पुढील २५ वर्ष राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार असेल : संजय राऊत

महाविकास आघाडी सरकार नवीन वर्षात पडेल, असे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आतापर्यंत २८ वेळा केला आहे. पहाटेच्या शपथविधीला आज दोन वर्ष होत आहेत. त्यामुळे त्यांना या विधानाची पुन्हा आठवण आली असावी. आता तरी त्यांनी झोपेतून जागे व्हावे, असा टोला लगावत राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पुढील २५ वर्ष सत्तेत राहिल, असा विश्वास शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आज (दि .२३ ) व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची संजय राऊत यांनी आज भेट घेतली. यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. इंग्रजी नवीन वर्ष की, मराठी नवीन वर्ष ते परिस्थितीवर ठरविण्यात येईल, कोरोना संपल्याने जनजीवन गतिमान झाले आहे. त्यामुळे आता राजकारणालाही गती येईल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी (दि. २२) म्हटलं होते. याबाबत बोलताना राऊत म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार लवकरच सत्तेतून बेदखल होईल, असे वारंवार भाजप नेते चंद्रकांत पाटील म्हणतात. भाजपच्या पहाटेच्या शपथविधीला आज दोन वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी सत्तेचे स्मरण होणे साहजिकच आहे. आता तरी त्यांनी जागे व्हावे, असा टोलाही त्यांनी लगावला.
एसटी कर्मचार्यांच्या संपावर लवकर तोडगा निघेल
एसटी कर्मचार्यांच्या संपाबाबत कालच शरद पवार यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी चर्चा केली. उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते. यावेळी शरद पवार यांनी महत्वाच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे लवकरच एसटी कर्मचार्यांच्या संपावर लवकर तोडगा निघेल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.
अमरावतीमधील हिंसाचार असो की एसटी कर्मचार्यांचा संप यातून राज्यातील वातावरण बिघडवण्याचे काम सुरु आहे, असा आरोपही त्यांनी केला. महाराष्ट्र हे देशातील सर्वात सुरक्षित राज्य आहे. मात्र मुंबईचे पोलिस आयुक्त आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगत आहेत. हाच मोठा विनोद आहे, असेही राऊत म्हणाले.
हेही वाचलं का?
- एअर इंडियाचे संचालक लवकरच देणार राजीनामे
- राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदेंच्या पराभवानंतर वसंतराव मानकुमरेंचा ओ शेठ.. गाण्यावर तुफान डान्स (Video)
- Covid-19 in Europe: कोरोनाची युरोपमध्ये पुन्हा एंट्री, ऑस्ट्रियामध्ये २० दिवसांचे लॉकडाउन