बेळगाव : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (डीसीसी) मुरगोड (ता. सौंदत्ती) शाखेत 6 कोटींची चोरी झाल्याचा प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला. यामध्ये साडेचार कोटींची रोकड, दीड कोटी रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, ही चोरी कुठेही फोडाफोडी न करता फाटकापासून लॉकरपर्यंत सर्व ठिकाणी पाच बनावट चाव्यांचा वापर करून झाली आहे. जाताना चोरट्यांनी सीसीटीव्हीचे डीव्हीआर देखील काढून नेले आहे.
मिळालेली माहिती अशी की, शनिवारी नेहमीप्रमाणे बँक सुरू होती. व्यवस्थापकांसह सर्व कर्मचारी सायंकाळी 7.15 वाजता बँक बंद करून गेले. रविवारी सकाळी 7.50 च्या सुमारास सुरक्षारक्षक मंत्राप्पा मंत्रन्नवर यांनी बँकेत चोरी झाल्याची माहिती शिपाई सुरेश वक्कुंद यांना दिली. आठ वाजता ही माहिती शिपायाने बँक व्यवस्थापक प्रमोद यलीगार यांना फोन करून दिली. त्यानंतर व्यवस्थापक तासाभराने बँकेत पोहोचले.
चोरट्यांनी चोरीवेळी कुठेही फोडाफोडी, कटावणी अथवा अन्य साहित्याचा वापर केला नाही. आधी त्यांनी बाहेरच्या फाटकाचे कुलूप बनावट चावीने काढले. यानंतर बँकेच्या लोखंडी जाळीचे कुलूप व त्यानंतर आतील बाजूच्या दरवाजाचे कुलूपही त्यांच्याकडील बनावट चावीनेच काढले. इतकेच नव्हे, तर बँकेतील स्ट्राँगरूम व लॉकरदेखील न तोडता त्यासाठीही बनावट चाव्यांचाच वापर झाला आहे. स्ट्राँगरूममध्ये ठेवलेली 4 कोटी 37 लाख 59 हजारांची रोकड, लॉकरमध्ये असलेले 1 कोटी 63 लाख 72 हजार 220 रुपयांचे 3 किलो 148 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरट्यांनी काढून नेले. बँकेत सीसीटीव्ही आहेत, हे ताडलेल्या चोरट्यांनी जाताना सीसीटीव्हीसाठी जोडलेला 6 हजार रुपये किमतीचा डीव्हीआरदेखील काढून नेला आहे. एकूण 6 कोटी 1 लाख 37 हजार 220 रुपयांची चोरी झाल्याची नोंद मुरगोड पोलिसांत झाली आहे. बँकेचे व्यवस्थापक प्रमोद कृष्णाप्पा यलीगार (वय 53, रा. यडहळ्ळी, ता. सौंदत्ती) यांनी फिर्याद दिली आहे.
माहिती मिळताच बँकेचे व्यवस्थापक तसेच अन्य कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. ही माहिती मुरगोड पोलिसांना दिल्यानंतर सकाळी पोलिस निरीक्षक मौनेश्वर माली पाटील, उपनिरीक्षक प्रवीण गंगोळ यांनी भेट दिली. रामदुर्गचे उपअधीक्षक रामनगौडा हट्टीदेखील काही वेळाने घटनास्थळी पोहोचले. चोरीची रक्कम मोठी असल्याने दुपारच्या वेळी जिल्हा पोलिसप्रमुख लक्ष्मण निंबरगी, अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख महानिंग नंदगावी यांनीही भेट देऊन पाहणी केली. सकाळच्या वेळी श्वानपथक व ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. श्वानपथक बँकेपासून काही अंतरावर जाऊन घुटमळले. यावरून चोरटे काही अतंरावरून वाहनाने गेल्याचा संशय पोलिसांना आहे.
चोरीची घटना उघडकीस येताच जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष व माजी खासदार उमेश कत्ती यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सर्व ठिकाणी बनावट चाव्यांचा वापर करून झालेली ही चोरी आश्चर्यकारक आहे. याचा सखोल तपास करण्याची विनंती वरिष्ठ पोलिस अधिकार्यांना केली आहे, असे त्यांनी सांगितले.
इतक्या सहज आणि सोप्या पद्धतीने व इतकी मोठी चोरी करून चोरटे पसार झाले आहेत. त्यामुळे पोलिस अधिकार्यांनाही धक्का बसला आहे. चोरट्यांना चाव्या मिळाल्या कशा? असा प्रश्न पोलिसांनाही पडला आहे. त्यामुळे रविवारी बँकेतील सर्व कर्मचार्यांना बोलावून एकेकाकडून माहिती घेण्याचे काम सुरू होते. अतिरिक्त पोलिस प्रमुख नंदगावी हे सायंकाळपर्यंत मुरगोड येथे थांबून होते. प्रत्येकाकडून स्वतंत्ररित्या माहिती घेऊन काही धागेदोरे मिळतात का? याची चाचपणी सुरू होती.
या मध्यवर्ती बँकेतील शाखेच्या विविध विभागांचा 18 चाव्यांचा जुडगा आहे. शिपाई दररोज जाताना प्रत्येक चावी घातली आहे का, याची खात्री करतो. शिवाय स्ट्राँगरूम, लॉकरसह महत्त्वाच्या ठिकाणचे लॉक व्यवस्थित घातले आहे का, याची चाचपणी बँक व्यवस्थापकासह वरिष्ठ अधिकारी करतात. स्ट्राँगरूम व लॉकरच्या चाव्या बँक व्यवस्थापक व कॅशिअरकडे असतात, तर बाहेरच्या बाजूच्या चाव्या शिपाई व सुरक्षारक्षकाकडे असतात. यातीलच पाच बनावट चाव्या चोरट्यांनी कशा बनवून घेतल्या, असा प्रश्न पोलिसांनाही पडला आहे.
बँकेच्या शाखेसमोर रात्रपाळीसाठी मंत्राप्पा मंत्रन्नवर या सुरक्षारक्षकाची नियुक्ती केली आहे. बँक सुटल्यानंतर ते सायंकाळी येथे ड्युटीसाठी जाऊन सकाळी परत जातात. शनिवारी मध्यरात्री ते पहाटेच्या दरम्यान घडलेल्या या चोरीची माहिती त्यांनी रविवारी सकाळी 7.50 वाजता शिपायाला दिली. याचा अर्थ रात्रीच्या वेळी सुरक्षारक्षक ड्युटीवर होते की नाही, असा प्रश्न समोर आला आहे. याची माहिती घेणेही पोलिसांकडून सुरू आहे.