

नगर : पुढारी वृत्तसेवा
नऊ दिवसात जिल्ह्यातील 1 लाख 9 हजार 500 मेट्रिक टन शिल्लक उसाचे गाळप करण्यात सहकारी साखर कारखान्यांनी बाजी मारली. आता फक्त 7 हजार टन ऊस गाळपा अभावी शिल्लक आहे. तोही दोन दिवसात गाळप होईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. सर्वाधिक सहा हजार मेट्रिक टन ऊस अशोक कारखाना कार्यक्षेत्रात गाळप होणे बाकी आहे. जिल्ह्यातील संपूर्ण उसाचे गाळप पूर्ण झाल्यामुळे ऊस उत्पादक शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे.
यंदा मोठ्या प्रमाणात उसाची लागवड झाली. त्यामुळे एप्रिल महिन्यात जवळपास सात लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप शिल्लक होते. मे महिन्यात गाळप बंद होणार असल्यामुळे ऊस उत्पादक शेतकर्यांनी धसका घेतला होता. पालकमंत्री मुश्रीफ यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना या उसाचे नियोजन करण्याचे निर्देश दिले होते.
त्यानुसार कारखान्यांनी ऊसाचे गाळप केले. अशोक सहकारी साखर कारखान्यांचा अतिरिक्त 45 हजार मेट्रिक टन ऊस प्रवरा, संगमनेर व ज्ञानेश्वर कारखान्यांना विभागून दिला. अशोक कारखाना परिसरात ऊसतोड कामगारांची कमतरता असल्यामुळे तेथे हंगाम संपलेल्या कारखान्यांचे हार्वेस्टर उपलब्ध करुन दिले.
पालकमंत्री मुश्रीफ यांनी 30 मे रोजी शिल्लक उसाचा आढावा घेतला असता, जिल्ह्यात अद्यापि 1 लाख 16 हजार मेट्रीक टन ऊस गाळपाशिवाय शिल्लक असल्याचे पुढे आले. त्यांनी साखर विभागाबरोबरच कारखाना प्रशासनाला आदेश दिले. जोपर्यंत शिल्लक उसाचे गाळप होणार नाही तोपर्यंत कारखाने बंद करु नका, असे निर्देश दिले होते. त्यानुसार संगमनेर, मुळा, ज्ञानेश्वर, अशोक, प्रवरा या कारखान्यांनी गाळप सुरुच ठेवले.
गेल्या नऊ दिवसांत 1 लाख 9 हजार मेट्रीक टन उसाचे गाळप पूर्ण करण्यात आले असून, बुधवारपर्यंत (दि.8) 7 हजार मेट्रीक टन ऊस गाळपाअभावी शिल्लक आहे. संगमनेर येथील सहकारी साखर कारखाना परिसरात 1 हजार मे.टन ऊस शिल्लक होता. त्याचेही गाळप करत कारखान्याने हंगामाची सांगता केली. श्रीरामपूर तालुक्यात 6 हजार मे.टन उसाचे गाळप शुक्रवारपर्यंत पूर्ण केले जाणार आहे.
'गणेश', 'अशोक'ची गव्हाण सुरूच
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात, मुळा या दोन कारखान्यांचा बुधवारी सांगता समारंभ झाला. अशोक, गणेश कारखाना सुरु आहे. गणेश कारखाना आज-उद्या बंद होणार आहे. अशोक कारखाना परिसरात 6 हजार टन ऊस शिल्लक आहे. त्यामुळे हा कारखाना 10 जूनपर्यंत सुरु राहण्याची शक्यता आहे.
यंदा साखर उत्पादनाचा उच्चांक
जिल्ह्यातील 23 कारखान्यांनी गेल्या सहा महिन्यांत 7 जूनपर्यंत तब्बल 1 कोटी 84 लाख 98 हजार 779 मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. त्यामुळे 1 कोटी 85 लाख 5 हजार 958 क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. आतापर्यंतचा हा उच्चांक आहे. कारखान्यांचा सरासरी उतारा 10.51 टक्के इतका आला आहे.