सातारा : सराईतांकडून हवेत फायरिंग; सातार्‍यात रासदांडियावेळी घबराट | पुढारी

सातारा : सराईतांकडून हवेत फायरिंग; सातार्‍यात रासदांडियावेळी घबराट

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  सातार्‍यातील मंगळवार पेठेत 5 रोजी मध्यरात्री 5 जणांच्या टोळक्याने अक्षरश: दहशत माजवत बंदुकीतून फायरिंग केले. दुचाकी पायावरून गेल्याच्या वादातून फायरिंग करत कोयते नाचवले गेल्याने ढोणे कॉलनी हादरून गेली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नसून पोलिसांनी फायर झालेल्या पुंगळ्या जप्त केल्या आहेत. याप्रकरणी अल्पवयीन युवकाला ताब्यात घेतले असून ऐन दांडियावेळी ही घटना घडल्याने महिला, युवतींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

अमीर शेख (रा. वनवासवाडी), अभिजीत भिसे (रा. यश ढाब्यामागे, मोळाचा ओढा), साहिल सावंत (रा.कोटेश्वर मंदिर परिसर), आहत (तक्रारदार याला पूर्ण नाव, वय, रा. शनिवार पेठ, सर्व सातारा शहर परिसर) व अल्पवयीन एकजण यांच्यावर जीवघेणा हल्ला, आर्म अ‍ॅक्टसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. यातील अमीर शेख व अभिजित भिसे हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. दरम्यान, याप्रकरणी यश संजय बीडकर (वय 22, रा.व्यंकटपुरा पेठ, सातारा) या युवकाने शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, दि. 5 रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास सिव्हिलकडे जाणार्‍या रस्त्यावर गरबा सुरू असताना तेथे गर्दी झाली होती. यावेळी तक्रारदार मित्रासोबत दुचाकीवरून घरी निघाला होता. याचदरम्यान संशयित युवक त्या परिसरातून जात असताना तक्रारदार याचा मित्र सर्वेश महाडिक याच्या पायावरून संशयितांची दुचाकी गेल्याने तो जखमी झाला. यातून दोन्ही गटांत बाचाबाची झाली. युवकांच्या दोन गटांत तणातणी झाल्याने सिव्हिल रोड परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.  सुमारे 15 मिनिटानंतर दोन्ही गटातील युवक तेथून निघून गेले. या घटनेनंतर सुमारे 1 तासाने मध्यरात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास संशयितांनी मंगळवार पेठ येथील ढोणे कॉलनी गाठली. यावेळी पुन्हा दोन्ही युवकांचे गट समोरासमोर आले. प्राथमिक माहितीनुसार यातील संशयितांनी दोन बंदूका आणल्या होत्या. त्या बंदूकीद्वारे संशयिताने तक्रारदार युवकाकडे बंदूक रोखत ‘आज तुम्हाला सुट्टी देत नाही. तुम्हाला जिवंत ठेवत नाही’, असे म्हणत फायरिंग केले.

मात्र बंदूकीचा रोख पाहून तक्रारदाराने ती गोळी चुकवली. फायर झाल्याने परिसरात थरकाप उडाला व दांडिया खेळायला आलेल्या नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. याचवेळी चिडलेल्या संशयितांनी आणखी फायर करत धारदार कोयते नाचवले. सुमारे 10 मिनिटे धुडगूस सुरु होता. मात्र सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. फायरिंगच्या घटनेची माहिती शाहूपुरी पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला. तोपर्यंत संशयित तेथून पसार झाले होते. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करुन पुंगळ्या व जिवंत काडतुसे जप्त केली. पहाटेपर्यंत पंचनामा प्रकिया सुरु होती. संशयितांची नावे मिळाल्यानंतर व गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांची पथके त्यांच्या शोधासाठी रवाना करण्यात आली. पोलिसांच्या कारवाईत एका अल्पवयीन युवकाला पकडण्यात आले.

कायदा व सुव्यवस्थेलाच आव्हान

मंगळवारी रात्री व बुधवारी पहाटे रेकॉर्डवरील संशयित आरोपींनी कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देत धुडगूस घातला. गणपती उत्सव शांततेत पार पडला असताना देवीच्या निमित्ताने गरबा खेळण्यासाठी प्रामुख्याने महिला बाहेर पडल्या होत्या. मात्र, दोन ठिकाणी वादावादी होऊन फायरिंग झाल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचे तीन-तेरा वाजले आहेत. किरकोळ कारणावरून वाद चिघळल्यानंतर बंदुका, कोयते घेऊन पुन्हा हल्ला चढवल्याने सातार्‍यातील पोलिसांची गस्त कुठे होती? संशयितांकडे हत्यारांचा साठा कुठून आला? नेमक्या बंदुका किती आहेत? असे अनेक सवाल उपस्थित झाले आहेत.

Back to top button