाईन डे’ (Valentine’s Day) 

प्रेम व्यक्त करण्याचा हा अनोखा दिवस १४ फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाईन डे. या दिवशी अनेक दिवसांपासून लपवून ठेवलेलं प्रेम व्यक्त करतात. तसेच आपल्या प्रियजनांना खास सरप्राईज देऊन हा दिवस साजरा केला जातो. या प्रेमाच्या प्रवासात या ‘डे’च्या निमित्ताने का होईना एकमेकांसाठी वेळ काढला जातो. धावपळीच्या जगात ‘हे’ डेज नाती टिकविण्यासाठी उपयोगी पडतात. रोज डे पासून सुरु झालेला प्रेमाचा प्रवास ‘व्हॅलेंटाईन डे’ वर येवून थांबतो…म्‍हणजेच येथूनच सुरुवात होते आयुष्‍यातील प्रेमाच्‍या प्रवासाला….

हेही वाचलंत का?

Back to top button