चोरट्यांना पश्चातबुद्धी !; बेडगमध्ये चोरलेल्या मूर्ती पुन्हा ठेवल्या मंदिरात | पुढारी

चोरट्यांना पश्चातबुद्धी !; बेडगमध्ये चोरलेल्या मूर्ती पुन्हा ठेवल्या मंदिरात

बेडग : पुढारी वृत्तसेवा

बेडग (ता. मिरज) येथे दि. 24 मार्च रोजी बिरोबा मंदिरातील पितळेचा नंदी व इतर काही मूर्तींची चोरी झाली  होती. पोलिस त्या चोरीचा तपास करीत होते; मात्र  तीन महिन्यांनी चोरट्यांनी चोरून नेलेले सर्व साहित्य मंदिरात पुन्हा जसेच्या तसे आणून ठेवले. चोरट्यांना पश्चातबुद्धी झाली काय, अशी चर्चा परिसरात सुरू आहे. बेडग येथील मळाभागातील बिरोबा मंदिरात 10 ते 12 किलो वजनाच्या नंदीची मूर्ती चोरीला गेली होती. तसेच 5 ते 6 बकर्‍यांच्या मूर्तींचीही चोरी करण्यात आली होती. 

मंगळवारी पहाटे पुजारी  पूजेसाठी मंदिरात गेले, तेव्हा त्यांना  त्या सर्व मूर्ती मंदिरात आणून ठेवल्याचे दिसले. तात्काळ त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला.  पोलिसांनी गेलेले सर्व साहित्य तपासले. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्या सर्व मूर्ती ताब्यात घेतल्या आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्या सर्व मूर्ती मंदिराच्या पुजार्‍यांच्या ताब्यात देण्यात येतील असे मिरज ग्रामीण पोलिसांकडून सांगण्यात आले.         

Back to top button