

पुढारी ऑनलाईन डेस्क :
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० सामन्यात शुक्रवारी भारताने मोठा विजय मिळवत पाच सामन्यांच्या मालिकेत बरोबरी साधली. आता रविवारी या मलिकेतील पाचवा सामन्याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. टी-२० मालिकेतील चौथा सामना भारतासाठी महत्त्वपूर्ण होता. तो जिंकला तरच मालिकेतील आव्हान कायम राहणार होते. त्यामुळे टीम इंडियातील प्रत्येक खेळाडूसमोर मोठे आव्हान होते. मात्र कालच्या सामन्यात दिनेश कार्तिक (Dinesh Karthik ) याने दमदार कामगिरी केली. त्याने चौथ्या टी-२० सामन्यात २७ चेंडूत ५५ धावा फटकावल्या. ही कामगिरी करताना त्याने भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याचा विक्रम मोडीत काढला आहे .
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्यात दिनेशची खेळी महत्त्वपूर्ण यासाठी की, या सामन्यात भारताने टॉस हरला होता. खेळपट्टीचा अंदाज घेत दक्षिण आफ्रिकेने प्रथम गोलंदाजी घेतली. भारताची सुरुवात खराब झाली. सलामीवीर ऋतुराज गायकवाड (५), श्रेयस अय्यर ( ४) आणि ईशान किशन (२७) धावांवर बाद झाले होते. यानंतर कर्णधार ऋषभ पंतही केवळ १७ धावांवर बाद झाला.भारतीय संघाच्या ४ बाद ८१ धावा असताना दिनेश कार्तिक सहाव्या स्थानावर फलंदाजीसाठी आला. त्याने ९ चौकार आणि २ षटकार फटकावत केवळ २७ चेंडूत ५५ धावांची खेळी केली. हार्दिक पांड्याबरोबर ३३ चेंडूत ६५ धावांची भागीदारीही केली. या दोघांच्या खेळीमुळे भारत सहा गडी गमावत १६९ धावा केल्या.
दिनेश कार्तिक याने आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्याचे पदार्पण दक्षिण आफ्रिकेमध्ये डिसेंबर २००६ मध्ये केले होते. सहाव्या स्थानावर सामन्यात त्याने नाबाद ३१ धावा फटकावल्या होत्या. त्यानंतर त्याने तब्बल १६ वर्षानंतर प्रथमच अर्धशतकी खेळी केली. विशेष म्हणजे, या खेळीमुळे त्याने महेंद्रसिंग धोनीच्या नावावरील विक्रम मोडला. यापूर्वी धोनीने २०१८ मध्ये वयाच्या ३६व्या वर्षी ५० धावांची खेळी केली होती. आता दिनेश कार्तिक टी-२० मध्ये सर्वाधिक वय असताना अर्धशतक झळकवणारा खेळाडू ठरला आहे. दिनेश याने ३७ वर्ष १६ दिवस वयात ही कामगिरी केली. तर महेंद्रसिंग धोनी याने २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच ३६ वर्ष २२९ दिवस असताना अर्धशतक झळकावले होते. शिखर धवन याने २०२० मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३५ वर्ष १ दिवस असताना अर्धशतकी खेळी केली होती.
२०१९ विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत टीम इंडियाचा पराभव झाला आणि यानंतर काही काळ कार्तिक खेळापासून लांब झाला. ताे क्रिकेट समालोचन (कॉमेंट्री) करु लागला होता. यावेळी ब्रिटनमधील काही क्रिकेट समीक्षकांनी त्याचे क्रिकेटमधील करिअर संपले असे सांगायला सुरुवात केली होती. मात्र यानंतर तो नवी स्वप्न घेवून मैदानात उतरला. तामिळनाडू संघाला नव्या उंचीवर नेले. तसेच आयपीएल २०२२ मध्ये ३३० धावा करत आपलं क्रिकेट संपलेले नाही, हे त्याने टीकाकारांना दाखवून दिले हाेते.
दिनेचे वय झालं आहे, आता या वयात त्याला टीम इंडियाकडून टी-२० खेळायचे आहे, असे म्हणत अनेकांनी दिनेश कार्तिकची खिल्ली उडवली होती. काहींनी हा केवळ एका मालिकेतच चांगली कामगिरी करतो, अशीही बडबड केली होते. चौहीबाजूंनी टीका होत असताना दिनेशने केवळ आपल्या कामगिरीवर लक्ष केंद्रीत केले. त्याने विश्लेषकांच्या टीकेला कधीच भीक घातली नाही. तब्बल तीन वर्षानंतर त्याने टी-२० साठी टीम इंडियात पुनरागम केले. आपल्या दमदार खेळीने टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले.
हेही वाचा :