

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : प्राइम पॉईंट फाउंडेशनच्या वतीने दिल्या जाणाऱ्या संसद रत्न पुरस्कारांची घोषणा झाली असून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (supriya sule), बिजू जनता दलाचे अमर पटनाईक आदींना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या शनिवारी दिल्लीत पुरस्कार प्रदान केले जातील.
काँग्रेसचे वरिष्ठ नेते वीरप्पा मोईली तसेच तामिळनाडूतील भाजपचे खासदार एच. व्ही. हांडे यांना लाईफटाइम अचीव्हमेंट पुरस्कार जाहीर झाला आहे. संसद रत्न पुरस्कार जाहीर झालेल्यात आठ खासदार लोकसभेचे आहेत तर तीन खासदार राज्यसभेचे आहेत.
राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे (supriya sule), आरएसपीचे एन. के. प्रेमचंद्रन व शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांना सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीसाठी संसद रत्न पुरस्कार जाहीर झाला.
तृणमूलचे सौगत रॉय, काँग्रेसचे कुलदीप राय शर्मा, भाजपचे खासदार विद्युत महतो, हीना गावित व सुधीर गुप्ता यांना उत्तम कामगिरीसाठी पुरस्कार जाहीर झाला आहे.
राज्यसभेतील ज्या खासदारांची पुरस्कारासाठी निवड झाली आहे, त्यात बिजदचे अमर पटनायक व राष्ट्रवादीच्या फौजिया खान यांचा समावेश आहे. याशिवाय केरळमधील माकपचे के. के. रागेश यांचा सन्मान केला जाणार आहे.