परमबीर सिंग, समोर या ! | पुढारी

परमबीर सिंग, समोर या !

कायदा गाढव असतो आणि कायद्यापुढे शहाणपण चालत नाही, असे आपली बुजुर्ग मंडळी नेहमी सांगत असतात. हे अनुभवाचे बोल म्हणजे कायद्याचा अपमान नव्हे. कायद्यानेच दिलेले हे शहाणपण एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे प्रवास करत आपल्यापर्यंत पोहोचले. हे शहाणपण आज पुन्हा आठवण्याचे कारण म्हणजे, आयपीएस अधिकारी परमबीर सिंग. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या खंडणी वसुलीचा आरोप करणारा ‘लेटरबॉम्ब’ टाकून परमबीर गेल्या मेपासून बेपत्ता आहेत. त्यांच्या पत्रामुळे देशमुखांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि आज हेच देशमुख ‘ईडी’च्या न्यायालयीन कोठडीत आहेत. परमबीर सिंग यांच्या आरोपांची प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने सीबीआयला दिले. या प्राथमिक चौकशीत देशमुखांच्या विरोधात कोणताही पुरावा आढळला नाही, तरीही सीबीआयने एफआयआर नोंदवला. पाठोपाठ ‘ईडी’नेही उडी घेतली. या चौकशीविरोधात देशमुख सुप्रीम कोर्टापर्यंत लढले. परमबीर यांच्या आरोपांत कोणतेही तथ्य नाही, परमबीर यांनी कोणतेही पुरावे दिलेले नाहीत, हे देशमुख यांचे म्हणणे कायद्याने ऐकले नाही. शेवटी ‘ईडी’ चौकशीला हजर होताच देशमुख यांना मध्यरात्री अटक करून कोठडीत डांबण्यात आले. हे सारे होत असताना परमबीर कुठे आहेत? ते मुंबईत नाहीत. ते चंदीगडमध्ये राहत्या घरीदेखील नाहीत. ठाणे आणि मुंबई न्यायालयांचे समन्स घेऊन पोलिस गेले आणि हात हलवत परतले. परमबीर कुठे आहेत, हे कुणालाही माहीत नाही. राज्याच्या राजकारणात आरोपांचा धुरळा उडवून परमबीर बेपत्ता का झाले? कारण, आपले पाप कधी ना कधी आपला पत्ता शोधत येईल, याची त्यांना पूर्ण कल्पना आहे. एकेकाळी मोठ्या कारवाया करून माध्यमांमध्ये हिरो झालेले परमबीर आज एक ना अनेक खंडणी प्रकरणांत आरोपी आहेत. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांची गाडी उभी करणार्‍या सचिन वाझेचे गॉडफादरही तेच आहेत. वाझेला पोलिस दलात त्यांनीच घेतले, नियम डावलून गुन्हे अन्वेषण विभागाच्या प्रमुखपदी त्यांनीच बसवले. अ‍ॅन्टिलिया प्रकरण उघडकीस आल्यानंतर वाझे आणि परमबीर यांच्या सतत बैठका पोलिस आयुक्तालयात झाल्या. त्याचे सीसीटीव्ही फुटेज एटीएसच्या हाती पडले आणि परमबीर यांनी ते अपडेट करण्यासाठी मागवून घेतले. तेव्हापासून हे सीसीटीव्ही फुटेज पुन्हा कधीही दिसलेले नाहीत. परमबीर यांनी ते गायब केले; पण कोणताही गुन्हेगार काही ना काही धागेदोरे मागे सोडतोच. परमबीर यांचेही असे अनेक धागेदोरे ठाणे आणि मुंबई पोलिसांनी जमवले. गुन्हे दाखल झाले. परमबीर
निर्दोष असतील, तर त्यांनी उजळ माथ्याने समोर आले पाहिजे. चौकशीला सामोरे गेले पाहिजे. न्यायालयात उभे राहून स्वत:चा बचाव केला पाहिजे. परमबीर आणि देशमुख यांना आमने-सामने उभे करून चौकशी झाली असती, पुरावे तपासले गेले असते, तर तो खरा न्याय झाला असता. आज परमबीर बेपत्ता आहेत आणि त्यांनी उठवलेली आरोपांची राळ चिवडत केंद्रीय यंत्रणा मात्र दिल्लीपासून गल्लीपर्यंत राबते आहे. हे खचितच न्यायाचे चित्र नाही.

आज परमबीर सिंग होमगार्डचे महासंचालक आहेत, ते केवळ कागदावर. प्रत्यक्षात ते एक फरार आरोपी आहेत. वारंवार समन्स बजावूनही हजर होत नाहीत म्हणून मुंबई न्यायालयाने त्यांना फरार आरोपी घोषित केलेे. याचे परिणाम परमबीर जाणतात. एका फरार आरोपीला पकडण्यासाठी जे जे करावे लागते, ते मुंबई पोलिस आता करतील. परमबीर यांच्या संपत्तीवरही टाच येऊ शकते. त्यामुळे ‘मला अटक करू नका’, अशी विनवणी करत परमबीर यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आणि तोंड फोडून घेतले. एका फरार आरोपीला फरार आरोपीसारखीच वागणूक दिली पाहिजे, असा संदेशच सुप्रीम कोर्टाने दिला. न्यायमूर्तींनी विचारले, ‘परमबीर, तुम्ही कुठे आहात? तुमचा ठावठिकाणा नाही. तुम्ही विदेशात बसून आमच्याकडे अटकेपासून संरक्षण मागत असाल, तर न्यायालयाने तुमच्या बाजूने आदेश दिले, अटकेपासून संरक्षण दिले, तरच तुम्ही भारतात याल, समोर याल, असे चालणार नाही. तुम्ही कुठे आहात हे आधी आम्हाला सांगा. तोपर्यंत तुमच्या अर्जांची सुनावणीदेखील होणार नाही आणि अटकेपासून संरक्षणही नाही.’ आपल्या आरोपीचा तपशील सांगणे वकिलांना बंधनकारक नसते. कायद्यात अशा तरतुदी नक्कीच आहेत. मात्र, या तरतुदीदेखील आज परमबीर यांच्या पाठीशी किती उभ्या राहतील, असा प्रश्न आहे. परमबीर यांचा ठावठिकाणा सांगा, असे आदेश देत न्यायमूर्तींनी पुढील सुनावणीची तारीख परमबीर यांच्या वकिलांच्या हाती ठेवली. ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ असे घोषवाक्य भिंतीवर टांगून परमबीरसारखे वर्दीतील अधिकारी गुन्हेगार बनत असतील, खंडण्या उकळत असतील, तर कायद्याच्या अशा राज्यात सामान्य माणसाचा वाली कोण? परमबीर यांच्या विरोधात दाखल झालेले खंडणीचे गुन्हे हे राजकीय नव्हेत. हे दडपलेले गुन्हे होते. परमबीर पोलिसी सत्तापदावरून बाजूला होताच, हे गुन्हे एक एक करून वर येऊ लागले. या गुन्ह्यांची तड लावायची असेल, तर परमबीर यांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे राहून आपला बचाव करावा लागेल. स्वत:चा बचाव करण्यासाठी मुळात सचोटीची ताकद असावी लागते. ती परमबीर यांच्याकडे नाही. अनिल देशमुख यांच्या विरोधात आपण जे पत्र लिहिले तोच काय तो पुरावा, आणखी कोणतेही पुरावे माझ्याकडे नाहीत, असे शपथपत्रच परमबीर यांनीच न्यायालयात सादर केले, त्याच दिवशी परमबीर खरे तर कोठडीत असायला हवे होते. सुप्रीम कोर्टाच्या दणक्यानंतर तरी परमबीर यांचा ठावठिकाणा कळेल, अशी आशा आहे.

Back to top button