Latest

सांगली : जिल्हा बँक निवडणूक; जिल्ह्याच्या तिजोरीच्या चाव्या कोणाकडे?

backup backup

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक प्रचाराची आज सांगता होणार आहे. या निवडणुकीत सर्व पक्षीय नेत्यांनी 'हातात-हात' घातल्याने म्हणावा तसा राजकीय रंग रंगला नाही. मात्र जिल्ह्यावरील राजकीय हुकूमत अबाधित ठेवण्यासाठी, बँकेची सत्ता काबिज करण्यासाठी नेतेमंडळींनी गुप्त बैठकांचा धडाका लावला आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या तिजोरीच्या चाव्या कोणाच्या हातात जाणार, याबाबतची उत्सुकता आहे

स्वातंत्र्यनंतर नव महाराष्ट्राचे शिल्पकार माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, माजी मुख्यमंत्री स्व. वसंतरावदादा पाटील, सहकारतपस्वी स्व. गुलाबराव पाटील यांनी सहकारी चळवळीचे नेतृत्व केले. बहुजनांचा विकास, असंघटित शेतकरी हे आर्थिक सक्षम झाल्याशिवाय विकासाची प्रगती होणार नाही, म्हणून जिल्हा बँकेची स्थापना केली गेली. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकर्‍यांना सहज आणि कमी व्याज दरामध्ये कर्ज उपलब्ध होऊ लागले. परिणामी सावकाराच्या पाशातून अनेकांची मुक्तता झाली.

साखर कारखाने, खरेदी-विक्री संघ, औद्योगिक प्रकल्प, सूतगिरणी, पाणीपुरवठा संस्था, सोसायट्या, पतसंस्थांचा खर्‍या अर्थाने 'उद्धार' झाला. जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासाची जिल्हा मध्यवर्ती बँकच केंद्रबिंदू होती आणि आजही आहे. मात्र राजकीय पक्षांनी विकासाला दुय्यम स्थान देत आज बँकेला राजकीय आखाडाच बनवला आहे. अलिकडच्या काळात जिल्हा बँकेवर ज्यांची सत्ता त्यांची जिल्ह्यावर हुकमत असे समीकरणच बनले आहे.

स्व. वसंतदादा पाटील यांनी मोठ्या मनाने बँकेचे नेतृत्व (स्व.) गुलाबराव पाटील यांच्याकडे सोपवले. त्यांनीही त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ न देता मोठ्या सचोटीने कारभार करून बँकेची भरभराट केली. (स्व.) विष्णूअण्णा पाटील यांनीही काही वर्षे बँकेचा कारभार उत्तम पद्धतीने केला. गेल्या काही वर्षापासून जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांचीच बँकेत हुकमत आहे.

यावेळी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी दुरंगी लढत आहे. महाआघाडीच्या सहकार विकास पॅनेलने 18 तर भाजपच्या शेतकरी विकास पॅनेलने 16 उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. सर्व पक्ष राजकीय मुद्दे बाजूला ठेऊन एकत्र आले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत राजकीय रंग दिसत नाही.बहुसंख्य उमेदवारांचा व्यक्तीगत पातळीवर संपर्क करून प्रचार सुरू आहे.
शिराळ्यातून राष्ट्रवादीचे आमदार मानसिंगराव नाईक, खानापूरमधून शिवसेनेचे आमदार अनिलराव बाबर आणि पलूस सोसायटी गटातून काँग्रेसचे महेंद्र लाड बिनविरोध निवडून आले आहेत.

या असणार लक्षवेधी लढती आटपाडीत सोसायटी गटात शिवसेनेचे तानाजी पाटील विरूध्द भाजपचे राजेंद्रअण्णा देशमुख ही सर्वाधिक लक्षवेधी लढत आहे. जतमध्ये काँग्रेसचे आमदार विक्रमसिंह सावंत विरुद्ध भाजपपुरस्कृत प्रकाश जमदाडे, मजूर संस्था गटात महाआघाडीचे हणमंतराव देशमुख, सुनील ताटे आणि भाजपचे संग्रामसिंह देशमुख, सत्यजित देशमुख यांच्यातील निवडणूक अटीतटीची होणार आहे. पतसंस्था गटात राष्ट्रवादीचे किरण लाड, काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील विरुद्ध भाजपचे राहुल महाडिक व अजित चव्हाण यांच्यातील लढत लक्षवेधी आहे.

प्रक्रिया गटात राष्ट्रवादीचे नेते सुरेश पाटील व भाजपचे सी. बी. पाटील यांच्यामध्ये रस्सीखेच होणार आहे. ओबीसी गटात माजी सभापती भाजप नेते तमन्नगौडा रवी – पाटील विरुद्ध आघाडीचे मन्सूर खतीब यांच्यात काटा लढत होणार आहे. याच गटात सुयोग सुतार, मुजीर जांभळीकर हेही अपक्ष उमेदवार आहेत. महिला राखीव गटात जयश्री मदन पाटील, अनिता सगरे विरुद्ध माजी महापौर संगीता खोत, दीपाली पाटील यांच्यातील सामना रंगणार आहे.

कवठेमहांकाळ तालुक्यात माजी मंत्री अजितराव घोरपडे आणि मिरज सोसायटी गटात काँग्रेस नेते विशाल पाटील, कडेगाव गटात आमदार मोहनराव कदम, वाळवा गटात दिलीपराव पाटील ताकदीने निवडणूक लढवत आहेत.
तासगाव गटात आघाडीचे बी. एस. पाटील विरुद्ध भाजपचे सुनील जाधव अशी काटा लढत होणार आहेत. त्याच गटात विद्यमान संचालक प्रताप पाटील हे अपक्ष उमेदवार आहेत. अनुसूचित जाती-जमाती गटात बाळासाहेब होनमोरे, रमेश साबळे, विलास बेले, नितीन काळे अशी चौरंगी लढत आहे. इतर सहकारी संस्था वैभव शिंदे, तानाजी पाटील, शंकर पाटील अशी तिरंगी लढत होत आहे.

सांगली जिल्हा बँक निवडणूक: अनेक प्रकरणे गाजली

गेल्या पाच वर्षात बँकेत अनेक कर्जप्रकरणे, संगणक व फर्निचर खरेदी यामध्ये गैरप्रकार झाल्याची तक्रार काही संघटना आणि संचालक यांनी केली होती. तसेच अनेकांना नियमबाह्य कर्जपुरवठा केला आहे. परिणामी अनेकांकडे मोठी थकबाकी आहे. मात्र याबाबत कोणत्याच पक्षाकडून एकही शब्दही बोलला जात नाही. एरवी एकमेकांवर आरोप करीत बँकेची स्वतःला किती काळजी आहे, हे दाखवणारी मंडळी या निवडणुकीत मात्र अळीमिळीची भूमिका घेतल्याने उलट-सुलट चर्चा सुरू आहे. सर्वांचेच हितसंबंध एकमेकांत गुंतल्याने निवडणुकीच्या आखाड्यातून प्रमुख मुद्दे गायब झाले आहेत.

सांगली जिल्हा बँक निवडणूक 2020-21 मधील लेखाजोखा

जिल्हा बँकेचे मुख्य कार्यालय आहे. तसेच जिल्ह्यात 219 शाखा आहेत. सुमारे 1250 कर्मचारी आहेत. बँकेत आज 6 हजार 423 कोटी रुपयांची ठेवी आहेत. साखर कारखाने, औद्यागिक संस्था, सूतगिरणी अशा विविध गोष्टींसाठी बँकेने 5 हजार 300 कोटींचे कर्ज दिले आहे. 2020-21 या आर्थिक वर्षात बँकेने 12 हजार कोटींचा व्यवसाय केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT