Latest

मोदी गंगा स्नान करत होते तेथे प्रेते वाहत होती : शिवसेना

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : मोदी गंगा स्नान : ज्या गंगेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डुबकी मारली त्या गंगेत कोरोना काळात प्रेते वाहताना जगाने पाहिले आहे. पंतप्रधान म्हणून नव्हेत तर काशीचे खासदार म्हणून मोदी यांनी त्यावेळी तेथे जायला हवे होते. लोक आक्रोश करत असताना मोदी तेथे का गेले नाहीत, असा सवाल शिवसेनेने केला आहे. शिवसेनेचे मुखपत्र सामनाच्या संपादकीयमधून मोदींच्या काशी दौऱ्यावर कोरडे ओढले आहेत.

'महागाई, बेरोजगारीच्या प्रश्नांवर काशीचे भव्य मंदिर हा उतारा नाही. मथुरेत मंदिरांचे आंदोलन सुरू करून बेरोजगारी कमी होईल असे कोणाला वाटत असेल तर तो भ्रम आहे. मंदिरांचा जीर्णोद्धार हा वेगळा विषय आहे. पंतप्रधान मोदींनी काशीत जाऊन गंगेत स्नान केले. त्या गंगास्नानाने त्यांच्या मनाची जळमटे दूर होवोत. विरोधकांविषयीची किल्मिषे नष्ट होवोत आणि काशी विश्वनाथ मंदिराप्रमाणेच लोकशाहीच्या मंदिराचाही जीर्णोद्धार होवो. मोदी हे पंतप्रधान असल्यामुळेच त्यांचे गंगास्नान प्रकाशझोतात राहिले. नाहीतर गंगेत रोज लाखो लोक डुबक्या मारीतच असतात.

मोदींची तीर्थयात्रा हा राजकीय सोहळा

पंतप्रधान मोदी यांची काशी यात्रा चांगलीच गाजली आहे. काशी हा मोदींचा मतदारसंघ आहे म्हणून नव्हे, तर मोदी काशीला जाऊन जे धार्मिक, आध्यात्मिक प्रयोग करीत असतात त्याची चर्चा बराच काळ होत असते. मोदी अधूनमधून केदारनाथलाही जात असतात. केदारनाथच्या गुंफेत ध्यानमग्न बसलेल्या पंतप्रधानांची छायाचित्रे मग जगभरात प्रसारित होतात. मोदींची तीर्थयात्रा हा एक प्रकारे राजकीय सोहळाच ठरतो. काशी यात्रेदरम्यान गंगेत डुबकी मारल्याचे छायाचित्र तसेच जगभरात पोहोचले आहे.

मोदी गंगा स्नान : मोदी काशीचे खासदार असल्याने शक्य झाले

मोदी यांनी काशीच्या भूमीवरून उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांचा 'शंख' फुंकला. त्यांची ही काशी यात्रा प्रचारासाठीच असल्याची टीका आता होत आहे. सध्या सगळ्यांचाच धार्मिक यात्रा राजकीय प्रचारासाठीच होत असतात हे देवांनाही ज्ञात असेल. स्वातंत्र्यानंतर प्रथम सोमनाथाचा जीर्णोद्धार सरदार पटेल यांनी घडवून आणला. हिंदुस्थानातील धार्मिक आणि तीर्थस्थळांचा विकास कोणी करत असेल तर त्यांचे कौतुक व्हायला हवे. राजकारण बाजूला ठेवून या विषयाकडे पाहायला हवे. काशीत विश्वनाथ धामचा विकास झाला. त्याचे श्रेय काशीचे खासदार असलेले पंतप्रधान मोदी यांनाच द्यावे लागेल. मोदी यांच्या आधी अनेक हिंदुत्वप्रेमी खासदार तेथे येऊन गेले. काशीचा विकास करणे त्यांच्याही मनात होते, पण ते सर्वजण पंतप्रधान नसल्यामुळे काशी विश्वनाथ धाम उपेक्षित राहिले.

जनता आक्रोश करत असताना का गेले नाहीत?

मोदी आजच्या झगमगाटी वातावरणात तेथे गेले, पण गंगा आक्रोश करीत असताना काशीचे खासदार तेथे गेले नाहीत. आमच्या संस्कृतीची मुळे इतकी घट्ट रुजली आहेत की, अनेक वादळे, हल्लेदेखील ही मुळे नष्ट करू शकले नाहीत. या मुळांतून आपल्या संस्कृतीचा वृक्ष बहरला आहे. देशात आज राजकीय वातावरण बिघडले आहे. राज्यकर्त्यांची मनमानी सुरू आहे. गोंधळाची स्थिती आहे. महामारीने लोकांचे जीवन अशांत केले आहे. अशा वेळी अध्यात्मच मदतीला येईल, असे शिवसेनेने म्हटले आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT