बेळगाव : जोरदार शक्तिप्रदर्शनाने विधान परिषदेसाठी पाच जणांचे उमेदवारी अर्ज दाखल | पुढारी

बेळगाव : जोरदार शक्तिप्रदर्शनाने विधान परिषदेसाठी पाच जणांचे उमेदवारी अर्ज दाखल

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा

विधान परिषदेच्या जिल्ह्यातील दोन जागांसाठी आज (दि. २३) शेवटच्या दिवशी भाजप, काँग्रेस, आप आणि अपक्षांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी दाखल करीत असताना भाजप, काँग्रेस आणि अपक्षाचे लखन जारकीहोळी यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. यामुळे शहरात वाहतुकीची कोंडी झाली होती.

भाजपच्यावतीने विधान परिषदेसाठी आमदार महांतेश कवठगीमठ यांनी आपला उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी आर व्यंकटेश कुमार यांच्याकडे दाखल केला. यावेळी त्यांच्या समवेत माजी मंत्री रमेश जारकीहोळी, वनमंत्री उमेश कत्ती, धर्मदाय मंत्री शशिकला जोल्ले, खा. मंगल अंगडी, आमदार आनंद मामणी, आ. अभय पाटील, पी. राजू आ. अनिल बेनके आदी उपस्थित होते.

काँग्रेस पक्षातर्फे आज चन्नराज हट्टीहोळी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासमवेत आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार अंजली निंबाळकर उपस्थित होते. लखन जारकीहोळी यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला.

आप पक्षाच्यवतीने आज शंकर हेगडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. शेवटच्या दिवसापर्यंत विधान परिषदेच्या दोन जागेसाठी पाच जणांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले . काँग्रेस पक्षाच्या वतीने सीपएड मैदानावरून मिरवणूक काढण्यात आली.

लखन जारकीहोळी समर्थकांनी सरदार मैदानावरून आपली मिरवणूक काढली. भाजपाच्या समर्थकांनी कन्नड साहित्य भवनातून मिरवणूक काढली. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी समर्थकांनी मोठी गर्दी केल्यामुळे चन्नमामा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यतचा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.

हेही वाचलं का ?

पाहा व्‍हिडिओ : चवदार काेल्‍हापूरी मटण लाेणचं

 

Back to top button