Cricket History : 10 महान गोलंदाज ज्यांनी कधीच ‘वाईड बॉल’ टाकला नाही!

Cricket History : 10 महान गोलंदाज ज्यांनी कधीच ‘वाईड बॉल’ टाकला नाही!
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Cricket History : क्रिकेटला 'जेंटलमेन्स गेम' असं म्हणतात. तो अनिश्चिततेचा खेळ आहे. सामन्यात कधी काय होईल हे कोणच भाकीत करू शकत नाही. कधी कधी एखादा संघ विजयाच्या उंबठ्यावर असूनही सामना गमावतो, तर पराभवाच्या छायेत असलेला संघ तो सामना रोमहर्षकरित्या जिंकतो. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, क्रिकेटमध्ये फलंदाजांसह गोलंदाजांची भूमिका खूप महत्त्वाची असते.

गोलंदाजांसमोर विकेट घेण्याचे आणि धावा न देण्याचे आव्हान असते, पण अतिरिक्त धावा न देण्याचे दडपणही गोलंदाजांवर असते. नो आणि वाईड बॉल दिल्याने फलंदाजी करणाऱ्या संघाला अतिरिक्त धाव तर मिळतेच, पण अतिरिक्त चेंडूही टाकावा लागतो. याच अतिरिक्त धावांमुळे एकाद्या संघावर सामना गमावण्याची वेळ ओढावते. (Cricket History)

पण तुम्हाला माहित आहे का की, क्रिकेटच्या इतिहासात असे काही गोलंदाज आहेत ज्यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत एकही वाईड बॉल टाकलेला नाही. हे आकडे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे खरे आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या गोलंदाजांनी हा पराक्रम केला आहे. दरम्यान, 1980 पूर्वीचा डेटा तितका विश्वासार्ह नाही कारण त्यावेळी नो बॉल आणि वाईड मोजण्याचे तंत्र आजच्यासारखे चांगले नव्हते. (Cricket History)

1. फ्रेड ट्रुमन (इंग्लंड)

फ्रेड ट्रुमन यांनी 1948 पासून दोन दशकांहून अधिक काळ इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले. क्रिकेटच्या इतिहासातील महान गोलंदाजांमध्ये त्याची गणना केली जाते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत 67 कसोटी सामने खेळले आणि 307 बळी घेतले. त्यांनी आपल्या कारकिर्दीत कधीही वाईड बॉल टाकला नाही.

2. बॉब विलिस (इंग्लंड)

बॉब विलिस यांनी 1971 ते 1984 या काळात इंग्लंडच्या गोलंदाजीचे नेतृत्व केले. 1981 च्या ॲशेस मालिकेतील जवळपास गमावलेला सामना त्यांनी केवळ 43 धावांत 8 विकेट घेत जिंकला. विलिस यांनी 90 कसोटी सामने खेळले आणि 325 बळी घेतले. यादरम्यान त्यांनी कधीही वाईड बॉल टाकला नाही.

3. डेनिस लिली (ऑस्ट्रेलिया)

डेनिस लिली हे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांपैकी एक आहेत. 1984 मध्ये जेव्हा ते निवृत्त झाले तेव्हा त्यांच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम होता. 13 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत लिली यांनी 70 कसोटी आणि 63 एकदिवसीय सामने खेळले. यादरम्यान त्यांनी 355 आणि 103 विकेट घेतल्या आणि कधीही वाईड बॉल टाकला नाही.

4. इयान बोथम (इंग्लंड)

इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू इयान बॉथम हे क्रिकेट इतिहासातील महान अष्टपैलू खेळाडूंपैकी एक मानले जातात. 1980 च्या दशकात बोथम यांनी बॉल आणि बॅटच्या जोरावर जबरदस्त खेळ केला. ते मॅच-विनर म्हणूनही ऑळखले जात होते. कसोटी सामन्यात 10 विकेट घेणारा आणि शतक झळकावणारा बोथम हा पहिला खेळाडू होता. त्यांनी आपल्या कारकिर्दीत 102 कसोटी आणि 116 एकदिवसीय सामने खेळले. यादरम्यान त्यांनी 383 आणि 145 विकेट घेतल्या. एवढी प्रदीर्घ कारकीर्द असूनही बोथम यांनी कधीही वाईड बॉल टाकला नाही.

5. इम्रान खान (पाकिस्तान)

या यादीत पाकिस्तानचा विश्वचषक विजेता कर्णधार इम्रान खान यांचेही नाव आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत 88 कसोटी आणि 175 एकदिवसीय सामने खेळले. यादरम्यान त्यांनी अनुक्रमे 362 आणि 182 विकेट घेतल्या. इम्रान खान देखील अशा गोलंदाजांपैकी एक आहे ज्यांनी आपल्या कारकिर्दीत कधीही वाईड गोलंदाजी केली नाही.

6. गॅरी सोबर्स (वेस्ट इंडिज)

सर गारफिल्ड सोबर्स हे वेस्ट इंडिजचे महान खेळाडू होते. त्यांना क्रिकेटचा महान अष्टपैलू खेळाडू म्हटले जाते. डॉन ब्रॅडमन यांनी सोबर्स यांना एकेकाळी 'फाइव्ह इन वन क्रिकेटर' म्हटले होते. फलंदाजी आणि गोलंदाजीसोबतच ते चपळाईने यष्टिरक्षणही करत असे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत 93 कसोटी आणि एक वनडे सामना खेळला आणि एकूण 20660 चेंडू टाकले. पण त्यांनी एकही वाईड बॉल फेकला नाही.

7. डेरेक अंडरवुड (इंग्लंड)

डेरेक अंडरवुड हे डावखुरे ऑर्थोडॉक्स फिरकी गोलंदाज होते. त्यांचा इनस्विंग आर्म बॉल लेग बिफोर बॅट्समनना आऊट करण्यासाठी खूप प्रसिद्ध होता. त्यांची लाईन-लेन्थ इतकी चांगली होती की त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत कधीही अतिरिक्त म्हणून वाईड बॉल टाकला नाही. ते 1969 ते 1973 पर्यंत ते रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत 86 कसोटी आणि 26 एकदिवसीय सामने खेळले.

8. क्लेरी ग्रिमेट (ऑस्ट्रेलिया)

क्लेरी ग्रिमेट हे उत्कृष्ट फिरकी गोलंदाज होते. त्यांना फ्लिपरचे जनक म्हटले जाते. ग्रिमेट यांना पहिल्यांदा वेगवान गोलंदाज व्हायचे होते पण शाळेतील मित्राच्या सल्ल्याने ते फिरकी गोलंदाजीकडे वळले. त्यांनी वयाच्या 17 व्या वर्षी वेलिंग्टनसाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यावेळी न्यूझीलंड कसोटी क्रिकेट खेळत नव्हता. म्हणून ते 1914 मध्ये ऑस्ट्रेलियाला गेले. त्यांनी आपल्या कारकिर्दीत 37 कसोटी सामने खेळले, 216 विकेट्स घेतल्या पण कधीही वाईड बॉल टाकला नाही.

9. लान्स गिब्स (वेस्ट इंडिज)

लान्स गिब्स हे कसोटी क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी फिरकी गोलंदाज मानले जातात. ते अशा काही गोलंदाजांपैकी एक होते ज्यांचा इकॉनॉमी रेट प्रति षटक 2 धावांपेक्षा कमी होता. 300 कसोटी बळी घेणारे ते पहिले फिरकी गोलंदाज होते. त्यांनी वेस्ट इंडिजसाठी 3 एकदिवसीय आणि 79 कसोटी सामने खेळले आणि कधीही वाईड बॉल टाकला नाही.

10. रिचर्ड हॅडली (न्यूझीलंड)

या यादीत न्यूझीलंडचे माजी दिग्गज गोलंदाज सर रिचर्ड हॅडली यांचे नाव आहे. ते क्रिकेट इतिहासातील महान अष्टपैलू खेळाडू मानले जातात. 17 वर्षांच्या कारकिर्दीत त्याने 86 कसोटी सामने खेळले आणि 431 विकेट घेतल्या. याशिवाय त्यांनी 115 एकदिवसीय सामने खेळले, ज्यामध्ये त्यांनी 158 विकेट घेतल्या. रिचर्ड हॅडली यांनी त्यांच्या कारकिर्दीत कधीही वाईड बॉल टाकला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news