मंचर यथे ज्येष्ठ महिलेचे मंगळसूत्र लबाडीने पळविले | पुढारी

मंचर यथे ज्येष्ठ महिलेचे मंगळसूत्र लबाडीने पळविले

मंचर (ता. आंबेगाव); पुढारी वृत्तसेवा : देवदर्शनावरून घरी येणार्‍या ज्येष्ठ महिलेची फसवणूक करीत तिच्या गळ्यातील 2 लाख रुपये किमतीचे 4 तोळे वजनाचे मणिमंगळसूत्र पळवून नेल्याची घटना मंचर येथे घडली आहे. याबाबत सिंधूबाई बबन थोरात (वय 66, रा. मंचर) यांनी मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याबाबत मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंधूबाई थोरात या घराशेजारील श्री स्वामी समर्थ मंदिर येथे देवदर्शन करून घरी येत होत्या. या वेळी मंदिरासमोर दोन व्यक्ती मोटारसायकलवर आल्या.

त्यातील पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने थोरात यांना थांबवून, ’मावशी इथे एका महिलेच्या गळ्यावर चाकूने वार झाला आहे. तुम्ही एवढे दागिने घालून फिरू नका, तुम्हाला माहीत नाही काय?’ असे म्हटले. तसेच ’गळ्यातून दागिने काढून द्या, ते पिशवीत ठेवतो,’ असे सांगितले. यामुळे सिंधूबाई घाबरल्या आणि त्यांनी गळ्यातील मंगळसूत्र काढून दिले. ते मंगळसूत्र या व्यक्तीने एका कागदाच्या पुडीत बांधून पिशवीत ठेवल्यासारखे भासवले व ’पुडी इथे उघडू नका,’ असे सांगीतले.

त्यानंतर ते गाडीवर निघून गेले. त्यानंतर सिंधूबाई थोरात यांनी घरी येऊन पुडी उघडून पाहिली असता त्यात मंगळसूत्र नसून माती होती. याबाबत आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सिंधूबाई थोरात यांनी मंचर पोलिस ठाणे येथे तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी दोन अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मंचरचे पोलिस निरीक्षक सतीश होडगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस जवान हगवणे या घटनेचा तपास करीत आहेत.

Back to top button