गडहिंग्लज पालिकेच्या प्रभागरचनेचा कार्यक्रम जाहीर : १ एप्रिलला अंतिम मान्यता | पुढारी

गडहिंग्लज पालिकेच्या प्रभागरचनेचा कार्यक्रम जाहीर : १ एप्रिलला अंतिम मान्यता

गडहिंग्लज, पुढारी वृत्तसेवा : कोरोनाच्या पार्श्वभूमीसह राज्यातील इतर मागास आरक्षणाच्या अडचणीमुळे नगरपालिकांच्या निवडणुका कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. आता गडहिंग्लज नगरपरिषदेच्या सभागृहाची मुदत २९ डिसेंबर २०२१ रोजी संपली असून, गेल्या दीड महिन्यांपासून पालिकेचा कारभार प्रशासकांच्या हाती आहे. पालिकेच्या प्रभाग रचनेचा आराखडा तयार होऊन वरिष्ठांकडे गेला होता.

मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांतील इतर मागास प्रवर्ग आरक्षणाच्या अडचणीमुळे याबाबत काहीच हालचाल झाली नव्हती. मंगळवारी राज्य निवडणूक विभागाने पालिकांच्या प्रभागरचनेचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

गडहिंग्लज नगरपालिका ‘क’ वर्गात समाविष्ट असल्याने यासाठी २ मार्च रोजी प्रारूप प्रभागरचनेचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करावयाचा आहे. जिल्हाधिकार्‍यांनी ७ मार्चपर्यंत या प्रस्तावाला मान्यता द्यावयाची आहे. यानंतर हरकती व सूचनांसाठी कालावधी ठेवण्यात आला असून, प्रारूप प्रभाग रचना, प्रभागदर्शक नकाशे हे १० मार्चपर्यंत प्रसिद्ध करावयाचे असून, त्यानंतर हरकती व सूचनांसाठी सात दिवसांचा कालावधी दिला जाणार आहे.

२२ मार्चपर्यंत या प्रभाग रचनेसंदर्भात आलेल्या सर्व हरकतींवर सुनावणी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत होणार आहे. त्यानंतर याबाबतचा अभिप्राय २५ मार्चपर्यंत विभागीय आयुक्तांपर्यंत पाठवायचा आहे. यानंतर १ एप्रिल रोजी प्रभाग रचना अंतिम होणार असून, ५ एप्रिल रोजी त्याची प्रसिद्धी केली जाणार आहे. या प्रभाग रचना अंतिम करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने मुख्याधिकार्‍यांना दिले आहेत.

निवडणूक आयोगाकडून प्रभाग रचनेबाबत सूचना देण्यात आल्‍या आहेत. त्‍यानुसार कार्यवाही झाल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने अशाच पद्धतीने निवडणुकीचे कामकाज गतिमान केले आहे. एप्रिलमध्ये मतदार यादी प्रसिद्धी, हरकती पूर्ण होण्याची शक्‍यता आहे. तसेच मे महिन्यात आचारसंहिता ही लागण्याची शक्यता आहे, असे प्रशासकीय अधिकार्‍यांनी सांगितले.

हे ही वाचा  

Back to top button