सांगली ; मतदान वळविण्यासाठी गुप्त घडामोडींना वेग | पुढारी

सांगली ; मतदान वळविण्यासाठी गुप्त घडामोडींना वेग

 

सांगली ः पुढारी वृत्तसेवा

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मतदान वळविण्यासाठी गुप्त घडामोडींना वेग आला आहे. अनेक उमेदवारांनी आपले निश्चित असणारे मतदार अज्ञातस्थळी नेऊन ठेवले आहेत. तसेच जाहीर बैठका, सभा जोरात सुरू आहेत. क्रॉस व्होटिंगच्या शक्यतेने सर्वच पक्षाचे बडे नेते, पदाधिकारी जिल्ह्यात तळ ठोकून आहेत.

बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न झाला. पण काहींच्या विरोधामुळे त्याला खो बसला. परिणामी महाविकास आघाडीचे सहकार विकास व भाजपचे शेतकरी विकास या दोन पॅनेलमध्ये दुरंगी सामना रंगतो आहे. गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात दोन्ही पॅनेलच्या नेत्यांनी प्रचार सुरू केला आहे. त्यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी जाहीर सभा घेतल्या आहेत.मतदान वळविण्यासाठी गुप्त घडामोडींना वेग

सभांत फारसे आरोप-प्रत्यारोप झाले नाहीत. उमेदवारांनी प्रत्यक्ष भेटी-गाठींवर भर दिला आहे. प्रत्येक उमेदवारांच्या दोन फेर्‍या झाल्या आहेत. जाहीर प्रचाराची सांगता शुक्रवारी सायंकाळी होत आहे. त्यामुळे पडद्याआडच्या घडामोडींना वेग आला आहे. शनिवारपर्यंत हे प्रकार जोरात चालणार आहेत.

‘कांटे की टक्कर’ असलेल्या लढतींमध्ये मतदारांना वळविण्यासाठी गुप्त हालचाली जोरात सुरू आहेत. सर्व प्रकारची आमिषे मतदारांना दाखविली जात आहेत. प्रामुख्याने रात्रीच्या घडामोडींना वेग आला आहे. निश्चित झालेले मतदान अज्ञातस्थळी ठेवले जात आहे. त्यांची सर्वप्रकारची सरबराई केली जात आहे.

प्रचाराची सांगता शुक्रवारी होत असल्याने सर्वच पक्षाचे नेते जिल्ह्यात आले आहेत. काठावर असलेले मतदान फोडण्यासाठी नेते, उमेदवार यांचे नियोजन सुरू आहे.अंतिम टप्प्यात क्रॉस व्होटिंगसाठी अनेकांचे प्रयत्न सुरू आहेत. ‘ मला एक मत द्या, दुसरे मत तुम्ही कोणालाही देऊ शकता’, असा प्रचार काही उमेदवारांनी सुरू केला असल्याची चर्चा आहे. त्यामुळे प्रचार शिगेला पोहोचला आहे.

Back to top button