प्रशासन विभागासाठी मोर्चेबांधणी ; पालिकेच्या चार ते पाच अधिकार्‍यांच्या मुंबईच्या वार्‍या | पुढारी

प्रशासन विभागासाठी मोर्चेबांधणी ; पालिकेच्या चार ते पाच अधिकार्‍यांच्या मुंबईच्या वार्‍या

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे प्रशासन विभागाचे सहायक आयुक्तांची बदली होणार, अशी चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे. त्यांच्या जागेवर वर्णी लागावी म्हणून पालिकेचे चार ते पाच अधिकारी प्रयत्नशील आहेत. त्यासाठी त्यांनी स्थानिक नेतेमंडळींसह मुंबईतील मंत्री व पदाधिकार्‍यांकडे फिल्डींग लावली आहे. आयुक्त राजेश पाटील यांच्यापाठोपाठ अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांची मुदतीपूर्व अचानक बदली झाली. त्यामुळे पालिकेतील अनेक अधिकारी इतरत्र बदलीसाठी प्रयत्न करीत आहेत. महापालिकेत प्रशासन विभाग महत्त्वाचा मानला जातो. त्या विभागाचे सहायक आयुक्त हे ही बदली करून घेत असल्याची चर्चा आहे. त्या जागेवर नियुक्ती व्हावी, म्हणून पालिकेचे अनेक अधिकारी इच्छुक आहेत.

पालिका आस्थापनेवरील तीन सहायक आयुक्त तर, प्रतिनियुक्तीवरील 2 आयुक्त व सहायक आयुक्त त्यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी काही अधिकार्‍यांनी खासदार व आमदारांचे शिफारस पत्र आयुक्तांकडे सादर केले आहेत. खुर्चीपर्यंतचा मार्ग मोकळा व्हावा म्हणून विविध बातम्याही पेरल्या जात आहेत. त्याबाबत पालिका वर्तुळात खमंग चर्चा रंगली आहे. दरम्यान, प्रशासन विभागाच्या सहायक आयुक्तांनी बदली तांत्रिक कारणांमुळे रद्द झाली आहे. त्यामुळे प्रयत्न करणारे अधिकारी हिरमुसले आहेत. मात्र, त्यांनी आपले प्रयत्न कायम ठेवले असून, नेतेमंडळीकडे उठबस व संपर्क कायम
ठेवला आहे.

Back to top button