Zubeen Garg Death Case
सिंगापूर : प्रसिद्ध भारतीय गायक आणि संगीतकार झुबीन गर्ग यांचा मृत्यू अतिमद्यपान आणि सुरक्षिततेचे नियम डावलल्यामुळे झाल्याची माहिती सिंगापूर पोलिसांनी आज (दि.१४) 'कोरोनर कोर्टा'त दिली. १९ सप्टेंबर २०२५ रोजी एका खासगी नौकेवरील (यॉट) पार्टीदरम्यान सिंगापूरमधील लाझारस बेटाजवळ समुद्रात पोहताना झुबीन गर्ग यांचा बुडून मृत्यू झाला होता. दरम्यान, झुबीन यांच्या मृत्यूबाबत आसाममध्ये अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. त्यांच्या मॅनेजरसह काही सहकाऱ्यांवर कट रचल्याचे आणि विषप्रयोगाचे आरोपही करण्यात आले होते. मात्र, सिंगापूर पोलिसांनी हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत.
मुख्य तपास अधिकाऱ्यांनी सिंगापूरच्या न्यायालयात सांगितले की, सुरुवातीला पोहताना झुबीन यांनी लाईफ जॅकेट घातले होते, मात्र नंतर त्यांनी ते काढून ठेवले. जेव्हा ते पुन्हा समुद्रात उतरले, तेव्हा त्यांना दुसरे लहान लाईफ जॅकेट देण्यात आले; परंतु त्यांनी ते घेण्यास नकार दिला. "लाईफ जॅकेटशिवाय ते पाण्यात उतरले आणि लाझारस बेटाच्या दिशेने एकटेच पोहू लागले," असे चॅनेल न्यूज एशियाने आपल्या वृत्तात म्हटले आहे. काही वेळाने ते बेशुद्ध अवस्थेत पाण्यावर तरंगताना आढळले.
झुबीन यांना तातडीने नौकेवर आणून सीपीआर (CPR) देण्यात आला, मात्र त्यांना वाचवण्यात यश आले नाही. शवविच्छेदन अहवालानुसार, मृत्यूचे कारण 'बुडणे' असे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या शरीरावरील जखमा या केवळ बचावाच्या प्रयत्नांदरम्यान (सीपीआर) झालेल्या होत्या.
न्यायालयात सादर करण्यात आलेल्या टॉक्सिकोलॉजी अहवालानुसार, झुबीन यांच्या रक्तात अल्कोहोलचे प्रमाण प्रति १०० मिलीमध्ये ३३३ मिलीग्राम इतके आढळले. हे प्रमाण अत्यंत जास्त असून त्यामुळे शारीरिक हालचालींवर नियंत्रण राहत नाही. यॉटच्या कॅप्टनने साक्ष दिली की, झुबीन यांना चालतानाही त्रास होत होता. त्यांचे मित्र त्यांना धरून चालत होते. तसेच, झुबीन यांना उच्च रक्तदाब आणि फिट्स येण्याचा आजार होता. शवविच्छेदन अहवालानुसार, त्यांच्या अंगावर असलेल्या जखमा या त्यांना वाचवताना आणि सीपीआर देताना झालेल्या आहेत. त्यांच्या मृत्यूमध्ये कोणताही घातपात असल्याचा संशय सिंगापूर पोलिसांनी नाकारला आहे.
तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्या दिवशी यॉटवर झुबीन यांच्यासह सुमारे २० लोक उपस्थित होते. यॉटच्या कॅप्टनने दिलेल्या साक्षीनुसार, "झुबीन यॉटवर चढतानाही नीट चालू शकत नव्हते, त्यांच्या दोन मित्रांनी त्यांना पकडले होते. दुसऱ्यांदा जेव्हा ते विना लाईफ जॅकेट पाण्यात उतरले, तेव्हा मी त्यांच्या मित्रांना सावध केले होते की त्यांनी मद्यपान केले आहे, त्यांना जॅकेट घालायला सांगा."
झुबीन यांच्या मृत्यूबाबत आसाममध्ये अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. त्यांच्या मॅनेजरसह काही सहकाऱ्यांवर कट रचल्याचे आणि विषप्रयोगाचे आरोपही करण्यात आले होते. मात्र, सिंगापूर पोलिसांनी हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. तपासात आत्महत्येचा कोणताही हेतू किंवा कोणीतरी ढकलून दिल्याचे पुरावे आढळलेले नाहीत. त्यांनी स्वेच्छेने पोहण्यासाठी पाण्यात उडी घेतली होती, असे ३५ साक्षीदारांच्या जबाबावरून स्पष्ट झाले आहे.
एकीकडे सिंगापूर पोलीस याला अपघात मानत असताना, दुसरीकडे आसाममध्ये या प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे. आसाममध्ये ६० पेक्षा अधिक एफआयआर (FIR) दाखल झाल्याने सीआयडीच्या विशेष तपास पथकाद्वारे (SIT) या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. आसाम पोलिसांनी या प्रकरणी कार्यक्रमाचे आयोजक श्यामकानू महंता, झुबीन यांचे सचिव सिद्धार्थ शर्मा आणि दोन बँड सदस्यांवर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच झुबीन यांचा चुलत भाऊ आणि निलंबित पोलीस अधिकारी संदीपान गर्ग याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.