मनोरंजन

Shivali Parab : कॉमेडियन शिवाली परब दिसणार ‘प्रेम प्रथा धुमशान’मध्ये

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातून घरोघरी पोहोचलेली अभिनेत्री शिवाली परब  (Shivali Parab) आता "प्रेम प्रथा धुमशान" या चित्रपटात दिसणार आहे. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त अभिजीत मोहन वारंग यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून, 'प्रेम प्रथा धुमशान' या चित्रपटातून मालवणी बोलीत एक प्रेमकथा पहायला मिळणार आहे. २८ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. (Shivali Parab )

दसऱ्याच्या मुहूर्तावर "प्रेम प्रथा धुमशान" चित्रपटाचा टीजर लाँच करण्यात आला. ऑक्सिजन फिल्म्स, डायनॅमिक पिक्चर्स, आरव्हीके फिल्म्स यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सत्या अय्यर हे चित्रपटाचे निर्माते आहेत. स्वरा अभिजित वारंग, रचना विज, मोहित, नमन तलवार सहनिर्माते आहेत. अभिजीत मोहन वारंग यांच्या 'पिकासो' या पहिल्याच चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

'प्रेम प्रथा धुमशान' हा चित्रपट मालवणी बोलीभाषेतला आहे. शिवाली परब या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. शिवालीनं महाराष्ट्राची हास्यजत्रातून विनोदी भूमिकांमध्ये आपलं कौशल्य दाखवून दिलं आहे. पण आता चित्रपटातून तिचा सकस अभिनयही प्रेक्षकांना पाहायला मिळेल. शिवालीबरोबर विनायक चव्हाण, अभय खडपकर, अभय नेवगी, मिलिंद गुरव, विश्वजित पालव, विद्याधर कार्लेकर, अक्षता कांबळी, निकिता सावंत, कल्पना बांदेकर असे कलाकार आहेत. चेतन शिंदे यांनी छायांकन, आनंद लुंकड यांना संगीत दिग्दर्शन केलं आहे.

मालवणी बोलीचा वापर चित्रपटात बहुतांशी विनोदनिर्मितीसाठी केला गेला. पूर्ण मालवणी बोलीतले चित्रपट अगदीच मोजके आहेत. मात्र मालवणी बोलीला, तिथल्या माणसांना आणि त्यांच्या गोष्टींना वेगळ्या उंचीवर घेऊन जात अभिजीत मोहन वारंग यांनी 'प्रेमप्रथा धुमशान' चित्रपटातून अनोखी प्रेमकथा मांडली आहे.

SCROLL FOR NEXT