नगर : शिवकालीन इतिहासाच्या नोंदींचे मोडी पत्र उजेडात! | पुढारी

नगर : शिवकालीन इतिहासाच्या नोंदींचे मोडी पत्र उजेडात!

नगर : पुढारी वृत्तसेवा

छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मनोंद तसेच राज्याभिषेक व मृत्यू नोंद असलेले ऐतिहासिक अप्रकाशित मोडी पत्र उजेडात आली आहेत. नगरच्या ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयाचे अभिरक्षक व मोडी अभ्यासक डॉ. संतोष यादव यांनी ते उजेडात आणले आहे. पुण्याच्या सरदार आबासाहेब मुजूमदार यांच्याकडील मोडी कागदपत्रांचा संग्रह नुकताच ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयाकडे अनुपमा मुजूमदार यांनी सुपूर्द केला. या संग्रहात छत्रपती शिवाजी महाराजांची जन्म नोंद तसेच राज्याभिषेक व मृत्यू नोंद असलेले ऐतिहासिक अप्रकाशित मोडी पत्र आढळून आले आहे.

अनुपमा मुजूमदार यांनी वस्तुसंग्रहालयास हजारो मोडी कागदपत्रे दिली आहेत. वस्तुसंग्रहालयाने तातडीने या दस्तऐवजाचे वर्गीकरण करण्याचे काम सुरू केले आहे. नारायण आव्हाड, आनंद कल्याण, राहुल भोर तसेच रामदास ससे, बापू मोढवे, गणेश रणसिंग आदी इतिहास अभ्यासक या दस्तऐवजाचे वर्गीकरण करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मनोंद असल्याचे मोडीपत्र सापडले. त्याचा अभिरक्षक डॉ. संतोष यादव यांनी सखोल अभ्यास करून त्याचे लिप्यंतर केले.

या पत्रामध्ये छत्रपती शाहू राज्यारूढ झाले, वैकुंठ गमन या नोंदी तसेच बाळाजी बाजीराव पेशवाई कधी करू लागले, वैकुंठगमन कधी झाले, नारायणराव पेशवे यांनी नऊ महिने राज्य केले, आबाजी त्र्यंबक यास दिवाणगीचे वस्त्र दिले, छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शके 1549 (इ.स. 1627), पट्टाभिषेक (राज्याभिषेक) शके 1596 (इ.स.1674), मृत्यू (वैकुंठ गमन) शके 1602 (इ. स. 1680) अशा मोडीतील नोंदी आढळून आल्या आहेत.

नगरच्या ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयात उपलब्ध
मोडी कागदपत्रांचा संग्रह वस्तुुसंग्रहालयाकडे सुपूर्द
जुन्या नोंदींसह घराण्यांचा कागदपत्रांमध्ये उल्लेख

 

पाहा व्हिडिओ

मेंटल हेल्थ विषयात पी. एचडी करणारा पहिला तृतीयपंथी

Back to top button