

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने २६ ऑक्टोबर, २००६ रोजी खानापूर शहरातील ताराराणी हायस्कूलच्या मैदानावर युवा महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. बेळगाव येथे झालेल्या कर्नाटक सरकारच्या अधिवेशनाला विरोध दर्शवण्यासाठी हा मेळावा होता. या मेळाव्यात प्रक्षोभक भाषण केल्याचा ठपका ठेवला होता. राज्य सरकारच्या वतीने पोलिसांनी महाराष्ट्राचे तत्कालीन विरोधी पक्षनेते रामदास कदम आणि वक्ते नितीन बानुगडे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी आज दोन्ही नेत्यांनी खानापूर न्यायालयात सुनावणीसाठी हजेरी लावली. उभयतांच्या जामिनात न्यायालयाने वाढ केली आहे. पुढील सुनावणी ३० नोव्हेंबर, २०२२ रोजी होणार आहे. या दोघांच्या वतीने बेळगावचे वकील शामसुंदर पत्तार आणि हेमराज बेंचनावर यांनी काम पाहिले.
यावेळी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते मुरलीधर पाटील, यशवंत बिरजे, आबासाहेब दळवी, विवेक गिरी, रूकमाना जुंजवाडकर, नारायण कापोलकर आदी उपस्थित होते.