पतीचा खून : पत्नी, मुलासह ५ अटकेत | पुढारी

पतीचा खून : पत्नी, मुलासह ५ अटकेत

चिकोडी : पुढारी वृत्तसेवा 

पतीने पत्नीला अनैतिक संबंधाच जाब  विचारला असता पत्नी, मुलगा व प्रियकराने मिळून पतीचा खून केल्याची घटना रायबाग तालुक्यातील मायाक्का चिंचली शहरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी चिंचली येथील बाळेश श्रीकांत हारुगेरी, सचिन कुमार खोत, गीता कुमार खोत, बेळकुड (ता चिकोडी) येथील अप्पासाब जिनाप्पा  तपकीरे व संतोष नेमिनाथ तपकीरे अशा पाच जणांना अटक झाली आहे.

चिंचली येथील रहिवासी कुमार रामू खोत ( वय 39) यांची पत्नी गीता यांनी कुडची पोलीस स्थानकात 2 जून रोजी फिर्याद दाखल केली होती. या फिर्यादीत आपल्या पतीचा 27 मेरोजी मृत्यू झाला असून, पतीचा अज्ञात हल्लेखोरांनी हत्याराने डोक्यावर व पाठीवर हल्ला करून खून केला तसेच पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने पांढर्‍या प्लास्टिकच्या पोत्यात व चादरीमध्ये बांधून मृतदेह कृष्णा नदीत फेकून दिला असल्याचे म्हटले होते.

पोलिसानी सखोल चौकशी केल्यानंतर मयत कुमार खोत यांची पत्नी गीता व चिंचली येथील बाळेश यांच्यात अनैतिक संबंध होते हे उघडकीस आले. सदर बाब पती कुमार यांना कळाल्याने ते बाळेश व गीता यांच्यासोबत भांडण करत होते. या रागातून मयत कुमार याची पत्नी व मुलगा सचिन व बाळेश हारुगेरी आदींनी खून करण्याचा कट केला. त्यानंतर 27 मे रोजी कुमार यांना बाळेश हारुगेरी , आप्पासाहेब तपकिरे, संतोष तपकीरे यांनी शेतात बोलवून त्यांना दारू पाजून दगडाने ठेचून खून केला. मृतदेह मुलगा सचिन व बाळेश दोघानी  चादरीमध्ये बांधून पुरावा नष्ट करण्यासाठी चिंचली जॅकवेलनजीक कृष्णा नदीत फेकला.

पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी घटनाक्रम सांगितला. कुडची पोलिसांनी या प्रकरणी पाचही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

 

Back to top button