Cricket T-20 : असं फक्‍त क्रिकेटमध्‍येच घडू शकतं, ३० धावात संघ गुंडाळला आणि….. | पुढारी

Cricket T-20 : असं फक्‍त क्रिकेटमध्‍येच घडू शकतं, ३० धावात संघ गुंडाळला आणि.....

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : क्रिकेट हा ‘अनिश्‍चिती’चा खेळ आहे,  असं का म्‍हटलं जातं? या प्रश्‍नाचे उत्तर श्रीलंकेतील एका टी-२० सामन्‍यावेळी क्रीडाप्रेमींना पुन्‍हा एकदा मिळालं. ( Cricket T-20 ) या सामन्‍यातील कमालीच्‍या चढउताराने प्रेक्षक आवाक झालेच. त्‍याचबराेबर त्‍यांच्‍यासाठी हा सामना अविस्‍मरणीय ठरला.

श्रीलंकेत मेजर क्‍लब टी२० स्‍पर्धेचे आयोजन करण्‍यात आले आहे. टी-२० क्रिकेट म्‍हटलं की थरार आलाच. सामन्‍यात धमाकेदार फटकेबाजी आणि शेवटच्‍या चेंडूपर्यंत रंगणारा सामना असेच चित्र क्रिकेट प्रेमींना अपेक्षित असतं. मात्र श्रीलंकेतील टी२० स्‍पर्धेत संपूर्ण संघच ३० धावांवर बाद झाला. एवढी नीच्‍चांकी धावसंख्‍या म्‍हटलं की, सामना एकतर्फी होणार असेच सर्वांना वाटलं.;पण असे काही झालं की, तुम्‍ही कल्‍पनाही करु शकणार नाही.

Cricket T-20 : ६ षटकांचा सामना, ३० धावांमध्‍ये संघ गुंडाळला

श्रीलंकेतील मेजार क्‍लब टी-२० स्‍पर्धेत कालुतारा टाउन क्‍लब आणि गॉल क्रिकेट क्‍लबमध्‍ये सामना झाला. पावसामुळे हा सामना ६ षटकांचा करण्‍यात आला. गॉल क्रिकेट क्‍लबने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या संघाने ६ षटकांमध्‍ये ९ गडी गमावत केवळ ३० धावा केल्‍या. संघाचे चार फलंदाज शून्‍यावर बाद झाले. विशेष म्‍हणजे संघाच्‍या ३० धावांमध्‍ये अतिरिक्‍त धावा ६ होत्‍या.

हा सामना कालुतारा क्‍लब सहजच ३० धावा करेल, हे सांगण्‍याची कोणत्‍याही क्रीडा विश्‍लेषकाची गरज नव्‍हती. कालुतारा क्‍लबचे फलंदाजांची कामगिरी गॉल क्‍लबच्‍या फलंदाजांपेक्षाही खराब झाली. या संघाचा एकही खेळाडू दाेन आकडी धावसंख्‍या करु शकला नाही. कालुतारा क्‍लबलाही ८ धावा अतिरिक्‍त मिळाल्‍या यामुळे ९ गडी गमावत या संघानेही ३० धावा केल्‍या आणि  अखेर हा सामना अनिर्णितच राहिला.

या सामन्‍यात दोन्‍ही संघांनी ६ षटकांमध्‍ये ३० धावा केल्‍या. १२ षटकांमधील केवळ दोनच षटक अशी होती की ज्‍यामध्‍ये विकेट गेली नाही. बाकी प्रत्‍येक षटकात  फलंदाज बाद झाले . तसेच दोन्‍ही संघांमधील डावखुर्‍या गोलंदाजांनी कमालच केली. या सामन्‍यातील १५ बळी हे डावखुर्‍या गोलंदाजांनी घेतले. या सामन्‍यात ४ फलंदाज धावचीतही झाले. कालुतारा क्‍लब संघाचा फिरकीपटू इंशाका सिरिवर्दनाने २ षटकांमध्‍ये ५ धावा देत ५ बळी घेतले.

सुपर ओव्‍हर झाली नाही

टी-२० सामना  अनिर्णित राहिला तर सुपर ओव्‍हरने सामन्‍याचा फैसला केला जातो. मात्र श्रीलंकेतील या लीगमधील साखळी सामन्‍यात सुपर ओव्‍हरचा नियम नाही. त्‍यामुळे कालुतारा टाउन क्‍लब आणि गॉल क्रिकेट क्‍लबमधील सामना अनिर्णितच राहिला.

हेही वाचा: 

 

Back to top button