कोल्हापूर : मणेर मळ्यात विषारी दारूभट्टी! | पुढारी

कोल्हापूर : मणेर मळ्यात विषारी दारूभट्टी!

कोल्हापूर ; दिलीप भिसे : शहरापासून काही अंतरावर आणि मुंबई- पुणे महामार्गालगत उचगाव (ता. करवीर) येथील मणेर मळ्यात कर्नाटकातील कुख्यात दारू तस्करांनी बनावट दारूनिर्मितीचा ‘उद्योग’ सुरू केला आहे. विषारी दारूनिर्मितीचा अड्डा पाच महिन्यांपासून बिनबोभाटपणे सुरू आहे. विशेष म्हणजे पोलिस हवालदारासह त्याच्या भावाने बनावट दारू कारखान्यासाठी पत्र्याचे शेड भाड्याने दिल्याचा धक्कादायक प्रकार चव्हाट्यावर आला आहे. कोट्यवधींची उलाढाल होत असतानाही स्थानिक यंत्रणांनी याकडे डोळेझाक केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

बनावट दारूमुळे शेकडो मृत्युपंथाला !

कर्नाटकातील दारू तस्करांनी लॉकडाऊन काळात शहरासह ग्रामीण भागात धुमाकूळ घातला. हे रॅकेट बनावट दारू तस्करीतून कोट्यवधींची उलाढाल करत आहे. आता विषारी दारूनिर्मितीतून मद्यपींच्या आयुष्याची राखरांगोळी केल्याचे दिसून येत आहे. या दारूमुळे श्वसन, अपचन, लिव्हर, यकृतासह अन्य आजार उद्भवत आहेत. अगदी 18 ते 25 वयोगटातील तरणी पोरं मृत्युपंथाला लागली आहेत.

तस्करीबरोबरच बनावट दारूनिर्मितीचा ‘उद्योग’ फोफावतोय

गोवा, कर्नाटकासह अन्य राज्यांतून बनावट दारूची तस्करी सुरूच आहे. आता त्यात बनावट दारू कारखान्याची भर पडली आहे. या कारखान्यातून दररोज हजारो लिटर दारूची निर्मिती केली जाते.

उत्पादन शुल्क विभागाने टाकली धाड!

उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मंगळवारी बनावट दारू कारखान्याचा पर्दाफाश करून दोघांना बेड्या ठोकल्या. साडेचार लाखांचा केमिकल, रसायन साठ्यासह दारूनिर्मिती करणार्‍या विविध कंपन्यांचे हुबेहूब लेबल, बूच, बाटल्या हस्तगत केल्या आहेत.

म्होरक्यासह साथीदार मोकाट

बनावट दारूनिर्मिती कारखान्यातील कामगार रोहित रूपसिंग तमायचे आणि मनोज सुरेश घमंडे (रा. गोकुळ शिरगाव, ता. करवीर) यांना पथकाने बेड्या ठोकल्या. मात्र, कारखान्याच्या म्होरक्यासह तस्करी टोळी अजूनही मोकाट आहे. प्राथमिक चौकशीत कारखान्याचा मालक कर्नाटकातील असावा, अशी माहिती पुढे आली आहे.

आश्रयदाता पोलिस हवालदार कोण?

बनावट दारूनिर्मिती कारखान्याचा पर्दाफाश झाल्यानंतर उत्पादन शुल्कचे अधीक्षक रवींद्र आवळे यांनी चौकशीचे निर्देश दिले आहेत. भरारी पथकाच्या चौकशीत पोलिस हवालदार व त्याच्या भावाने कारखान्यासाठी शेड भाड्याने दिल्याचे उघड झाले. संबंधितांची चौकशी करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. अधीक्षक आवळे यांनीही त्यास दुजोरा दिला.

तपास यंत्रणांचा केवळ दिखावा !

जिल्ह्यात तीन वर्षांत बनावट दारूनिर्मिती करणार्‍या किमान सहा ते सात अड्ड्यांचा पर्दाफाश करण्यात आला. त्यामध्ये कोरोची (ता. हातकणंगले) येथील अड्ड्यावरील कोट्यवधीचा मुद्देमाल हस्तगत केला. म्होरक्या श्रीनिवास नागराजसह तिघांना बेड्या ठोकल्या होत्या. सीमाभागातील अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले; पण शेवटपर्यंत तपासाची चक्रे फिरलीच नाहीत. तपास यंत्रणांनी केवळ दिखावा केला.

दोन वर्षांत 20 कोटींची दारू हस्तगत

भेसळ दारू तस्करीत पुणे, सोलापूरनंतर कोल्हापूर आघाडीवर आहे. कोल्हापूर परिक्षेत्रात 2019-2020 या काळात 16 कोटी 51 लाख, तर 2021 मध्ये 4 कोटी 37 लाखांची दारू जप्त करून 11 हजार 500 तस्करांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. 14 हजारांवर तस्करीचे गुन्हे दाखल झाले आहेत.

Back to top button