अवैद्य वाळू उत्‍खनन : जळगावात वाळूच्या भरधाव ट्रॅक्‍टरची रिक्षाला धडक | पुढारी

अवैद्य वाळू उत्‍खनन : जळगावात वाळूच्या भरधाव ट्रॅक्‍टरची रिक्षाला धडक

जळगाव; पुढारी वृत्‍तसेवा

जिल्हा प्रशासनाच्या गलथान कारभाराचे जिवंत उदाहरण आज भररस्त्यात पाहावयास मिळाले. कागदोपत्री वाळूचा व्यवसाय बंद आहे, मात्र गिरणा नदीच्या पात्रातून अवैद्य वाळू उत्‍खनन सुरू आहे. अंदाधुंद वाळूचा उपसा अवैध मार्गाने करण्यात येत आहे. भरदिवसा शहरातून या वाळूची वाहतूक बिनधास्तपणे सुरू आहे. यातच आज शिव कॉलनी स्टॉपजवळ वाळू वाहतूक करणार्‍या भरधाव ट्रॅक्टरने रिक्षाला धडक दिली. सुदैवाने या अपघातात कोणाचाही जीव गेला नाही. या अपघातामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून, अवैद्य वाळू उत्‍खनन आणि वाहतुकीवर प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी हाेत आहे. यावर जिल्हा प्रशासन कसा आळा घालणार हे पाहणे योग्य राहील.

या संदर्भात मिळालेली अधिक माहिती अशी की, वाळूची वाहतूक करणार्‍या विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरने आज (मंगळवार) एमएच १९ व्ही-३४४१ क्रमांकाच्या रिक्षाला शिव कॉलनी येथे धडक दिली. ही धडक इतकी भयंकर होती की, ट्रॅक्टरची पुढील दोन्ही चाके ही रिक्षात रूतून बसली. या रिक्षाचा चालक हा रिक्षातून उतरून समोर उभा असल्याने त्याला यात इजा झाली नाही. मात्र भर चौकात घडलेल्या या अपघाताने प्रचंड खळबळ उडाली. या अपघातानंतर संबंधीत ट्रॅक्टर चालकाने घटना स्थळावरून पलायन केले.

वाळूचे उत्‍खनन कागदोपत्री बंद आहे. असे असले तरीही गिरणा पात्रातून दिवसाच नवे रात्रीही डंपर ट्रॅक्टर्स या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा करण्यात येत आहे. वाळूची वाहतूक भर शहरातून होत असून, पोलीस प्रशासन परिवहन विभाग किंवा महसूल विभाग याकडे कोणतीही कारवाई करताना दिसून येत नाहीत. प्रशासनाने याची दखल घेऊन यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
अवैध वाहतूक व्यवसायाच्या वाहनांमुळे जिल्ह्यांमध्ये अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. आतातरी प्रशासनाने खडबडून जागे होऊन अवैध व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांवर तसेच वाहनांवर कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे.

हे ही वाचा :

Back to top button