Neymar retires: ब्राझीलचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात; स्टार फुटबॉलपटू नेमारची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती

FIFA World Cup 2026: फिफा विश्वचषक स्पर्धेत रविवारी रात्री ब्राझीलचे आव्हान अत्यंत नाट्यमय आणि दुर्दैवीरीत्या संपुष्टात आले. या पराभवासोबतच ब्राझीलच्या फुटबॉल इतिहासातील एका सुवर्णकाळाचाही अंत झाला आहे.
Neymar retires
FIFA World Cup 2026 Brazil vs Norway Neymar retires international footballfile photo
Published on
Updated on

FIFA World Cup 2026 Brazil vs Norway Neymar retires international football

न्यूयॉर्क: फिफा विश्वचषक स्पर्धेत रविवारी रात्री ब्राझीलचे आव्हान अत्यंत नाट्यमय आणि दुर्दैवीरीत्या संपुष्टात आले. या पराभवासोबतच ब्राझीलच्या फुटबॉल इतिहासातील एका सुवर्णकाळाचाही अंत झाला आहे. 'मेटलाईफ स्टेडियम'वर झालेल्या उपउपांत्यपूर्व सामन्यात नॉर्वेने ब्राझीलचा २-१ असा पराभव केला. या पराभवानंतर भावूक झालेल्या नेमारने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून आपल्या निवृत्तीची घोषणा केली. या घोषणेमुळे नेमारचा प्रसिद्ध पिवळ्या जर्सीमधील १६ वर्षांचा दैदिप्यमान प्रवास थांबला आहे. सामन्याच्या शेवटच्या क्षणी मिळालेल्या पेनल्टीवर त्याने गोल केला, जो त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील अखेरचा गोल ठरला. सामना संपल्यानंतर नेमारला मैदानातच अश्रू अनावर झाले होते.

नॉर्वेकडून ब्राझीलचा धक्कादायक पराभव

सहाव्यांदा विश्वचषक उंचावण्याचे स्वप्न घेऊन मैदानात उतरलेल्या ब्राझीलला नॉर्वेने स्पर्धेतील सर्वात मोठा धक्का दिला. ब्राझीलचा नॉर्वेने २-१ ने पराभव केला. नॉर्वेच्या एर्लिंग हालांडने उत्तरार्धात लागोपाठ दोन गोल करत सामना नॉर्वेच्या बाजूने झुकवला. सामन्याच्या अगदी शेवटच्या मिनिटांत नेमारने पेनल्टीवर गोल करून ब्राझीलचे खाते उघडले, परंतु तोपर्यंत ब्राझीलचा पराभव निश्चित झाला होता. सामन्याची अंतिम शिटी वाजताच नेमार मैदानातच डोक्याला हात लावून रडू लागला, तेव्हा सहकाऱ्यांनी त्याचे सांत्वन केले. हे अश्रू केवळ सामन्यातील पराभवाचे नव्हते, तर आंतरराष्ट्रीय फुटबॉलला निरोप देण्याचे दुःख त्यात होते.

सामन्यानंतर पत्रकारांशी बोलताना नेमार म्हणाला, "माझी आंतरराष्ट्रीय कारकीर्द याच मेटलाईफ स्टेडियमवरून सुरू झाली होती आणि आज याच मैदानावर ती संपली आहे. आता हा प्रवास इथेच थांबत आहे."

२०१० मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या नेमारने आपल्या १६ वर्षांच्या कारकिर्दीत ४ फिफा विश्वचषक आणि २ ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये ब्राझीलचे प्रतिनिधित्व केले.

Neymar retires
FIFA World Cup 2026 : पोराला वाचवण्यासाठी जर्सी-बुट विकले.. आता जर्मनीला रडवले! गोलकीपर ‘ओरलँडो गिल’ बनला पॅराग्वेचा ‘महानायक’

विक्रमी कारकिर्दीला पूर्णविराम

नेमारने ब्राझीलसाठी १३० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक ८० गोल आणि ५९ असिस्ट नोंदवले आहेत. तो ब्राझीलसाठी पुरुष फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणारा खेळाडू म्हणून निवृत्त होत आहे. तसेच, ब्राझीलसाठी सर्वाधिक सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. केवळ गोलच नव्हे, तर ब्राझीलला यश मिळवून देण्यात त्याचा मोठा वाटा होता. २०१२ च्या ऑलिम्पिकमध्ये त्याने रौप्य पदक जिंकले, तर २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये आपल्या नेतृत्वाखाली ब्राझीलला ऐतिहासिक सुवर्णपदक मिळवून दिले. २०२६ च्या विश्वचषकापूर्वी तो दुखापतींशी झुंजत होता, त्यामुळे संघात त्याच्या निवडीचे देशभरात स्वागत झाले होते. मात्र, हा विश्वचषक त्याच्यासाठी निराशाजनक ठरला. पूर्ण स्पर्धेत त्याला केवळ दोन सामन्यांत बदली खेळाडू म्हणून अवघ्या ३७ मिनिटांची संधी मिळाली. नॉर्वेविरुद्धचा पेनल्टी गोल हाच त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ८० वा आणि अखेरचा गोल ठरला.

व्यावसायिक फुटबॉलमधील भवितव्य गुलदस्त्यात

आंतरराष्ट्रीय फुटबॉलला रामराम ठोकला असला, तरी नेमारने व्यावसायिक फुटबॉलमधून पूर्णपणे निवृत्ती जाहीर केलेली नाही. या वर्षाच्या सुरुवातीला आपल्या भविष्याबद्दल बोलताना तो म्हणाला होता, "पुढे काय होईल, हे मला माहित नाही. कदाचित डिसेंबर महिना येईपर्यंत मला पूर्णपणे निवृत्त व्हावेसे वाटेल. सध्या मी प्रत्येक वर्षाचा स्वतंत्र विचार करत आहे. माझे मन जे सांगेल, त्यावरून मी निर्णय घेईन."

दुसरीकडे, ब्राझीलचे मुख्य प्रशिक्षक कार्लो एन्सेलोटी यांनी हा पराभव म्हणजे शेवट नसून एका नव्या युगाची सुरुवात असल्याचे म्हटले आहे. मे महिन्यात प्रशिक्षकपद स्वीकारलेल्या एन्सेलोटी यांनी राजीनामा देण्यास नकार दिला आहे. १९९० नंतर म्हणजेच तब्बल ३६ वर्षांत ब्राझीलचा संघ पहिल्यांदाच विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचू शकलेला नाही. एन्सेलोटी म्हणाले, "आम्हाला अधिक कठोर परिश्रम करावे लागतील आणि नव्या संकल्पनांसह मैदानात उतरावे लागेल. हा पराभव अंत नसून एका नवीन चक्राची सुरुवात आहे."

दरम्यान, या विजयासह नॉर्वेने विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली असून, तिथे त्यांचा सामना मेक्सिको विरुद्ध इंग्लंड यांच्यातील विजेत्याशी होईल. परंतु, ब्राझीलच्या फुटबॉल इतिहासात हा विश्वचषक त्यांच्या एका महान जादुगाराच्या भावूक निरोपासाठी कायम लक्षात राहील.

Neymar retires
FIFA World Cup 2026 : "फुटबॉल आमच्या चारित्र्याची.." : सामन्यानंतर 'फेअर प्ले' मेसेजमध्ये इराणने नेमकं काय म्हटलं?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news