shahir sabale  
मनोरंजन

महाराष्ट्र शाहीर : साने गुरुजींच्या भूमिकेत दिसणार अमित डोलावत

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : जीवनाच्या प्रवासात योग्य गुरू लाभला, तर तो आपल्याला यशाच्या शिखरावर पोहोचवू शकतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे शाहीर साबळे आणि त्यांचे गुरू साने गुरुजी! शाहीर साबळे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त तयार होत असलेल्या 'महाराष्ट्र शाहीर' या शाहिरांच्या जीवनपटामध्ये त्यांचे गुरु साने गुरुजी यांचीही व्यक्तिरेखा आहे आणि ती साकारली आहे-प्रसिद्ध अभिनेता अमित डोलावत याने. 'महाराष्ट्र शाहीर'च्या निर्मात्यांनी २४ डिसेंबर या साने गुरुजींच्या जयंतीदिना निमित्त हे अमित डोलावत ही भूमिका साकारत असल्याचे सांगितले.

वेळोवेळी शाहिरांच्या जीवनात येऊन त्यांना दिशा देणारे आणि त्यांच्या आयुष्यातील अनेक महत्वाच्या घडामोडींना कारणीभूत असलेले साने गुरुजी यांचा आज जन्मदिवस. (२४ डिसेंबर) त्याचे औचित्य साधून प्रेक्षकांसमोर 'महाराष्ट्र शाहीर'मधील साने गुरुजींची पहिली झलक निर्मात्यांनी सादर केली आहे. शाहीर साबळे आणि साने गुरुजी या गुरु-शिष्यांच्या व्यक्तिरेखांच्या निमित्ताने या चित्रपटात एक आदर्श नाते उलगडणार आहे. 'जय जय महाराष्ट्र माझा…' हे महाराष्ट्रगीत देणाऱ्या शाहिरांच्या जीवनावरील हा चित्रपट २८ एप्रिल २०२३ रोजी तुमच्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे.

अमित डोलावत हा भारतीय टेलीव्हिजनवरील एक आघाडीचा कलाकार आहे. दिव्य दृष्टी, देव, इश्क सुभान अल्लाह, बडी दूर से आये है आदी गाजलेल्या मालिकांमध्ये त्याने मध्यवर्ती भूमिका केल्या आहेत. त्याने नुकतीच "नवे लक्ष्य" ही स्टार प्रवाह चॅनल ची मालिका प्रमुख भूमिकेत केली होती.

२००३ मध्ये त्याने 'पिया का घर'मधून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. डोलावतचा जन्म राजस्थान येथील जयपूर येथे झाला असून त्याला लहानपणापासून नृत्य आणि अभिनयाची आवड आहे. त्याला त्याचे शिक्षण पूर्ण झाल्यावर 'पिया का घर'मध्ये अभिनयाची संधी मिळाली. टेलिव्हिजन जगतात त्याला त्याच्या या पहिल्याच मालिकेने भरपूर लोकप्रियता मिळवून दिली. त्याला त्यानंतर अनेक टेलिव्हिजन मालिकांमध्ये संधी मिळाली. आतापर्यंत त्याने ५० हूनही अधिक टेलिव्हिजन मालिकांमध्ये काम केले आहे.

अमित डोलावतच्या या भूमिकेबद्दल बोलताना चित्रपटाचा दिग्दर्शक केदार शिंदे म्हणतो, "माझे आजोबा म्हणजे शाहिर साबळेंच्या आयुष्यात साने गुरुजींच्या नात्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ते त्यांचे गुरु होते आणि त्यांच्या आयुष्याला गुरुजींनी कलाटणी दिली होती. त्यांची भूमिका अमित साकारतो आहे, याचा मला मनस्वी आनंद आहे. तो हिंदीतील एक प्रतिभावान अभिनेता आहे. उत्तम निर्मिती मूल्यांसाठी आम्ही आघाडीच्या कलाकारांना चित्रपटात स्थान दिले असून अमितचा या चित्रपटातील समावेश हे त्याचेच एक द्योतक आहे."

'महाराष्ट्र शाहीर'ची प्रस्तुती एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट आणि केदार शिंदे प्रॉडक्शन्सची आहे. चित्रपटाचे निर्माते आहेत संजय छाब्रिया आणि बेला केदार शिंदे! २३ एप्रिल २०२३ रोजी चित्रपट प्रदर्शित होत आहे. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर चित्रीकरणाला सुरुवात झाली. सध्या वाई, भोर, पुणे, मुंबई अशा विविध ठिकाणी चित्रीकरण सुरु आहे.

या चित्रपटाला अजय-अतुल यांचे संगीत आहे तर चित्रपटाचे लेखन ज्येष्ठ लेखिका व दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी यांचे आहे. चित्रपटात शाहिरांच्या इतर समकालीन आणि महत्त्वाच्या व्यक्तिरेखा कोण साकारणार याबद्दलची उत्सुकता सुरुवातीपासून लागून राहिली होती. एकेक नावे उलगडत निर्मात्यांनी अपल्या प्रेक्षकांना एकेक धक्के दिले आहेत. साने गुरुजींच्या व्यक्तिरेखेबद्दल उघड केलेली माहिती ही त्यातीलच एक प्रकार आहे. पुढेही असे सुखद आश्चर्याचे धक्के निर्माते दिग्दर्शक देत राहणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT