शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदे; पक्षप्रतोदपदी सुनील प्रभू | पुढारी

शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदे; पक्षप्रतोदपदी सुनील प्रभू

मुंबई : पुढारी ऑनलाईन

शिवसेना विधिमंडळ गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेच्या विधिमंडळ गटनेतेपदाचा प्रस्ताव मांडला आणि सर्व आमदारांनी त्या प्रस्तावाला मंजुरी दिली. यामुळे शिंदे हेच शिवसेनेच्या गटनेतेपदी कायम राहिले आहेत. तर सुनील प्रभू यांची विधानसभेतील शिवसेनेच्या पक्षप्रतोदपदी निवड करण्यात आली आहे. 

आज शिवसेना भवनात नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत शिवसेना गटनेतेपदाची निवड प्रक्रिया पार पडली. राज्यात सत्ता स्थापनेचा पेच निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर आज शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित आमदारांची बैठक झाली.

दरम्यान, आदित्य ठाकरे, शिवसेना नेते सुभाष देसाई, दिवाकर रावते, रामदास कदम, गटनेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे सर्व नवनिर्वाचित आणि सहयोगी आमदार आज दुपारी ३.३० वाजता राजभवन येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत.

भाजपने काल विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस तर राष्ट्रवादीने अजित पवार यांची निवड केली आहे. तर आज शिवसेनेने आज आपला गटनेता निवडला. 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्यामुळे प्रभावित होऊन १९८०च्या दशकात शिवसेनेच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांनी राजकीय प्रवासाला सुरुवात केली. १९८४ साली किसननगर येथे शाखाप्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली. शिवसैनिक या नात्याने अनेक आंदोलनांमध्ये त्यांचा सहभाग राहिला आहे. १९९७ साली पहिल्यांदा ठाणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले. सन २००१ मध्ये सभागृहनेतेपदी त्यांची निवड झाली. सन २००४ मध्ये त्यावेळच्या ठाणे विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा ते आमदार म्हणून विजयी झाले. सन २०१४ साली त्यांनी विजयाची हॅटट्रिक केली आणि त्यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली. डिसेंबर २०१४ मध्ये त्यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आणि एमएसआरडीसीचे मंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला. जानेवारी २०१९ मध्ये त्यांची आरोग्यमंत्रीपदी निवड झाली.

Back to top button