हॉलीवूड अभिनेते मॅथ्यू पेरी यांचे २०२३ मध्ये निधन झाले होते. लॉस एंजेलिस येथील राहत्या घरी ते मृत अवस्थेत आढळले होते. Pudhari
मनोरंजन

Matthew Perry death case | 'फ्रेंड्स' स्टार मॅथ्यू पेरी मृत्यू प्रकरणी माजी सहाय्यकाला ४१ महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा

पेरीचा यांचा झाला होता अंमली पदार्थाच्‍या अतिसेवानाने मृत्‍यू, इवामासने दिली होती गुन्ह्याची कबुली

पुढारी वृत्तसेवा

Matthew Perry death case updates

लॉस एंजेलिस : अभिनेते मॅथ्यू पेरी यांच्‍या मृत्‍यू प्रकरणी त्यांच्या माजी स्‍वीय सहाय्यक केनेथ इवामासा याला ४१ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्‍यात आली आहे. बुधवारी (दि.२7) लॉस एंजेलिसच्या न्यायालयात न्यायाधीश शेरिलीन गार्नेट यांनी ही शिक्षा सुनावली.या कारवाईनंतर मॅथ्यू पेरी यांच्या मृत्यूचे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

काय होते संपूर्ण प्रकरण?

हॉलीवूड अभिनेते मॅथ्यू पेरी यांचे २०२३ मध्ये निधन झाले होते. लॉस एंजेलिस येथील राहत्या घरी ते मृत अवस्थेत आढळले होते. त्यांच्या मृत्यू 'केटामाइन' या अंमली पदार्थाच्‍या ओव्हरडोजमुळे झाल्‍याचे स्‍पष्‍ट झाले. या प्रकरणी डॉक्टरांपासून ते अभिनेते आणि सहाय्यकांपर्यंत अनेक जण या प्रकरणात दोषी आढळले. मॅथ्यू यांच्या मृत्यू प्रकरणात एकूण पाच जण दोषी सिद्ध झाले आहेत. पाचवी आरोपी आणि 'केटामाइन क्वीन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जसवीन संघाला १५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती.

इवामासाने दिली होती अंमली पदार्थाचे इंजेक्‍शन दिल्‍याची कबुली

न्‍यायालयात साक्ष देताना इवामासाने कबूल केले होते की, २८ ऑक्टोबर २०२३ रोजी पेरीच्या सांगण्यावरून त्याने पेरीला केटॅमाइनचे इंजेक्शन दिले होते. त्यानंतर तो काही कामासाठी बाहेर गेला होता. विशेष म्हणजे इवामासाला कोणतेही वैद्यकीय शिक्षण किंवा प्रशिक्षण नव्हते. इवामासा जेव्हा बाहेरून परत आला, तेव्हा त्याला लॉस एंजेलिसमधील पॅसिफिक पॅलिसेड्स परिसरातील घरात, हॉट टबमध्ये मॅथ्यू पेरीचा मृतदेहआढळला. मृत्यूसमयी पेरी ५४ वर्षांचे होते.

इवामासला ४१ महिन्यांची शिक्षा

अभिनेता मॅथ्यू पेरी यांच्या वैयक्तिक सहाय्यकावर (पर्सनल असिस्टंट) त्यांना ड्रग्सचा जीवघेणा डोस पुरवल्याचा आरोप आहे. या प्रकरणात केनेथ इवामासा याने स्वतः आपला गुन्हा स्वीकारला आहे. मॅथ्यू यांना केटामाइनचे इंजेक्शन आपणच टोचले होते, असेही त्याने सांगितले. या कबुलीसोबतच या प्रकरणातील पाच जणांवर सुरू असलेल्या खटल्याचा शेवट झाला आहे. यावर न्यायाधीश शेरिलिन गार्नेट यांनी आरोपी केनेथ इवामासा याला ४१ महिन्यांची शिक्षा सुनावली.

मी तुम्हा सर्वांची माफी मागतो : इवामासा

न्यायालयात आपली चूक कबूल करताना इवामासा म्हणाला, "मी तुम्हा सर्वांची माफी मागतो. माझ्याकडून झालेल्या बेकायदेशीर कृत्यांबद्दल मला आयुष्यभर पश्चात्ताप राहील. हे दुःख मी माझ्या चितेपर्यंत सोबत घेऊन जाईन.मॅथ्यू पेरीला योग्य वैद्यकीय देखरेखीशिवाय औषधे पुरवून त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या पाच जणांवरील खटला इवामासाच्या शिक्षेसह आता पूर्ण झाला आहे.

मॅथ्यू पेरीचा व्यसनाविरुद्धचा संघर्ष

मॅथ्‍यू पेरी यांनी 'फ्रेंड्स' लोकप्रिय मालिकेत 'चँडलर बिंग' भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे घराघरांत पोहोचलेले मॅथ्यू पेरी अनेक वर्षांपासून दारू आणि अंमली पदार्थांच्या व्यसनाशी झुंजत होते. सरकारी वकिलांच्या मते, मॅथ्‍यू पेरी केटॅमाइनवर पूर्णपणे अवलंबून राहिले होते. याचा वापर कधीकधी नैराश्यावरील उपचारासाठी केला जातो. वकिलांनी इवामासाचे वर्णन पेरीला "व्यसनासाठी प्रवृत्त करणारा आणि अंमली पदार्थ पुरवणारा" असे केले आहे. पेरीच्या प्रकृतीबाबत धोक्याचे संकेत मिळत असूनही इवामासा त्याला सातत्याने इंजेक्शन देत राहिला, असेही न्‍यायालयात स्‍पष्‍ट केले.

इवामासाने दिली होती २५हून अधिक इंजेक्‍शन्‍स

पेरीच्या मृत्यूच्या आधीच्या काही दिवसांत इवामासाने त्याला २५ हून अधिक इंजेक्शन्स दिली होती. मॅथ्‍यू पेरी यांच्‍या मृत्यूच्या दिवशी दिलेल्या तीन इंजेक्शन्सचा समावेश होता. न्यायालयीन कागदपत्रांनुसार,इवामासाला पेरीने आपल्या शेवटच्या क्षणांमध्ये "मला आणखी एक मोठा डोस दे"असे सांगितले होते. शवविच्छेदन अहवालात पेरीचा मृत्यू 'केटॅमाइनच्या तीव्र प्रभावामुळे' झाल्याचे समोर आले होते. न्यायालयात मॅथ्यू पेरीचे सावत्र वडील कीथ मॉरिसन यांनी इवामासाच्या कृत्याचा तीव्र निषेध केला. मॉरिसन म्हणाले, "तू त्याला सतत ड्रग्ज देत राहिलास. तू कोणालातरी फोन करून मदत मागू शकला असतास."

अन्‍य चार आरोप दोषी सिद्ध

या प्रकरणात वकिलांनी पेरीच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या इतर चार जणांनाही दोषी सिद्ध केले आहे. यामध्ये प्रमाणित ड्रग्ज समुपदेशक एरिक फ्लेमिंगचा समावेश आहे. पेरीला ड्रग्ज पुरवण्यासाठी मध्यस्थ म्हणून काम केल्याबद्दल त्‍याला दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती.

दोन डॉक्‍टरांनाही शिक्षा

पेरीच्या व्यसनाचा गैरफायदा घेऊन पैसे कमावणाऱ्या दोन डॉक्टरांनाही गेल्या डिसेंबरमध्ये दोषी ठरवून शिक्षा सुनावण्यात आली आहे. यामध्ये मार्क चावेझ आणि साल्वाडोर प्लासेन्सिया यांचा समावेश आहे. केटॅमाइन पुरवण्याच्या कटात सामील असल्याचा गुन्हा कबूल केल्यानंतर मार्क चावेझला आठ महिन्यांच्या नजरकैदेची शिक्षा झाली आहे. तर, पेरीबद्दल बोलताना "हा मूर्ख किती पैसे देईल ते पाहूया" असे म्हणणाऱ्या प्लासेन्सियाला अडीच वर्षांची फेडरल तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.याशिवाय, लॉस एंजेलिसमधील आपल्या अपार्टमेंटमधून श्रीमंत ग्राहकांना ड्रग्ज विकणाऱ्या जसवीन संघ (Jasveen Sangha) या ब्रिटिश-अमेरिकन महिलेला गेल्या महिन्यात १५ वर्षांच्या दीर्घ तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

जसवीन संघासह पाच जण होते आरोपी

यापूर्वी जसवीन संघानेही आपला गुन्हा कबूल केला होता. तिने न्यायालयाला सांगितले होते की, "या दुर्दैवी घटनेला कारणीभूत ठरलेल्या परिस्थितीत मी जी भूमिका बजावली आणि जे कृत्य केले, त्याबद्दल मी पूर्ण जबाबदारी घेते. माझे वर्तन म्हणजेच ड्रग्सचा व्यवसाय चालवणे आणि त्याच मार्गावर पुढे जात राहणे हे निष्काळजीपणाचे, धोकादायक आणि चुकीचे होते, हे मला समजले आहे." न्यायालयाने जसवीनला १५ वर्षांची शिक्षा सुनावली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT