विटा पुढारी वृत्तसेवा : भाजपचे प्रवक्ते आणि आमदार गोपीचंद पडळकर, सांगली जि. प.चे माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्यासह अन्य चार जणांवर विटा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. राज्य शासनाचा बंदी आदेश डावलून बाणूरगड (जि. सांगली) येथे नरवीर बहिर्जी नाईक स्मारकाचे भूमिपूजन कार्यक्रमाच्या वेळी गर्दी जमवली असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
सोमवारी १९ जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजता खानापूर तालुक्यातील बाणूरगड (जि. सांगली) येथे स्वराज्याच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक यांच्या स्मारकाचे भूमिपूजन माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सदाभाऊ खोत होते.
यावेळी भाजपचे प्रवक्ते आमदार गोपीचंद पडळकर, जि. प. अध्यक्षा प्राजक्ता कोरे, जि.प उपाध्यक्ष शिवाजीराव डोंगरे, माजी समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर, बाणूरगडचे सरपंच सज्जन बाबर, उपसरपंच कांताताई गायकवाड प्रमुख उपस्थित होते.
हा कार्यक्रम सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या बंदी आदेशाचे उल्लंघन करुन झाला. तसेच बहिर्जी नाईक यांच्या स्मारकाच्या ठिकाणी अंदाजे १५० ते १७० लोक उपस्थित होते. त्यामुळे भारतीय दंड संहिता अधिनियम १८६० चे कलम १८८, भारतीय साथ रोग अधिनियम १८९७ कलम ११, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१ अ प्रमाणे बाणूर गड चे सरपंच सज्जन बाबर, निलेश नेताजी पाटील (रा. खंबाळे (भा)), आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर या चोघांविरोधात
विटा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबतची फिर्याद विट्याचे नायब तहसीलदार चेतन कोनकर यांनी दाखल केलेली आहे.