मुंबई; पुढारी ऑनलाईन
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पतधोरण समितीने (Reserve Bank of India's Monetary Policy) पुन्हा एकदा रेपो दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. रेपो दर ४ टक्के इतकाच राहील, असे आरबीआयचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी आज गुरुवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले. याशिवाय रिव्हर्स रेपो दर ३.३५ टक्के एवढाच राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
अर्थव्यवस्थेतील व्यत्यय मर्यादित करण्याचा प्रयत्न आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षात जीडीपी वृद्धी दर ७.८ टक्के राहील, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. RBI ने २०२१-२२ मधील आर्थिक वर्षासाठी सीपीआय महागाई दर ५.३ टक्के तर २०२२-२३ मधील वर्षासाठी महागाई दर ४.५ टक्के राहण्याचा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.
भारत अर्थव्यवस्थेतील सुधारणांसाठी वेगळा मार्ग अवलंबत आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अंदाजानुसार भारत मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये वर्षानुवर्षे सर्वात वेगाने वाढण्यास नेहमी सज्ज असतो. यामुळे भारतीय वित्तीय व्यवस्था अगदी लवचिक राहिली आहे. तसेच गुंतवणूक वाढत असल्याचे शक्तिकांत दास यांनी नमूद केले आहे.
महामारीचा बँकांवर होणार्या परिणामाबाबत आपण सावध राहिले पाहिजे. जोखीम व्यवस्थापन धोरणे आणखी मजबूत करण्यासाठी बँकांना योग्य तो सल्ला दिला जाईल, असेही ते म्हणाले.
दरम्यान, आरबीआयने पतधोरण जाहीर करताच शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४०० अंकांनी उसळला. तर निफ्टी १७,५५० वर जाऊन व्यवहार करत आहे. सेन्सेक्स सकाळच्या सत्रात ५८, ८०० वर जाऊन व्यवहार करत आहे.