भोकरदन; पुढारी वृत्तसेवा : मित्राचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या एका हॉटेल चालक तरुणाचा खून झाल्याची घटना गुरुवारी रात्री १० वाजता भोकरदन शहरा जवळील फत्तेपूर रोडवर घडली.
या भांडणात सागर भारत बदर ( २७, रा. वालसा खालसा ) असे खून झालेल्या हॉटेल चालक तरुणाचे नाव असून, त्याचा ४० दिवसांपूर्वीच विवाह झाला होता.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गुरुवारी रात्री सागर बदर हा मित्र कैलास गजानन फुके ( रा. फत्तेपुर ) याचा लहान भाऊ सुनीलचा वाढदिवस साजरा करण्यासाठी भोकरदन-जालना रोडवरील एका हॉटेलमध्ये गेला होता. वाढदिवस साजरा झाल्यानंतर जेवण करण्यापूर्वी कैलासला जुने वाद असलेल्या योगेश पुंजाजी फुकेने फोन केला.
आपल्यातील जुने वाद मिटवून टाकु तु फत्तेपूर रोडवरील २२० केव्ही केंद्राजवळ ये असे सांगत योगेशने कैलासला बोलावून घेतले. कैलासने सागरला सोबत घेत दुचाकीवरून केंद्र गाठले. येथे योगेश सोबत हनुमंत फुके देखील होता. यावेळी कैलास व योगेश यांच्यात बाचाबाची झाली. मात्र, सागर व इतरांनी भांडण मिटवले. यानंतर कैलास दुचाकी चालविण्यासाठी बसला, त्याच्यामागे सागर बसण्यासाठी निघाला. याच दरम्यान योगेशने सागरच्या पोटात चाकू खुपसला.
अचानक झालेल्या वादामुळे सागर खाली कोसळला. हे पाहताच योगेश फुकेने तेथुन पळ काढला. कैलास व इतरांनी सागरला भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. रक्तस्त्राव जास्त होत असल्याने डॉक्टरांनी अधिक उपचारासाठी त्याला जालना येथे पाठवले.
मात्र, जालना येथे पोहचण्यापूर्वीच रात्री ११ वाजेच्या दरम्यान सागरचा मृत्यू झाला. या प्रकरणात सागरच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून योगेश फुके विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला असला तरी आरोपी फरार असल्याने नातेवाईक संतप्त झाले होते. नातेवाईकांनी उपविभागीय पोलिस अधिकारी इंदलसिंग बहुरे यांची भेट घेतली. आरोपीचे ईन कॅमेरा जबाब घ्या, शासकीय साक्षीदार घ्या अशी नातेवाईकांची भूमिका होती.
नातेवाईक मोठ्या संख्येने जमा होत असल्याने जालना येथुन पोलिस बळ बोलविण्यात आले होते. दरम्यान नातेवाईक भोकरदन येथील पोलिस ठाण्यात आणि सागरचा मृतदेह जालना येथे होता. पोलिस अधिकारी नातेवाईकांची त्यांची समजूत काढत होते. दुपारी दोन वाजे दरम्यान नातेवाईकांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर ते शांत झाले होते.
बोरी पिंपळगाव ( ता.गेवराई, जिल्हा बीड ) येथील पवार कुटुंबातील मुलीशी सागराचा ४० दिवसांपूर्वी विवाह झाला होता. सागर अत्यंत मनमिळावू आणि होतकरू होता. दरम्यान सुखी संसाराची स्वप्ने पाहणाऱ्या सागरचे अचानक निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.