सातारा : नोकरीचे आमिष दाखवून विवाहितेवर बलात्कार | पुढारी

सातारा : नोकरीचे आमिष दाखवून विवाहितेवर बलात्कार

नागठाणे; पुढारी वृत्तसेवा : विवाहितेला नोकरीचे आमिष दाखवून व कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी देत वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी सासपडे (ता. सातारा) येथील युवकावर बोरगाव पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पंकज मोहन यादव (रा. सासपडे, ता. सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंकज यादव याने त्याच्या नात्यातील एका विवाहितेला बँकेत नोकरी लावतो. त्यासाठी तुला कॉम्प्युटर क्लास लावावा लागेल.

मी तुला क्लास लावतो, असे आमिष दाखवून घरात कोणी नसताना तिच्याशी बळजबरी करत बलात्कार केला. यावेळी तिचे अश्‍लील फोटो काढून अत्याचार केले. ही घटना कोणाला सांगितल्यास फोटो व्हायरल करेन आणि तुझा नवरा व मुलाला ठार मारेन, अशी धमकी दिली.

त्यानंतर वेळोवेळी सातारा येथे लॉजवर व घरी धमकी देत बलात्कार केला. पीडित विवाहितेने त्याला टाळण्याचा प्रयत्न केला असता त्याने नवरा व भावाला ठार मारण्याची पुन्हा धमकी दिली. या घटनेची माहिती अखेर विवाहितेने घरच्यांना दिल्यावर त्यांनी बोरगाव पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली. पोलिसांनी पंकज यादव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली. पुढील तपास सपोनि डॉ. सागर वाघ करत आहेत.

Back to top button