Goa Election : पैसे वाटपाच्या संशयावरून म्हापशात दोन गटांत बाचाबाची | पुढारी

Goa Election : पैसे वाटपाच्या संशयावरून म्हापशात दोन गटांत बाचाबाची

म्हापसा ःपुढारी वृत्तसेवा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात येत असतानाच सध्या राजकीय वातावरणही तापलेले आहे. त्यातच म्हापशात पैशांच्या वाटपाच्या संशयावरून बुधवारी मध्यरात्री भाजप-काँग्रेसच्या या दोन्ही राजकीय गटांत झालेल्या जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली. त्यामुळे शहरातील वातावरण वेळ तंग बनले. म्हापसा पोलिस स्थानकाबाहेर मध्यरात्री सुमारे शंभर जणांचा जमाव जमला होता. याप्रकरणी पोलिसांनी काँग्रेसचे उमेदवार तथा नगरसेवक सुधीर कांदोळकर तसेच एका अज्ञाताविरुद्ध आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे. यावेळी पोलिस निरीक्षक निनाद देऊळकर, पोलिस उपनिरीक्षक सुनील पाटील यांनी आपल्या सहकार्यांच्या साहाय्याने वातावरण नियंत्रणात आणले. गंगानगर-खोर्ली भागात सुधीर कांदोळकर यांनी पैसे वाटप केले असा आरोप करीत भाजपच्या युवा कार्यकर्त्यांनी त्याठिकाणी गोंधळ घातला. हा प्रकार मंगळवारी रात्री 11.10 वाजता घडला. याची माहिती मिळताच, पोलिस व भरारी पथक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी एका कारमध्ये खाली पाकिटांचे बंडल सापडले. (Goa Election)

मात्र, या पाकिटांमध्ये पैसे नव्हते. शिवाय पोलिसांना आमिषांच्या स्वरूपात इतर कुठलेच आक्षेपार्ह साहित्य सापडले नाही. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी घटनास्थळी पोलिसांसमोर संबंधित काँग्रेस कार्यकर्त्यांची झडती घेण्याची मागणी लावून धरली. तसेच ज्या घरात ते जाऊन आले आहेत, त्या प्रत्येक घरांची झडती घेण्याची मागणी केली. इतक्या रात्री उमेदवार आपल्या कार्यकर्त्यांसोबत कसे व का इथे फिरताहेत, असा सवाल या भाजपवाल्यांनी लावून धरला. त्यामुळे घटनास्थळी वातावरण तंग बनले. यावेळी दोन्ही राजकीय समूहांच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली, काहीमध्ये धक्काबुक्की झाली. हे प्रकरण अरेरावीपर्यंत जात असल्याचे पाहून पोलिसांनी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना बाजूला केले. या घटनेची खबर मिळताच पोलिस स्थानकाबाहेर काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले. यात विजय भिके, वरद म्हार्दोळकर, नगरसेविका अन्वी कोरगांवकर, अमेय कोरगांवकर आदींचा समावेश होता, तर भाजपचे माजी नगरसेवक राजसिंह राणे, तन्वेश केणी व इतर कार्यकर्ते हजर होते. (Goa Election)

दरम्यान, आचार संहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी काँग्रेसचे म्हापसा उमेदवार सुधीर कांदोळकर तसेच एका अज्ञाताविरुद्ध भादंसंच्या कलम 188 अन्वये गुन्हा नोंदविला. याप्रकरणी म्हापसा भरारी पथकाचे प्रमुख अँटोनियो एफ. ग्रू हे तक्रारदार आहेत. पुढील तपास म्हापसा पोलिस करीत आहे. घटनास्थळी वातावरण तंग मी कुठलेही पैसे वाटप केलेले नाही, केवळ इथे माझ्या एका मित्राजवळ सल्ला घेण्यास आलो होतो, असा दावा सुधीर कांदोळकर यांनी पोलिसांसमोर केला. मात्र, इतक्या रात्री कोणता सल्ला घेण्यास आला आहात, असे म्हणत भाजपच्या युवा कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. संबंधितांवर कारवाई करा, अशी मागणी लावून धरली. घटनास्थळी वातावरण तंग झाल्याने पोलिसांनी सर्वांना तेथून जाण्यास सांगितले. तसेच सुधीर कांदोळकरांना पोलिस वाहनात बसवून स्थानकावर आणले. (Goa Election)

हेही वाचलतं का?

Back to top button