डोंबिवलीमध्ये अवतरला तीन नद्यांचा संगम; लक्ष वेधण्यासाठी नेटकऱ्यांनी उपरोधिक टीका | पुढारी

डोंबिवलीमध्ये अवतरला तीन नद्यांचा संगम; लक्ष वेधण्यासाठी नेटकऱ्यांनी उपरोधिक टीका

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा: एमआयडीसी, पीडब्ल्यूडी आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिका या तिन्ही प्रशासनांचे लक्ष वेधण्यासाठी नेटकऱ्यांनी उपरोधिक टीका करणारी पोस्ट सादर केली आहे.

डोंबिवली एमआयडीसीच्या निवासी विभागात चक्क ३ नद्या अवतरल्या आहेत.

तेथील चौकांच्या नावावरुन या नद्यांचा संगम जोडण्यात आला आहे. मंगळवारी आषाढी एकादशीच्या दिवशीच सादर करण्यात आलेली ही आगळी-वेगळी पोस्ट सोशल मिडीयावर जोरदार धुमाकूळ घालत आहे.

रविवार दुपारपासून धो- धो कोसळणाऱ्या पावसामुळे एमआयडीसीच्या निवासी विभागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. या भागात खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झाल्याचे चित्र सलग पाचव्या वर्षीही पाहायला मिळाले आहे.

या भागातील चार रस्त्यांच्या डागडुजीसाठी एमआयडीसीने पुढाकार घेतला. परंतु. आता हे रस्ते देखील खड्ड्यात गेले आहेत.

उर्वरीत रस्त्यांची स्थितीही खड्डेमय झाली आहे. पावसाच्या पाण्याचाही निचरा योग्य प्रकारे होत नसल्याने पादचारी आणि वाहनचालकांना साचलेल्या पाण्याच्या डबक्यांमधून वाट काढावी लागत आहे.

या पार्श्वभूमीवर स्थानिक रहिवाशांमध्ये कमालीचा संताप व्यक्त करण्यात आली येत आहे. निवासी विभागात कावेरी, ममता आणी मिलाप अशी चौक वजा परिसराची नावे आहेत.

कावेरी नदी, ममता नदी, मिलाप नदी या नद्यांच्या पाण्याची पातळी वाढल्याने सोमवारी दिवसभर त्या दुथडी भरुन वाहत होत्या.

आषाढी एकादशीच्या आधीच्या दिवशी अनेक भाविकांनी लॅाकडाऊनमुळे चंद्रभागेत स्नान करता येणार नाही. मात्र, तिर्थ स्नानाची पर्वणी या तिन्ही नद्यांच्या संगम परिसरातील अनेक ठिकाणी साधली.

आर. आर. हॅास्पिटल ते चार बिल्डींग, तसेच दावडी, सोनारपाडा परिसरात मोक्षप्राप्तीसाठी शेकडो भाविकांनी गर्दी केली.

महापालिका प्रशासनाने पाण्याचा निचरा लवकर होऊन भाविकांना तिर्थ स्नानाचा आनंद पुरेपुर मिळावा यासाठी काटेकोर नियोजन करुन जवळपास १४ तास पाणी नदीपात्रांमध्ये वाहते राहील याची काळजी घेतली.

या स्नानानंतर सर्व भाविक महापालिकेला धन्यवाद देत व मुखाने ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम…’असा हरिनामाचा गजर करत आनंदाने पुण्यप्राप्तीचा दिव्य अनुभव घेऊन घरी परतत होते.

‘विठु माऊली तु सावली जगाची…’ याचा प्रत्यय दे आणी दरवर्षी गंगा आमच्या दारी येऊ दे, हिच भावना शेकडो भाविक परतीच्या मार्गावर व्यक्त करत होते. या पोस्टला अनेकांच्या हशा आणी टाळ्या, तर काहींकडून प्रशासनाला लाखोल्या वाहिल्या जात होत्या.

 नेटकऱ्यांची मागणी

एमआयडीसी विभागात रस्त्याच्या बाजूला आवश्यक असणारे पावसाचे पाणी वाहून नेणारी गटारे व नाले बांधण्यात आले होते. ज्या ठिकाणी गटारे व नाले २५ ते ३० वर्षापूर्वी बांधण्यात आले आहेत.

सध्या ते सुस्थितीत नसल्यामुळे पावसाळी पाण्याचा निचरा लवकर होत नसून थोडा जरी पाऊस पडला तरी पाणी तुंबते.

हेही वाचलंत का?

पाहा : खारघर : धबधब्यावर अडकलेल्या ११८ पर्यटकांची सुटका..!

Back to top button