बेळगाव : नावग्यात हनुमान मूर्तीवरून तणाव | पुढारी

बेळगाव : नावग्यात हनुमान मूर्तीवरून तणाव

कणये : पुढारी वृत्तसेवा: नावगे (ता. बेळगाव) येथे बुधवारी मध्यरात्री अज्ञातांनी गावच्या वेशीत हनुमान मूर्तीची प्रतिष्ठापना केली. परंतु, बुधवारी सकाळी वडगाव पोलिस व किणये पीडीओंनी गावात तातडीने जाऊन मूर्ती हटवली. ही खासगी जागा कन्नड फलकांसाठी की मराठी फलकांसाठी यावरून आधीपासून वाद आहे. यातूनच हा प्रकार घडला. सायंकाळी पोलिस व ग्रामपंचायत सदस्यांनी बैठक घेऊन या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

गावातील मुख्य चौकात हनुमान मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. मध्यरात्रीच ही मूर्ती उभारण्यात आल्याने गावात चर्चेचा विषय ठरला, ग्रामस्थही जमले. ही माहिती वडगाव पोलिसांना तसेच किणये ग्रामपंचायत विकास अधिकार्‍यांना मिळाली. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. येथे पुतळा उभारण्यासाठी परवानगी घेतली नसल्याचे सांगत पीडीओ प्रकाश कुडची यांनी पोलिसांच्या उपस्थितीत मूर्ती हटवून ती किणये ग्रामपंयायतीत नेऊन ठेवण्यात आली.

वादाचे नेमके कारण काय?

सदर चौकातील जागा ही पाच जणांच्या वैयक्तीक मालकीची असल्याचे समजते. परंतु, कन्नड रक्षण वेदिकेचे काही तरुण येथे पोलिस व ग्रामपंचायतीला हाताशी धरून कानडी फलक लावणे, लाल-पिवळा ध्वज व पताका लावणे, असा प्रकार करतात. आता देखील या चौकात लाल-पिवळे ध्वज व कर्नाटकच्या नकाशासह कित्तूर चन्नम्मांचे कटआऊट आहे. या खासगी जागेत कोणी काहीही लावू नये, असा आदेश असतानाही लाल-पिवळा ध्वज तसेच फलक लावलेला आहे. आता तेथे कित्तूर चन्नम्मांचा पुतळा बसविण्याची हालचाल सुरू झाल्याची कुणकुण गावातील काहींना लागली होती. त्यामुळेच येथे रात्रीच्या वेळी अज्ञातांनी हनुमान मूर्तीची प्रतिष्ठापना केली.

सर्वच फलक हटविणार

दिवसभराच्या घडामोडीनंतर सायंकाळी वडगाचे निरीक्षक श्रीनिवास हंडा, पीडीओ प्रकाश कुडची तसेच ग्रामपंचायत सदस्यांची बैठक झाली. सदर जागा वैयक्तीक मालकीची आहे. या ठिकाणी तीन-चार संघटनेचे फलक आहेत. हे बेकायदेशीररित्या लावलेले आहेत. त्यामुळे हे सर्व फलक काढण्याबरोबरच या खासगी जागेत कोणी काहीही उभारु नये, तसेच आठ दिवसांत फलक हटविण्याचा ठराव बैठकीत झाला.

याबाबत वडगावचे निरीक्षक श्रीनिवास हंडा यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, या प्रकरणी अद्याप कोणावरही गुन्हा दाखल झालेला नाही, शिवाय ताब्यातही घेतलेले नाही. परंतु, जर ग्रामपंचायतीने फिर्याद दिल्यास पुढील कार्यवाही केली जाईल.

वैयक्‍तिक जागेत कन्‍नडिगांची घुसखोरी

गावात जिथे फलक, पताका, लाल-पिवळा ध्वज उभारून अतिक्रमण केले गेले आहे, ती चार ते पाच जणांच्या मालकीची खासगी जागा आहे. संबंधित जागा मालकांनी कोणताही फलक अथवा झेंडा लावू नये, असे यापूर्वीच बजावले आहे. तरीदेखील फलक आणि झेंडे आहेत. आठ वर्षांपूर्वी याच ठिकाणी भगवा व लाल पिवळा ध्वज लावण्यावरून वाद निर्माण झाला होता. तेव्हाही पोलिसांनी भगवा काढल्याने वादात भर पडली होती.

हेही वाचलंत का? 

Back to top button