FIFA World Cup 2026 final  Pudhari
स्पोर्ट्स

FIFA World Cup 2026 final : अंतिम सामन्याने मोडले तिकीट दरांचे सर्व रेकॉर्ड! रिसेल मार्केटमध्ये एक तिकिट तब्बल १२ लाखांना!

अर्जेंटिना विरुद्ध स्पेन महामुकाबल्यासाठी तिकिटांच्या रिसेल दर अभूतपूर्व पातळीवर

पुढारी वृत्तसेवा

FIFA World Cup 2026 final : जगभरातील फुटबॉल चाहत्यांचे लक्ष लागून राहिलेल्या फिफा विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यापूर्वी तिकीट विक्रीच्या बाजारात नवा इतिहास रचला आहे. या अंतिम सामन्याच्या तिकिटांचे दर गगनाला भिडले असून, हा सामना आतापर्यंतच्या क्रीडा जगताच्या इतिहासातील सर्वात महागडा क्रीडा कार्यक्रम ठरण्याच्या मार्गावर आहे. न्यूयॉर्क-न्यू जर्सी येथील भव्य मेटलाइफ स्टेडियमवर होणाऱ्या अर्जेटिंना -स्‍पेन या महामुकाबल्यासाठी तिकिटांच्या पुनर्विक्रीचे दर अभूतपूर्व पातळीवर पोहोचले आहेत. या सामन्याच्या तिकिटांच्या पुनर्विक्रीचे (रिसेल ) दर अमेरिकेतील लोकप्रिय 'सुपर बाउल' आणि 'एनबीए फायनल्स'ने प्रस्थापित केलेले मागील सर्व रेकॉर्ड्स मोडीत काढत आहेत.

मेस्सीची क्रेझ आणि जागतिक प्रेक्षक

'द न्यूयॉर्क टाइम्स'च्या रिपोर्टनुसार, न्यूयॉर्क-न्यू जर्सी येथील भव्य मेटलाइफ स्टेडियमवर रविवार, १९ जुलै रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यासाठी तिकिटांच्या पुनर्विक्रीचा सरासरी दर अभूतपूर्व पातळीवर पोहोचला आहे. लिओनेल मेस्सीचा हा कदाचित शेवटचा विश्वचषक सामना असण्याची शक्यता असल्याने या मागणीला अधिकच वेग आला आहे. अर्थात, अर्जेंटिनाने अंतिम फेरीत जागा निश्चित करण्याच्या खूप आधीपासूनच तिकिटांचे दर वाढण्यास सुरुवात झाली होती. फुटबॉलचा जादूगार लिओनेल मेस्सीचे सलग दुसरे विश्वचषक विजेतेपद मिळवण्याचे स्वप्न, जगभरातून असणारी प्रचंड मागणी आणि या स्पर्धेला लाभलेला ऐतिहासिक प्रेक्षकवर्ग यांमुळे हे दर रॉकेटसारखे वर गेले आहेत.

पुनर्विक्रीच्या तिकिटाची सरासरी किंमत १२.२७ लाख रुपये

'द न्यूयॉर्क टाइम्स'ने तिकीट मार्केटप्लेस 'सीटगीक' च्या हवाल्याने दिलेल्या आकडेवारीनुसार, फिफा विश्वचषक अंतिम सामन्याच्या पुनर्विक्रीच्या तिकिटाची सरासरी किंमत १२,७५१ डॉलर्स (सुमारे १२.२७ लाख रुपये) वर पोहोचली आहे. यापूर्वी २०२४ मध्ये 'केन्सस सिटी चीफ्स' आणि 'सॅन फ्रान्सिस्को ४९नर्स' यांच्यातील 'सुपर बाउल' सामन्यादरम्यान १०,५४० डॉलर्सचा विक्रम नोंदवला गेला होता, तो या दराने सहज मागे टाकला आहे.

सर्वात स्वस्त तिकिटांचीही सुमारे ७.३१ लाख रुपयांना विक्री

अवघ्या दोन दिवस आधी प्रमुख रिसेल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेली सर्वात स्वस्त तिकिटे देखील सुमारे $७,६०० (साधारण ७.३१ लाख रुपये) ला विकली जात होती. प्रीमियम 'कॅटेगरी १' च्या जागा ११,००० डॉलर्सच्या (साधारण १०.५९ लाख रुपये) वर फिक्स झाल्या होत्या. उद्योग क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले की, या प्रमाणात एवढी मोठी सरासरी रिसेल व्हॅल्यू यापूर्वी कोणत्याही क्रीडा प्रकारात पाहिली गेलेली नाही.

तिकिटाचे २० टक्के खरेदीदार आंतरराष्ट्रीय

एनएफएलच्या (NFL) 'सुपर बाउल'चा प्रेक्षकवर्ग प्रामुख्याने उत्तर अमेरिकेपर्यंत मर्यादित असतो. तर फिफा विश्वचषक संपूर्ण जगातील खरेदीदारांना आकर्षित करतो. 'स्टबहब' (StubHub) वर अंतिम सामन्याच्या तिकीट खरेदीदारांपैकी तब्बल २० टक्के खरेदीदार हे आंतरराष्ट्रीय आहेत; तर २०२४ च्या सुपर बाउलसाठी हे प्रमाण केवळ ४.५ टक्के इतकेच होते. यामध्ये स्टेडियमच्या क्षमतेचाही मोठा वाटा आहे. न्यूयॉर्क-न्यू जर्सी स्टेडियमची क्षमता ८०,००० पेक्षा जास्त प्रेक्षकांची आहे. अलीकडच्या सुपर बाउलच्या मैदानांपेक्षा हे स्टेडियम लक्षणीयरीत्या मोठे असूनही, येथे तिकिटांच्या पुनर्विक्रीने ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला आहे.

फिफाची तिकीट रणनीती यशस्वी

फिफाने सुरुवातीला जेव्हा अंतिम सामन्याची तिकिटे बाजारात आणली, तेव्हा त्यांच्या किमतींवर चाहत्यांनी प्रचंड टीका केली होती. प्रीमियम जागांची किंमत सुरुवातीला ६,७०० डॉलर ( सुमारे साडेसहा लाख रुपये), तर 'कॅटेगरी १' च्या तिकिटांचे दर सुमारे ११,००० डॉलर्स (भारतीय चलनात सुमारे १० लाख रुपये). यानंतर रिसेल मार्केटने हे दर अधिकच वाढवले.

फिफाने केले होते तिकीट दरांचे समर्थन

फिफाने संपूर्ण स्पर्धेत आपल्या या तिकीट दरांचे समर्थन केले आहे. फुटबॉलच्या या सर्वात मोठ्या महोत्सवाची वाढती मागणी पाहता हे दर योग्यच आहेत, विशेषतः अमेरिकेसारख्या देशात तिकिटांची पुनर्विक्री (Resale) सामान्य आहे, असा युक्तिवाद फिफाने केला होता. आता बाजारातील स्थितीने फिफाच्या याच भूमिकेवर शिक्कामोर्तब केल्याचे दिसत आहे. विश्वचषकातील बहुतांश सामने रिसेल प्लॅटफॉर्मवर त्यांच्या मूळ किमतीपेक्षा जास्त दराने विकले गेले आहेत, तर अंतिम सामना हा या स्पर्धेतील सर्वात हॉट इव्हेंट ठरला आहे.

प्रेक्षकसंख्‍येचेही नवनवे रेकॉर्ड्स

तिकिटांच्या किमतींव्यतिरिक्त, २०२६ ची ही स्पर्धा इतिहासामधील सर्वात मोठी फिफा विश्वचषक स्पर्धा ठरली आहे. फिफाने या ४८ संघांच्या विस्तारित स्पर्धेत विक्रमी प्रेक्षकसंख्येची पुष्टी केली आहे. अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोमधील स्टेडियम्स सरासरी ९९ टक्क्यांपेक्षा जास्त क्षमतेने भरलेली राहिली आहेत.

अंतिम सामना हाऊसफुल्ल होण्याचा अंदाज

रविवारी अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात होणारा अंतिम सामनाही हाऊसफुल्ल होईल, असा अंदाज आहे. या सामन्याला जगभरातून १ अब्ज (१०० कोटी) पेक्षा जास्त टीव्ही प्रेक्षक लाभण्याची शक्यता असून, या स्पर्धेचे व्यावसायिक महत्त्व यातून अधोरेखित होते. या स्पर्धेतील दोन सर्वात यशस्वी संघ जेतेपदासाठी समोरासमोर येत असताना आणि लिओनेल मेस्सी कदाचित आपला शेवटचा विश्वचषक सामना खेळत असल्याने, हा सामना केवळ फुटबॉल विश्वातील सर्वात मोठा सोहळाच नव्हे, तर इतिहासातील सर्वात महागडे तिकीट असलेला सामना ठरला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT