रहस्यमयी तारा गिळंकृत करतोय जवळच्या तार्‍यांना | पुढारी

रहस्यमयी तारा गिळंकृत करतोय जवळच्या तार्‍यांना

नवी दिल्ली : खगोलशास्त्रज्ञांनी दोन वर्षांपूर्वी पृथ्वीपासून हजार प्रकाशवर्षे दूर अंतरावर एका रहस्यमयी ब्लॅकहोलचा शोध लावला होता. अन्य ब्लॅकहोलच्या तुलनेत पृथ्वीजवळच एक ब्लॅकहोल सापडल्याने शास्त्रज्ञही आनंदित होते. मात्र, याचा सखोल अभ्यास केला असता असे स्पष्ट झाले की, ज्याला शास्त्रज्ञ ब्लॅकहोल समजत होते, तो एक वैम्पायर तारा असल्याचे उघड झाले. हा तारा आपल्या जवळच्या तार्‍यांना गिळंकृत करतो, असेही स्पष्ट झाले.

युरोपियन सदर्न ऑब्झर्व्हेटरीचे शास्त्रज्ञ डाईटरिच बाडे यांनी सांगितले की, पृथ्वीनजीक आपल्या सूर्यापेक्षाही चारपटीने मोठा ब्लॅकहोल आहे. या ब्लॅकहोलभोवती केवळ दोन मोठे तारे फिरत आहेत. या तार्‍यांना शास्त्रज्ञांनी एचआर 819 असे नाव दिले आहे. टेलिस्कोपच्या मदतीने पाहिल्यास हा ब्लॅकहोल एखाद्या तार्‍यासारखाच दिसतो. शास्त्रज्ञांनी याचे सखोल अवलोकन केले असता त्यांना तेथे ब्लॅकहोल आढळून आले. यासंदर्भात बोलताना बेल्जियमच्या केयू लेयुवेनचे शास्त्रज्ञ एबिगेल प्रॉस्ट यांनी सांगितले की, ज्यावेळी या अवकाशीय वस्तूची स्पेक्ट्रोस्कोपी झाली, तेव्हा आश्चर्यकारक बाब स्पष्ट झाली. ज्याला आम्ही ब्लॅकहोल समजत होतो. तेथे असलेले दोन तारे ब्लॅकहोलच्या भोवताली चकरा मारत होते. मात्र, आणखी अभ्यास केला तेव्हा तेथे ब्लॅकहोल तर नाहीच; पण वैम्पायर तारा असल्याचे आढळून आले.

शास्त्रज्ञ एबिगेल प्रॉस्ट यांनी पुढे सांगितले की, आम्ही तेथून येत असलेल्या प्रखर प्रकाशाचा अभ्यास केला असता तेथे एक मोठा तारा वैम्पायर बनल्याचे आढळून आले. सध्या तो तारा आपल्या आसपासच्या तार्‍यांना गिळंकृत करत असल्याचेही स्पष्ट झाले. सध्या तार्‍याच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा अभ्यास करण्यात येत आहे.

Back to top button