बेळगाव : पुढारी वृत्तसेवा
केएलई अभिमत विद्यापीठाच्या अॅकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन आणि रिसर्च केंद्राला (काहेर) नॅककडून ए प्लस श्रेणी देण्यात आली आहे. यामुळे विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. प्रमाणपत्राचे मान्यवरांकडून वितरण करण्यात आले. मूल्यमापनाच्या दोन फेर्यांमध्येही विद्यापीठाला ए श्रेणी देण्यात आली होती. 17 ते 20 फेब्रुवारी दरम्यान नॅकच्या 7 सदस्यीय पथकाकडून विद्यापीठामध्ये राबविण्यात येणारे शैक्षणिक उपक्रम, संशोधन, विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश, समाजासाठी राबविण्यात येणारे विधायक उपक्रम, मूलभूत सुविधा यांची पाहणी करण्यात आली.
अभिमत विद्यापीठाने नवजात शिशू आणि माता यांच्या आरोग्यासाठी राबविलेले उपक्रम आणि संशोधनाचे कमिटीने कौतुक केले. विद्यार्थ्यांना देण्यात येणारे दर्जेदार शिक्षण, अध्ययन आणि अध्यापनासाठी पुरविलेल्या सुविधा, विद्यापीठाने केलेली प्रगती यांचा कमिटीने आढावा घेतला.नॅक पीर पथकाचे चेअरमन म्हणून चेन्नई येथील रामचंद्र हायर एज्युकेशन आणि संशोधन केंद्राचे कुलगुरु डॉ. पी. व्ही. विजयराघवेंद्र यांनी काम पाहिले. त्यांनी डॉ. प्रभाकर कोरे यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठाची सुरू असलेल्या प्रगतीचे कौतुक केले.
संस्थेकडून सुरुवातीपासून दर्जेदार शिक्षणावर भर देण्यात येत आहे. नॅककडून ए प्लस श्रेणी मिळाल्याबद्दल आनंद झाला आहे. विद्यार्थ्यांना देण्यात येणारे गुणात्मक शिक्षण आणि दर्जेदार सुविधांची दखल घेतल्याचे समाधान आहे.
– डॉ. प्रभाकर कोरे, केएलई कार्याध्यक्ष तथा कुलपती
हेही वाचलत का?