पुढारी ऑनलाईन डेस्क: काँग्रेसमध्ये मोठी भूमिका निभावण्यासाठी इच्छुक असलेल्या रणनीतीकार प्रशांत किशोर यांना वेटिंगवर ठेवल्याने त्यांनी राजकारणापासून बाजुला राहण्याचा निर्णय घेतला आहे. राजकारणापासून दूर राहून विश्रांती घेऊ असे किशोर यांनी जाहीर केले आहे.
एका वृत्तवाहिनीच्या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, प्रशांत किशोर यांनी राजकारणात ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे.
पुढील वर्षी मार्चच्या आधी कोणतंही काम हाती न घेण्याचा निर्णय घेतला आहे.
पक्षाच्या आत किंवा बाहेर ते कोणतीही भूमिका ते बजावणार नाहीत. त्यांनी याआधीच आपण जे काम करत होतो त्यामधून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केले आहे.'
पश्चिम बंगाल निवडणुकीत रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी तृणमूल काँग्रेसला मोठा विजय मिळवून दिला होता.
त्यानंतर त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांना मदत करण्याबाबत भाष्य केले होते.
त्यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या विविध राज्यांतील विधानसभा निवडणुकीमध्ये किशोर कोणत्याही पक्षासाठी काम करणार नाहीत हे स्पष्ट झाले आहे.
रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्यासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन प्रदीर्घ चर्चा केली होती.
काँग्रेसला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी त्यांना केवळ रणनीतीकार ही भूमिका नको होती. त्यासाठी पक्षातील एक पद हवे होते.
त्यावर पक्षात चर्चा सुरू होती. मात्र पक्षाने अद्याप निर्णय घेतलेला नाही. जुन्या फळीचा किशोर यांना विरोध असल्याने हा निर्णय मागे ठेवल्याचे सूत्रांकडून समजते.
प्रशांत किशोर लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरु होत्या.
२०२४ लोकसभा निवडणुकीआधी पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांकडे काँग्रेसची पूर्वतयारी म्हणून पाहिले जाते.
त्यामुळे किशोर यांच्यासाठी हा काळ कितपत फलदायी ठरणार हे येणारा काळ ठरवेल.
कर्नाटक, उत्तरप्रदेश, गोवा, उत्तराखंड, पंजाब या राज्यांतील निवडणुका काँग्रेससाठी कसोटीचा क्षण असेल. यात कर्नाटकात सत्तांतर होईल अशी चिन्हे आहेत.
उत्तरप्रदेशमध्ये फारसा बदल होईल अशी चिन्हे नाहीत, पंजाबमध्ये काँग्रेसअंतर्ग लाथाळ्या सुरू असल्याने त्याचा परिणाम निवडणुकीवर होऊ शकतो.
गोव्यातही सत्तांतराची चिन्हे आहेत. त्यामुळे राहुल गांधी आणि अन्य नेत्यांच्या बळावर या निवडणुका लढायच्या अशी चर्चा आहे.
लोकसभेपूर्वी प्रशांत किशोर यांना रणनीतीसाठी सूत्रे द्यायची अशीही काँग्रेसची रणनीती असू शकते. किशोर यांच्या ऑफरवर काँग्रेसच्या संघटनेत वेगाने निर्णय होण्याची शक्यता फार कमी असल्याने ते वेट अँड वॉचच्या भूमिकेतही गेलेले असू शकतात.