नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक येथे मुलाचा खून करून आईने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अभ्यास करत नाही म्हणून आईने आपल्या मुलाचा खून करून स्वताचेही जीवनही संपवल्याचा प्रकार समोर आला आहे.
या विषयी अधिक माहिती अशी की, अभ्यास करत नाही म्हणून तीन वर्षीय चिमुकल्याचा खून करून आईने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पाथर्डी फाटा परिसरात उघडकीस आला आहे.
रिधान सागर पाठक (वय ३) असे खून झालेल्या मुलाचे नाव असून शिखा सागर पाठक (३२) असे आत्महत्या केलेल्या आईचे नाव आहे.
इंदिरानगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि.९) सायंकाळच्या सुमारास हा प्रकार घडला. पाथर्डी फाटा येथील साईसिद्धी अपार्टमेंटमध्ये पाठक कुटुंबीय राहतात.
सोमवारी शिखा यांनी बेडरुमचा दरवाजा लावून घेतला. बराच वेळ झाला तरी प्रतिसाद न मिळाल्याने सुरेश गंगाराम पाठक (६९) यांनी मुलास बोलवून घेत बेडरुमचा दरवाजा तोडला.
त्यावेळी शिखा या गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला, तर रिधानच्या नाकातून रक्त येत होते. त्यामुळे कुटुंबियांनी रिधानला दवाखान्यात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
मृतदेहाजवळ शिखा यांची चिठ्ठी आढळून आली. त्यामध्ये सर्वच निर्णय मी स्वखूशीने घेते, त्यात कोणाचीही चुकी नाही असे लिहले होते.
या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी केलेल्या तपासात रिधान अभ्यास करत नसल्याचा शिखा यांना राग येत होता व त्यामुळे त्यांची चिडचिड होत होती. त्यातूनच त्यांनी मुलाचा खून करून स्वत: आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.