पेगासस हेरगिरी : संसदीय समिती करणार चर्चा, अधिकाऱ्यांची झाडाझडती होणार | पुढारी

पेगासस हेरगिरी : संसदीय समिती करणार चर्चा, अधिकाऱ्यांची झाडाझडती होणार

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : पेगासस हेरगिरी : पेगासस सॉफ्टवेअर वापरून नेते आणि पत्रकारांची कथित हेरगिरी केल्याच्या मुद्द्यावर येत्या 28 तारखेला माहिती-तंत्रज्ञानविषयक संसदीय समिती चर्चा करणार आहे. काँग्रेसचे खासदार शशी थरूर हे या समितीचे अध्यक्ष आहेत.

माहिती-तंत्रज्ञान मंत्रालय तसेच गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती या बैठकीवेळी घेतली जाण्याची शक्यता असल्याचे बुधवारी सूत्रांकडून सांगण्यात आले. ‘नागरिकांची डेटा सिक्युरिटी व गोपनीयता’ हा संसदीय समितीच्या चर्चेचा विषय आहे.

पेगासस सॉफ्टवेअरच्या माध्यमातून असंख्य नेते व पत्रकारांची हेरगिरी करण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. या मुद्द्यावरून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दोन दिवसांत विरोधी पक्षानी प्रचंड राडेबाजी केली होती. सदर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी केली जावी, असा विरोधकांचा आग्रह आहे.

अधिक वाचा 

परदेशी कंपन्या आणि काही मोबाईल अ‍ॅपकडून देशातील पत्रकार, बडे राजकीय नेते आणि सुरक्षा एजन्सीच्या माजी प्रमुखांसह इतर काही महत्त्वाच्या व्यक्तींची Pegasus Spyware चा वापर केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार विरोधी पक्षांनी सोमवारी जोरकसपणे संसदेत उघडकीस आणला.

पत्रकार आणि राजकीय नेत्यांचे फोन टॅप

पत्रकार आणि राजकीय नेत्यांचे फोन टॅप केले जात आहेत. त्यांच्यावर हेरगिरीसाठी इस्रायली Pegasus Spyware सॉफ्टवेअरचा वापर केला जात असल्याचा आरोप करीत या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी विरोधकांनी लोकसभेमध्ये रेटून धरली.

पहिल्याच दिवशी विरोधकांनी सत्ताधार्‍यांची चांगलीच कोंडी केली.हा देशाच्या सुरक्षेचा अत्यंत संवेदनशील मुद्दा असल्याचे सांगून विरोधकांनी सत्ताधार्‍यांना भंडावून सोडले.

हेरगिरीसाठी इस्रायली Pegasus Spyware वापरले जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला. त्यामुळे कामकाजात सतत व्यत्यय आला.
लोकसभा अध्यक्षांनी वारंवार सूचना करूनही या मुद्द्यावर सखोल चर्चेची मागणी लावून धरल्याने अखेर सभागृह तहकूब करावे लागले.दुपारी साडेतीन वाजता पुन्हा लोकसभेचे कामकाज सुरू होताच विरोधकांनी पुन्हा घोषणाबाजी सुरू केली. अशा वातावरणातच केंद्रीय दूरसंचारमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सभागृहात निवेदन सादर केले.

पेगासस हेरगिरी :  Pegasus Spyware चा 45 देशांमध्ये संचार

Pegasus Spywareअसून, इस्रायलमधील ‘एनएसओ’ ग्रुप या पाळत ठेवणार्‍या कंपनीने ते विकसित केले आहे. याआधारे मोबाईल हॅक करता येऊ शकतो.

हॅक केलेल्या फोनमधील कॅमेरा, माईक, मेसेज तसेच कॉल्स, पासवर्ड, कॅलेंडर, व्हिडीओ, लोकेशन, व्हॉटस्अ‍ॅप कॉल अशी इत्थंभूत माहिती हॅकरला प्राप्त होते.

‘पेगासस’ ऑपरेट करणारी व्यक्ती कॅमेरा तसेच मायक्रोफोनही ऑपरेट करू शकते.

सुरुवातीला स्पायवेअरद्वारे मोबाईलवर एक लिंक पाठवली जाते. ती क्लिक केली की, हे स्पायवेअर मोबाईलमध्ये इन्स्टॉल होते आणि मोबाईलचे नियंत्रण हॅकरकडे जाते.

अशा लिंकवर क्लिक न करताही हे स्पायवेअर मोबाईलमध्ये प्रवेश करू शकते.

2019 मध्ये व्हॉटस्अ‍ॅपच्या माध्यमातून हे स्पायवेअर काही मोबाईलमध्ये इन्स्टॉल केल्याचे उघड झाले आहे.

मोबाईलमध्ये प्रवेश केल्यानंतर ‘पेगासस’ कोणताही पुरावा मागे सोडत नाही.

थोडक्यात, तुमचा फोन हॅक झाला आहे, हे तुम्हाला समजणारही नाही.

फोन लॉक असला तरी हे स्पायवेअर कार्यरत राहते.

अँड्रॉईडच्या तुलनेत सुरक्षित मानल्या जाणार्‍या आयफोनची आयओएस ही ऑपरेटिंग प्रणालीही याद्वारे हॅक करता येते.

या स्पायवेअरचा भांडाफोड करणार्‍या सिटीझन लॅबच्या माहितीनुसार, 45 देशांमध्ये हे स्पायवेअर अस्तित्वात आहे.

2016 मध्ये या स्पायवेअरद्वारे हेरगिरीचे पहिले प्रकरण उघडकीस आले.

हे  ही वाचलं का?

Back to top button