Rossouw Century : टी 20 मध्ये सलग दोन शतके झळकावणारा रुसो पहिला खेळाडू! | पुढारी

Rossouw Century : टी 20 मध्ये सलग दोन शतके झळकावणारा रुसो पहिला खेळाडू!

पुढारी ऑनलाईन डेस्क : Rilee Rossouw Century : दक्षिण आफ्रिकेचा डावखुरा फलंदाज रिले रुसोने इतिहास रचला आहे. बांगलादेशविरुद्धच्या टी 20 विश्वचषकाच्या सुपर 12 टप्प्यातील सामन्यात त्याने मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. या 33 वर्षीय खेळाडूने सिडनी क्रिकेट ग्राउंड (SCG) वर झालेल्या सामन्यात बांगलादेशच्या गोलंदाजांची धुलाई केली.

द. आफ्रिकेचा बांगलादेशवर 104 धावांनी विजय

या सामन्यात द. आफ्रिकेने बांगलादेशवर 104 धावांनी विजय मिळवला. यासह दक्षिण आफ्रिकेनेही विजयाचे खाते उघडले. झिम्बाब्वेविरुद्धचा त्यांचा पहिला सामना पावसामुळे वाहून गेला होता. या शानदार विजयानंतर दक्षिण आफ्रिकेला गुणतालिकेत बंपर फायदा झाला आहे. हा संघ 3 गुणांसह गट 2 च्या गुणतालिकेत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. दक्षिण आफ्रिकेसाठी नेट रन रेटचा मोठा फायदा झाला आहे. संघाचा रन रेट आता +5.200 वर आहे जो पहिला सामना पावसामुळे वाहून गेला असला तरीही उपांत्य फेरीच्या शर्यतीत त्यांना टिकवून ठेवण्यास खूप मदत करेल.

रुसोचे 52 चेंडूत शतक

कर्णधार टेंबा बावुमा पहिल्याच षटकात बाद झाल्यानंतर फलंदाजीला आलेल्या रुसोने प्रथम अवघ्या 30 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले आणि त्यानंतर आपला डाव पुढे नेत 52 चेंडूत शतक झळकावले. रुसोने बाद होण्यापूर्वी 56 चेंडूत 109 धावा फटकावल्या. यादरम्यान त्याने 7 चौकार आणि 8 षटकारही ठोकले. रुसोने आपल्या शतकी खेळीदरम्यान अनेक विक्रमही केले. टी 20 आंतरराष्ट्रीय मधील आपली सर्वोत्तम धावसंख्या बनवण्यासोबतच त्याने टी 20 विश्वचषक स्पर्धेतील पहिले शतकही झळकावले. टी 20 विश्वचषकात शतक झळकावणारा रुसो हा दक्षिण आफ्रिकेचा पहिला आणि जगातील नववा फलंदाज ठरला.

टी 20 मध्ये सलग दोन शतके

याशिवाय दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजाने विश्वविक्रमही केला. टी 20 आंतरराष्ट्रीयमध्ये सलग दोन शतके झळकावणारा तो पूर्णवेळ सदस्य देशांचा (कसोटी खेळणारे देश) पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. रुसोने या सामन्यापूर्वी भारताविरुद्ध इंदूरमध्ये शतकी खेळी केली होती. या महिन्याच्या सुरुवातीला विश्वचषक स्पर्धेपूर्वी भारताच्या दौ-यावर द. आफ्रिकेचा संघ भारतात टी 20 मालिका खेळण्यासाठी आला होता. ही मालिका भारताने जिंकली. पण शेवटच्या तिसऱ्या सामन्यात रुसोने 48 चेंडूत टी 20 कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. त्याने 100 धावांची नाबाद खेळी साकारली.

टी 20 विश्वचषकातील एका डावात सर्वाधिक षटकार

रुसोने आपल्या खेळीत एकूण 8 षटकार ठोकले आणि येथेही एक विक्रम केला. टी 20 विश्वचषकादरम्यान एका डावात सर्वाधिक षटकार मारणारा तो दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू ठरला.

रुसोचे 6 वर्षांनंतर द. आफ्रिकेच्या संघात पुनरागमन

सहा वर्षांनंतर रुसोने यावर्षी द. आफ्रिकेच्या संघात पुनरागमन केले आहे. तो कोल्पाक करारांतर्गत इंग्लंडला गेला आणि तेथे त्याने देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. यामुळे दक्षिण आफ्रिकेने त्याला राष्ट्रीय संघातून वगळले होते.

T20 विश्वचषकात शतक झळकावणारे फलंदाज :

ख्रिस गेल – 117 धावा
सुरेश रैना – 101 धावा
महेला जयवर्धने – 100 धावा
ब्रेंडन मॅक्युलम – 123 धावा
अॅलेक्स हेल्स – 116 धावा
अहमद शहजाद – 111 धावा
तमीम इक्बाल – 103 धावा
ख्रिस गेल – 100 धावा
जोस बटलर – 101 धावा
रिले रुसो – 109 धावा

Back to top button